“करोनाची दुसरी लाट चीनमुळे; मोदींनी आव्हान दिल्यामुळेच केला व्हायरल हल्ला”
भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांचा दावा
वेब टीम इंदोर : देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी फेब्रुवारी ते मे पर्यंत अक्षरशः थैमान घातलेलं बघायला मिळालं. देशात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. त्याचबरोबर देशातील मृतांची आकडेवारीही झपाट्याने वाढत आहे. असं असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेमागे चीन असल्याचा दावा केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं चीनला आव्हान देत आहेत, आणि याचं प्रत्युत्तर म्हणून चीनने व्हायरल वॉर सुरू केलं आहे,” असं विधान भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी केलं आहे.
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी इंदोर येथे बोलताना हे विधान केलं. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विजयवर्गीय म्हणाले,”करोनाची दुसरी लाट पसरली की, पसरवली गेली… हा चौकशीचा विषय आहे. जगामध्ये कुणी चीनला आव्हान दिलं असेल, तर ते भारताने आणि मोदींनी दिलं आहे. हा चीनने केलेला व्हायरल हल्ला आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे,” असं विजयवर्गीय म्हणाले.
“भारताला संकटात टाकण्यासाठी चीनने हा व्हायरल हल्ला केला आहे, असं आम्हाला वाटतं. कारण भारतातच करोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट बांग्लादेश, पाकिस्तान, भूतान वा अफगाणिस्तानात पसरलेली नाही. चीनचा हा व्हायरल हल्ला भारताच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी केलेला कटाचा भाग आहे. अशावेळी आपण देशासोबत एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. आम्ही पक्षासाठी नाही, तर देशासाठी काम करत आहोत,” असं विजयवर्गीय म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ऑक्सिजन तुटवड्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. ऑक्सिजन संकट उद्भवलेलं असताना पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. नौदल, लष्कर आणि वायूदलाची मदत घेतली गेली. नौका, विमान आणि ट्रेनच्या मदतीने ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. सुरूवातीचे चार-पाच दिवस आपल्याला त्रास झाला. आम्हाला दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि तिच्या परिणामांविषयी माहिती नव्हती,” असंही विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.
0 Comments