विवाहानंतर अवघ्या पाचच दिवसात नवर्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

विवाहानंतर अवघ्या पाचच दिवसात नवर्या मुलाचा कोरोनाने मृत्यू 

 वेब टीम केंद्रपाडा : ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आलीय. केंद्रपाड्यात एका २६ वर्षीय तरुणाला विवाहानंतर केवळ पाचव्या दिवशी आपल्या प्राणाला मुकावं लागल्याची घटना घडलीय. यानंतर या विवाहाला उपस्थित राहिलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींचा शोध घेणं आणि त्यांची चाचणी करण्याचं काम अधिकाऱ्यांनी सुरु केलंय.

राजकनिका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुर्गादेवी पाडा गावात राहणाऱ्या संजय कुमार नायक याचा विवाह १० मे रोजी पार पडला होता. नायक आपल्या विवाहासाठी बंगळुरूला आला होता. त्यावेळी त्याला ताप आणि कोविडची इतर लक्षणं जाणवत होती.

विवाहानंतर लगेचच प्रकृती खालावल्यानं संजय नायक याची करोना चाचणी करण्यात आली. १३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं.

राजकनिकाच्या सार्वजनिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या संजय नायक याला घरीच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र प्रकृती ढासळल्यानंतर त्याला तातडीनं भुवनेश्वरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथंच त्यानं १५ मे रोजी अखेरचा श्वास घेतला.

त्यानंतर एक मेडीकल टीम संजयच्या गावात पोहचली आणि त्यांनी वधुसहीत कुटुंबातील इतर सदस्यांचे नमुनेही करोना चाचणीसाठी घेतले. या विवाहात किती लोक सहभागी झाले होते आणि या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

ओडिशा आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत इथे ९४,२९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर राज्यात एव्हाना ५,२६,३५३ जणांनी करोनावर मात केलीय. राज्यात २३३५ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

करोना पार्श्वभूमीवर ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर १५ जूनपर्यंत भाविकांसाठी बंद करण्याची घोषणा मंदिर समितीकडून करण्यात आलीय. ओडिशा सरकारनं ५ मेपासून जाहीर केलेल्या लॉकडाऊननंतर हे मंदिर बंद आहे. 

Post a Comment

0 Comments