छ. संभाजीराजांचे मराठा आरक्षणासाठी तीन पर्याय

 छ. संभाजीराजांचे मराठा आरक्षणासाठी तीन पर्याय 

वेब टीम मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

'आम्ही कोणताही इतर अजेंडा घेऊन आलो नाही. आमचा थेट विषय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, हे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने बोलत आहोत. मी मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून नाही तर मराठा समाजाचा शिपाई म्हणून आलो आहे. तुम्ही समाजाला गृहित धरू नका,' असं म्हणत संभाजीराजेंनी सर्व राजकीय पक्षांना या प्रश्नावरून एकत्र येण्याचं आवाहन केलं.

'समाज शांत आहे, मात्र त्यांच्या भावनांचा उद्रेक होईल. मराठा समाजात ७० टक्के लोक गरीब आहेत. कायदेतज्ञांशी बोलून आम्ही आरक्षणसाठी ३ पर्याय शोधले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी हे पर्याय मान्य केले आहेत,' अशी माहिती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.

संभाजीराजेंनी कोणते ३ पर्याय मांडले?

पहिला पर्याय - रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी

दुसरा पर्याय - रिव्ह्यू पिटीशन टिकली नाही तर क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करावी लागेल.

तिसरा पर्याय - ‘342 अ’ च्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रपोजल मांडावं लागेल. त्यासाठी आधी भक्कम डेटा तयार करून राज्यपालांना भेटावं लागेल. 

जस्टीस गायकवाड आयोगाच्या अहवालातील त्रुटी दूर कराव्या लागतील. राज्यपालांच्या माध्यमातून हे राष्ट्रपतींकडे जाईल. त्यानंतर राष्ट्रपतींना हे योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर संसदेकडे हे प्रकरण जाईल.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाव्यतिरिक्त इतर प्रलंबित मागण्यांकडेही सरकारचं लक्ष वेधलं. तसंच या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments