२ ते १८ वयोगटासाठी 'कोवॅक्सीन 'ची शिफारस

२ ते १८ वयोगटासाठी 'कोवॅक्सीन 'ची शिफारस 

वेब  टीम नवी दिल्ली : देशात करोना संक्रमण आता लहान मुलांतही फैलावताना दिसून येतंय. करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेत देशातील लहान वयोगटाला सर्वात जास्त धोका असल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. यामुळेच, 'तज्ज्ञांच्या समितीनं' मंगळवारी २ ते १८ या वयोगटासाठी 'भारत बायोटेक'च्या कोविड विषाणूविरुद्ध लढणाऱ्या 'कोव्हॅक्सिन' या लसीच्या दुसऱ्या / तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची शिफारस केलीय.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रायल दिल्ली तसंच पाटण्याच्या एम्स तसंच नागपूरस्थित मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्युटसहीत वेगवेगळ्या स्थानांवर पार पडली जाईल.

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्था (CDSCO) च्या कोविड १९ विषयक विशेष तज्ज्ञांच्या समितीनं मंगळवारी 'भारत बायोटेक'द्वारे करण्यात आलेल्या अर्जावर चर्चा-विनिमय केला. या अर्जात कंपनीनं 'कोव्हॅक्सिन' लस २ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी सुरक्षा आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याच्या तसंच इतर गोष्टींच्या आकलन करण्याच्यादृष्टीनं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी देण्याची विनंती केलीय.

म्युटंटवरही परिणामकारक

अमेरिकन वर्तमानपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या बातमीनुसार, कोव्हॅक्सिन रुप बदलणाऱ्या करोना व्हायरसविरुद्ध शरीरात अँटीबॉडी तयार करण्याचंही काम करते. त्यामुळे, ही लस करोनाच्या म्युटंटवरही परिणामकारक ठरतेय.

राज्यांना पुरवठा सुरू

दरम्यान, भारत बायोटेकनं देशातील वेगवेगळ्या राज्यांनाही कोव्हॅक्सिन लस पुरवठा सुरू केला आहे. यामध्ये, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, जम्मू - काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments