राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण रखडणार

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण रखडणार 

४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा विचार

वेब टीम मुंबई : राज्यात आधीच रडतखडत चाललेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे. लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. टास्क फोर्सशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. 

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील लसीकरणाच्या स्थितीची माहिती दिली. राज्यात आतापर्यंत १ कोटी ८४ लाख नागरिकांना लसीचे डोस दिले गेले आहेत. ४५ वर्षांवरील पाच लाख नागरिकांना अद्याप दुसरा डोसे देणे बाकी आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत या नागरिकांना दोन्ही डोस प्राधान्यानं देणं बंधनकारक आहे. मात्र, सध्या राज्यात कोवॅक्सिनचे फक्त ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. तर, राज्य सरकारनं १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी २ लाख ७५ हजार डोस उपलब्ध आहेत. राज्यानं विकत घेतलेले हे पावणे तीन लाख डोस आणि आधीचे उपलब्ध असलेले ३५ हजार डोस असे सव्वा तीन लाखांच्या आसपास डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी तूर्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग कमी करण्याचाही सरकारचा विचार आहे, असं टोपे म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. टास्क फोर्सशी चर्चा करून याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

'४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून कोविशिल्डचे १६ लाख डोस येणे बाकी आहे. त्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मात्र, केंद्र सरकारकडंही हे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळंच राज्य सरकारनं १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी खरेदी केलेले डोस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना संपूर्ण महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांना देण्यात आल्या आहेत,' असं टोपे म्हणाले.

Post a Comment

0 Comments