परवानगी नसतांनाही डॉक्टरांचे रुग्णांवर उपचार

 परवानगी नसतांनाही डॉक्टरांचे रुग्णांवर उपचार  

दवाखान्यांना ‘सील’; चौकशीचे आदेश

वेब टीम संगमनेर : करोनाच्या दररोज वाढणाऱ्या आकडेवारीमुळे संगमनेरकरांच्या चिंता वाढत असताना तालुक्यात दोन होमिओपॅथिक डॉक्टर परवानगी नसतानाही संशयित करोना रुग्णांच्या प्रतिजन चाचण्या करून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तालुक्यातील साकुर येथील ही दोन्ही रुग्णालये प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, इन्सिडेन्ट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी लाखबंद (सील) केली असून या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

साकूर येथील डॉ. अविनाश रासने यांच्या समर्थ हॉस्पिटल आणि डॉ. संजय टेकुडे यांच्या ओमसाई हॉस्पिटलवर ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण समोर येत आहेत. यातील काही रुग्ण अत्यवस्थ असताना संगमनेरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली तर काहींचा वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, तहसीलदार निकम तालुक्यात सर्वत्र भेटी देऊन करोना स्थितीची पाहणी, आरोग्य केंद्रांना, संस्थात्मक विलगीकरण केंद्राना भेटी देत आहेत. बुधवारी दुपारी ते तालुक्यातील साकूर येथील स्थितीचा आढावा घेत होते. समर्थ व ओमसाई रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार केले जात असल्याचे त्यांना पाहणीदरम्यान समजल्याने त्यांनी या दोन्ही रुग्णालयांना भेटी दिल्या. त्या वेळी तेथील डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असून ते अ‍ॅलोपॅथीद्वारे करोना रुग्णांवर उपचार करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तसेच या रुग्णालयांमध्ये त्यांना प्रतिजन चाचण्यांचे संचही आढळून आले.

साकूर हे ठिकाण संगमनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण बाजारपेठेचे ठिकाण असून पठार भागातील सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. साकुरलगत अनेक गावे व वाडय़ावस्त्या असून येथे ग्रामीण रुग्णालय व पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध असताना खासगी रुग्णालयात करोनावर उपचार सुरू होते. गेल्याच आठवडय़ात प्रांताधिकाऱ्यांनी तालुक्यातील बोगस मुन्नाभाईचे प्रकरण समोर आणले असताना आता साकूरमध्ये सुरू असलेला हा वैद्यकीय बाजार त्यांनी समोर आणल्याने तालुक्यातील आरोग्य स्थितीची लक्तरे निघाली आहेत. कागदावर तालुका वैद्यकीय अधिकारी सर्व काही आलबेल असल्याचे भासवित असल्याचे देखील यामुळे समोर आले.

Post a Comment

0 Comments