मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

वेब टीम नवी दिल्ली : मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावलाय. मात्र ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध राहतील, असा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. यामुळे विद्यार्थ्यांना मात्र दिलासा मिळालाय.

महाराष्ट्र सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं तसंच ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून देण्यात आलेलं आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावलाय.

मुंबई उच्च न्यायालयाने २०१९मध्ये याबाबतचा निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी केली. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांचा समावेश होता.

मराठा आरक्षणाच्या या निर्णयावर राज्यासह देशाचं लक्ष लागून होतं. हा निर्णय महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं गायकवाड समितीचा अहवाल फेटाळून लावला. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नसून सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं, सांगत सर्वोच्च न्यायालयानं हा अहवाल अस्विकारार्ह असल्याचं म्हटलंय

१९९२ साली इंद्रा सहाणी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. याच निर्णयावर बोट ठेवत राज्यानं दिलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं. याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल सुनावताना आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचा निर्वाळा दिलाय.

Post a Comment

0 Comments