सन २०१६ पासून जिल्ह्यातील हिवताप रुग्ण संख्येत घट
जिल्ह्यात जागतिक हिवताप दिन साजरा
वेब टीम नगर: येथील जिल्हा हिवताप कार्यालय येथे आज जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन आणि मास्कचा वापर करुन व सोशल डिस्टंन्सिंग ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम हिवतापाचा प्रसार
करणा-या अनाफिलीस डास या शोधाचे जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.दादासाहेब साळुके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शून्य हिवताप रुग्ण उद्दिष्टाकडे वाटचाल (रिचिंग दी झीरो मलेरिया टार्गेट) ही यावर्षीच्या हिवताप दिनाची संकल्पनाआहे. याप्रसंगी जिल्हा हिवताप कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक हिवताप दिन दरवर्षी २५ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. हिवतापविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
नाशिक विभागाचे आरोग्य सेवा (हिवताप) सहायक संचालक डॉ. पी.डी. गांडाळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हिवतापासंदर्भात प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी आणि जनजागृती यामुळे यावर्षी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सन २०२५ पर्यंत अहमदनगर जिल्हा हिवतापयुक्त करण्याबाबतचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यात सन २०१६ पासून दरवर्षी हिवताप रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१६ मध्ये २३ रुग्ण, सन २०१७ मध्ये १३, सन २०१८ मध्ये ११, सन २०१९ मध्ये ०२, सन २०२० मध्ये ०४ आणि सन २०२१ (२५ एप्रिल अखेर) शून्य रुग्ण आढळले असल्याची माहिती डॉ. साळुंके यांनी दिली.(फोटो- हिवताप ,हिवताप-१)
0 Comments