शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच

 शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच

चौकशी समितीचा अहवाल : संचालक मंडळाला क्लिनचीट

वेब टीम नगर :  जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त खरेदी करण्यात आलेली घड्याळ खरेदी ही पारदर्शक झालेली आहे असा स्पष्ट अहवाल याबाबतच्या चौकशी समितीने दिला आहे.घड्याळ वाटपातील तांत्रिक कारणांना घोटाळ्याचे नाव देऊन विरोधी मंडळी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत.शिक्षक बँकेचा कारभार सभासद हिताचा व काटकसरीचा राहिला आहे .संचालक मंडळाने सभासदांसाठी अनेक हिताचे निर्णय घेऊन सभासदांना न्याय दिलेला आहे. परंतु विरोधकांना राजकारणाच्या हव्यासापोटी शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी प्रकरणात फार मोठा घोटाळा झाला ,अशा आशयाचा बातम्या देऊन ,जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रारी करून शिक्षक बँकेची व सभासदांची बदनामी केली हेच चौकशी अहवालावरून सिद्ध झाले आहे असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले.

जिल्हा शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ हे सभासद हिताचे कार्य करीत आहे. बँकेच्या कारभाराबद्दल सभासदांना उत्तरे देण्यास आम्ही बांधील आहोत. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे घड्याळ वाटप प्रकरणातही संचालक मंडळाला क्लीनचिट मिळेल असा आत्मविश्वास ही श्री .पठाण यांनी व्यक्त केला.*

शिक्षक बँकेच्या  घड्याळ खरेदीची चौकशी, चौकशी अधिकारी  खेडकर यांनी नुकतीच पूर्ण केली. त्यांनी विरोधकांनी केलेले आरोप व बँकेत झालेली घड्याळ खरेदी प्रक्रिया याची वस्तुस्थिती व पुरावे पाहून, शिक्षक बँकेने अजंता कंपनीशीच थेट करार करून घड्याळ खरेदी केली आहे व सर्व रक्कम आरटीजीएस द्वारे कंपनीला पेड केली आहे. ही सर्व घड्याळ खरेदीची प्रक्रिया पारदर्शी झाली आहे, असा स्पष्ट उल्लेख चौकशी अहवालात नमूद केलेला आहे. मात्र विरोधक केवळ राजकारणापायी ही बाब लपून, या चौकशीत संचालक दोषी आहेत, अशा प्रकारचा कांगावा करत आहे,असे बँकेचे उपाध्यक्ष   बाबासाहेब खरात यांनी सांगितले.

केवळ तांत्रिक बाबीचा मुद्दा घेऊन  चौकशी समितीचे वेळी घड्याळ  वाटप न झालेल्या 2336 घड्याळांची आकडेवारी त्यात नमूद केली आहे. शिक्षक बँकेचे सभासदांना शताब्दी वर्षानिमित्त घड्याळ भेटीचे वितरण अद्यापही सुरू आहे .चौकशी समितीच्या वेळेस शिल्लक असलेल्या घड्याळांची संख्या आता मात्र ती १२०० च्या आसपास शिल्लक आहेत.कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षभरापासून अनेक सभासद बँकेत आले नाही. हे वाटप बँकेने अद्याप चालू ठेवले आहे. जवळपास अकरा हजार सभासदांपैकी  बहुतांश सभासदांनी घड्याळ नेले आहे .त्यांनी कुठेही तक्रार केलेली नाही. तसेच ही खरेदी प्रक्रिया सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन पूर्ण केलेली आहे .घड्याळ खरेदीस सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ही बाब चौकशी समितीने अधोरेखित केली आहे .त्यामुळे विरोधकांनी राजकारणासाठी घड्याळाचा महाघोटाळा केला,हा फुसका बार निघाला, हे आता सिद्ध झाले आहे असे माजी अध्यक्ष  संतोष दुसुंगे यांनी सांगितले.

बँकेकडे सध्या शिल्लक असलेल्या घड्याळ यांची किंमत नमूद करून घड्याळ वाटपाची सुद्धा आता चौकशी होणार आहे त्यातून सर्व सत्तेबाहेर येणार आहे मात्र विरोधकांना सुद्धा सर्व वस्तुस्थिती माहीत असताना केवळ राजकारण आणि बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेहमीप्रमाणे खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत मात्र यांचा बार फुसका ठरणार आहे सभासदांना सर्व वस्तुस्थिती माहित आहे.नेहमीप्रमाणे खोटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करून सत्ता प्राप्त करण्याचे दिवस आता गेले आहेत.अंध भक्तांनी आता तरी सत्य स्वीकारून खोट्या नाट्या बातम्या देऊन बँकेची बदनामी करू नये असे आवाहन गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी केले आहे. 

या पत्रकावर शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप,शरद भाऊ सुद्रिक ,राजू राहणे ,अर्जुन शिरसाठ, श्रीमती उषा बनकर ,श्रीमती विद्याताई आढाव, बाळासाहेब मुखेकर, किसन खेमनर, गंगाराम गोडे, सुयोग पवार आदी संचालकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments