१०वी ,१२ वीच्या परीक्षा अखेर पुढे ढकलल्या

 १०वी ,१२ वीच्या परीक्षा अखेर पुढे ढकलल्या 

वेब टीम मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची चर्चा झाली. अशावेळी दहावी बारावी विद्यार्थ्यांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतल आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.  

 नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने घेतला. त्याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द झाली असली तरी विद्यार्थ्यांना स्वाध्याय आणि चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रत्येक विषयासाठी स्वाध्याय किंवा चाचणी देऊन त्यांचं मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानुसारच विदयार्थ्यांचे गुण ठरवले जाणार आहेत, असे पत्र शाळांना मिळाले आहे. 

वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती.  इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आणि अजूनही ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा  या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री  वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.

Post a Comment

0 Comments