हनीट्रॅप प्रकरणी आरोपिंना दुसर्या गुन्ह्यात वर्ग करणार

हनीट्रॅप प्रकरणी आरोपिंना दुसर्या गुन्ह्यात वर्ग करणार 

वेब टीम नगर : तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणांत तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये संबंधित महिला व एका आरोपीला वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपींना या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे.

नगर तालुक्यातील जखणगाव येथे पंधरा दिवसांपूर्वी हनीट्रॅपचे प्रकरण उघडकीस आले होते. एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ काढण्यात आला होता व संबंधित व्यक्तीला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी येथील नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. संबंधित महिला व नगर येथील कायनेटीक चौकामध्ये राहणारा अमोल मोरे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यांना सुरुवातीला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. याच तपासादरम्यान त्या दोघांविरुद्ध याच पोलिस ठाण्यामध्ये अशाच प्रकारे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला होता. एका शासकीय प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्याला खंडणी मागितल्यचे प्रकरण समोर आले आहे.

सदर दोन्ही गुन्ह्यामध्ये हेच आरोपी असून तपासामध्ये अन्य चार जणांची नावे निष्पन्न झाली होती. यामध्ये सुनील खेसे व बापू सोनवणे यांचाही यामध्ये समावेश होता. त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती. तर पहिल्या प्रकरणांमध्ये संबंधित महिला व अमोल मोरे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना आता तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले जाणार आहे. काल नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी न्यायालयामध्ये या आरोपींना वर्ग करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक सानप यांच्याशी संपर्क साधला असता हनी ट्रॅप प्रकरण हे जमिनीच्या वादातून पुढे आले असल्याचे तपासामध्ये प्राथमिक दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये सात दिवसाने वर्ग केले जाईल. कारण सात दिवसांचा क्वारंटाईन पिरेड संपल्यानंतर त्यांना या गुन्ह्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर वर्ग केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या दोन आरोपींच्या ताब्यातून आम्ही काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्याची पडताळणी सुद्धा सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर प्रकरणामध्ये संबंधित महिला व आरोपी मोरे यांच्या ताब्यातून जे मोबाईल हस्तगत केले आहेत, त्यांना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केल्यानंतर त्याचा तपास केला जाईल व पुढील माहिती घेण्यासाठी हे मोबाईल मुंबई येथे फॉरेन्सिक लॅबकडे पुढील तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे निरीक्षक सानप यांनी यावेळी सांगितले. आम्ही जनतेला आवाहन केले आहे, जर कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी आमच्याकडे रितसर तक्रार दाखल करावी, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments