माऊंट एव्हरेस्टवरही करोनाचा शिरकाव

माऊंट एव्हरेस्टवरही करोनाचा शिरकाव

 हिमालयातील इतर शिखरांनाही कोरोनानं ग्रासलं

वेब टीम नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवरही झालाय. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नार्वेमधून माऊंट एव्हरेस्टची चढाई करण्यासाठी आलेल्या एका गिर्यारोहकाला करोनाची लागण झाल्याने हा विषाणू जगातील सर्वात उंच शिखरं असणारा पर्वतरांगांमध्येही पसरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता हा विषाणू या पर्वतरांगांमधील इतर शिखरांवरही पसरलाय. त्यामुळे एव्हरेस्टच्या पश्चिमेला ३४५ किमीवर असणाऱ्या धौलागीरी पर्वत शिखरांवरही काही गिर्यारोहक अडकून पडले आहे. सीएनएनने गिर्यारोहकांना सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता या पर्वतरांगांमधून १९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र त्यापैकी सात जणांना करोनाची बाधा झाल्याचं चाचण्यांमधून समोर आलं आहे. इतर १२ जणांना लक्षणं दिसत असल्याने त्यांच्याही चाचण्या केल्या जाणार आहेत.


८८४८.८६ मीटर उंचीवरील एव्हरेस्टवरही करोना पोहचल्याचं दिसून येत आहे. एव्हरेस्टवरुनही ३० जणांना सुखरुप खाली आणण्यात आलं असून यापैकी अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पोलंडमधील गिर्यारोहक असणाऱ्या पावले मिचाल्सकीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. वर्ल्डोमीटर या वेबसाईटवरील माहितीनुसार शुक्रवारपर्यंत (७ मे २०२१ पर्यंत) जगभरातील १५ कोटी ६७ लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ३२ लाख ७० हजारांहून अधिक आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच चीन मार्गे होणारी एव्हरेस्टवरील चढाई बंद करण्यात आली आहे. चीनने गिर्यारोहकांना परवानगी नाकारली आहे. त्यानंतर नेपाळनेही गिर्यारोहकांवर बंदी घातली होती. मात्र काही काळापूर्वी ही बंदी नेपाळने उठवली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ही बंदी उठवल्यानंतर एप्रिल महिना संपेपर्यंत ३९४ जणांना एव्हरेस्टवर जाण्याची परवानगी देण्यात आली.

पर्यटन हे नेपाळमधील लोकांच्या उपजिविकेचे मुख्य साधन आहे. गिर्यारोहकांवरच अनेक नेपाळी उदर्निवाहसाठी अवलंबून असतात. मागील वर्षी नेपाळने बंदी घातल्याने या लोकांना मोठं नुकसान झालं होतं. यंदा सरकारने पुन्हा परवानगी दिल्याने या लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पर्यटकांना बायो बबल आणि सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याचं आस्वासन दिल जात आहे. मात्र अशा खडतर ठिकाणी करोनासंदर्भातील नियम पाळणे कठीण ठरतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


Post a Comment

0 Comments