राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार?; राजेश टोपेंचे संकेत

राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार?; राजेश टोपेंचे संकेत

वेब टीम मुंबई : मुंबईसह काही जिल्ह्यातील करोना संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन शिथील होणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवायचा यावर अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनच्या पहाटेपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत असून गेल्या काही दिवसांत बहुतेक जिल्ह्यांत रुग्णवाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळं साहजिकच १ जूननंतर लॉकडाऊन शिथील होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊनचा आर्थिक फटका बसलेल्या नोकरदारवर्गाचे व छोट्या-मोठ्या उद्योग व्यावसायिकांचे सरकारच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. मुंबईकर देखील लोकल ट्रेन सुरू होण्याच्या आशेवर आहेत.

लॉकडाऊनची मुदत संपत आल्यानं त्याबाबत दोन दिवसांत काहीतरी ठोस सांगितलं जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. 'राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात चर्चा झाली. लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवण्याबाबत चर्चा झाली. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. लवकरच तो निर्णय होईल. मात्र, लॉकडाऊन वाढवताना रुग्णसंख्या घटलेल्या जिल्ह्यात काही प्रमाणात सवलती दिल्या जातील, असंही टोपे म्हणाले.

राज्यातील आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे. तर, मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २२ लाख १८ हजार २७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर १९ हजार ९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Post a Comment

0 Comments