कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमधील वाढता संसर्ग धोकादायक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमधील वाढता संसर्ग धोकादायक 

वेब टीम मुंबई : तुमच्या घरात जर लहान मुल असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जातेय. देशभरात सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही  लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे, या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना वेळीच करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात १ मार्च ते ४ एप्रिल२०२१ पर्यंत एकूण ६०,६८४ लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यातील सुमारे ९,८२२ मुले ५ वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या २० टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे.

'इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स'नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच १० वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.आधीच बेडस्, ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या तुटवड्याने दुसऱ्या लाटेत तोंडचं पाणी पळालंय. आता तिसऱ्या लाटेत जर लहान मुलांमध्ये हा संसर्ग वेगानं पसरला तर आताच त्याची तयारी व्हायला हवी. 

सध्याच्या घडीला लहान मुलांना देण्याची लस उपलब्ध नाही. रेमडेसिवीर आणि इतर औषधेही लहान मुलांना द्यावी की नाहीत याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे, लहान मुलांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य देणंही तितकंच आवश्यक आहे 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे.  'केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील ५ राज्यांमध्ये एकूण ७९हजार ६८८ मुले कोरोनाबाधित झाली आहेत.  छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे ५९४०, ७३२७, ३००४ आणि २७३३ इतका आहे. हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ११ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान  ११ हजार ३४४ कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली आहेत.

यावरून भविष्यातील मोठ्या संकटाची कल्पना येऊ शकते. अर्थात याकरता पालकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र काळजी जरुर घ्यावी आणि सरकारनंही असं संकट आलंच तर दक्ष रहावं. कोरोनाच्या या संकटाची झळ कोणत्या ना कोणत्या रुपात प्रत्येकच घराला बसलीय. घरातली चिमुरडी लाॉकडाऊनमध्ये घरातच थांबली. मात्र, आता कोरोनाचं संकट याच चिमुरड्यांपर्यंत पोहोचू द्यायचं नसेल तर आत्ताच कंबर कसणं गरजेचं आहे.

Post a Comment

0 Comments