गँगस्टर छोटा राजनला करोनाची लागण
तिहार तुरुंगात करोनाचा शिरकाव
वेब टीम नवी दिल्ली : तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात छोटा राजनला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे. यापूर्वी बिहारचा बाहुबली आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यालाही करोनाची लागण झाली होती.
तुरुंग क्रमांक दोनमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळं ठेवलं गेलं आहे, असं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात कुख्यात गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण २०१५ सालचं आहे. मुंबईतलं हे तिसरं प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
0 Comments