हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून खंडणी मागितली सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल

हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून खंडणी मागितली सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल 

तिघांना अटक,पोलीस कोठडीत रवानगी 

वेब टीम फलटण : फलटणमधील एकाला हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढून तब्बल १५ लाख ५० हजारांची खंडणी घेणार्‍या सहा महाभागांना फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. यात तिनजणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्या सर्वांना न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५  मे २०२०रोजी सकाळी ११. ३० वाजण्याचा सुमारास तक्रारदार त्यांच्या दुकानगाळ्यात बसलेले असताना अजित घोलप याने लक्ष्मीनगर येथील मानस प्लाझा बिल्डिंगमध्ये भेंडीचा व्यापारी आलेला आहे, ते भेंडी घेणार आहेत, असे सांगून तक्रारदारास स्कुटीवर बसवून तेथे घेऊन आला. त्यावेळी मानस प्लाझा बिल्डिंग येथे एक मुलगी व राजू बोके, मनोज हिप्परकर, रोहित भंडलकर हे देखील बसलेले होते. त्यांनी तक्रारदारास मारहाण करून त्याचे कपडे काढून त्या मुलीच्या अंगावर ढकलून दिले. त्यांचे फोटो काढले. त्यानंतर गिरवीकडे जाणार्‍या रस्त्यावरील ओढ्यात अजित घोलप व विजय गिरी गोसावी हे जबरदस्तीने पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर बसवून घेऊन गेले. तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हे देखील त्यांच्याकडील दुचाकीवरून त्याठिकाणी आलेले होते. तेथे आल्यावर तिघांनी मिळून तक्रारदारास मारहाण करून आता त्या मुलीला तुझ्या विरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार द्यायला सांगतो, अशी भीती दाखवून दमदाटी करून वीस लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी समाजात बदनामी होईल म्हणून १५ लाख ५० हजार रुपये त्यांना दिले. 

यानंतर पोलीस प्रशासनाने तक्रारदारास सुरक्षेची ग्वाही दिल्यानंतर तक्रारदाराने फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली. जर अशा प्रकारची घटना कोणाबरोबर घडली असल्यास त्यांनी विनासंकोच फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि भारत किंद्रे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि एस. के. राऊळ, पोउपनि एस. ए. बनकर, सफौ एस. एन. भोईटे, पोहेकॉ व्ही.पी.ठाकूर, पोना एस. डी. सुळ, एस.ए. तांवे, एन. डी. चतुरे, व्ही. एच. लावंड, पोशि. ए. एस. जगताप आदिंचे पथक पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments