केरळ पॅटर्न महाराष्ट्रातही राबवा : भाकपाची मागणी

केरळ पॅटर्न महाराष्ट्रातही राबवा : भाकपाची मागणी

वेब टीम नगर : ‘देशभरातील अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. तुटवडा लस वाया जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा परिस्थितीत केरळमध्ये लसीकरण सुरळीत करण्यासोबतच उपलब्ध डोसचा पुरेपूर वापर केला जात आहे. लसीकरणाचा हा ‘केरळ पॅटर्न’ सध्या सर्वत्र चर्चेत असून ही पद्धत महाराष्ट्रातही अवलंबण्यात यावी,’ अशी मागणी येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ॲड . सुभाष लांडे यांनी याबाबत माहिती दिली. ‘केरळ राज्याला लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून ७३ लाख, ३८ हजार ८०६ डोस मिळाले होते. मात्र सरकारने त्यातून ७४ लाख, २६ हजार १६४ नागरिकांचे लसीकरण केले. म्हणजे त्यांनी तब्बल ८७ हजार, ३५८ अतिरिक्त नागरिकांना डोस दिले आहेत. प्रत्येक वायलमध्ये १० डोस असतात. त्या व्यतिरिक्त प्रत्येक वायलमध्ये एक बफर डोस असतो. सिरीजमध्ये लस भरताना तो वाया जाऊ शकतो. मात्र त्याचे अचूक नियोजन केल्यास तो वाचू शकतो हे केरळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, नर्सिंग स्टाफने दाखवून दिले आहे. केंद्र सरकारच्या अनियमिततेमुळे देशभरात लसीचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक राज्य लस मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत केरळ राज्याने लसीचा अपव्यय टाळला असल्याचे दिसून येते. ही कौतुकास्पद कामगिरी असल्याने जगभर कौतुक होत आहे,' असं लांडे म्हणाले.

'कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात जगभरासाठी आदर्श ठरत असलेले आरोग्याचे उत्तम कार्य केरळ राज्य करत आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. आरोग्यविषयक कामाने त्यांचे जगभरात कौतुक होत आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी आपापल्या राज्य सरकारांना या केरळ पॅटर्न नुसार लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तशी ती महाराष्ट्रातही करावी, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे लसीची नासाडी टळेल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध होईल,' असं त्यांनी म्हटलं आहे.

या मागणीचे निवेदन किसान सभेचे ॲड . बन्सी सातपुते, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, भारतीय महिला फेडरेशनच्या स्मिता गोविंद पानसरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा.डॉ. महेबुब सय्यद, भाकप जिल्हा सेक्रेटरी शांताराम वाळुंज, आयटकचे ॲड . सुधीर टोकेकर, विडीकामगार नेत्या भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, एआयवायएफचे संतोष खोडदे, फिरोज चाँद शेख, दीपक शिरसाठ यांनी सरकारला पाठविले आहे.

Post a Comment

0 Comments