'परमवीर चक्र' सन्मानित अब्दुल हमीद यांच्या मुलाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

'परमवीर चक्र' सन्मानित अब्दुल हमीद यांच्या मुलाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

६१ वर्षीय मुलगा अली हसन यांच्यावर हॅलट रुग्णालयात उपचार सुरू होते.

वेब टीम कानपूर : पाकिस्तानविरुद्ध १९६५ साली झालेल्या युद्धात मरणोत्तर 'परमवीर चक्र' पुरस्कारानं सन्मानित अब्दुल हमीद यांच्या मुलाचा मृत्यू झालाय. अब्दुल हमीद यांचा ६१ वर्षीय मुलगा अली हसन यांच्यावर हॅलट रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, ऑक्सिजनअभावी अली हसन यांनी आपले प्राण सोडले. अली हसन यांचं कुटुंब हताशपणे डॉक्टरांकडे ऑक्सिजनची मागणी करत राहिले परंतु, ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.

अली हसन यांच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती ढासळली होती. श्वासोच्छवासात अडथळा जाणवल्यानंतर त्यांना तातडीनं रात्रीच हॅलट रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी कृत्रिम ऑक्सिजन दिल्यानंतर अली हसन यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. परंतु, चार तासांनंतर अली हसन यांची प्रकृती सुधारतेय असं सांगत डॉक्टरांनी ऑक्सिजन काढून घेतला होता.

त्यानंतर पुन्हा तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबीय डॉक्टरांकडे ऑक्सिजनची विनंती करत राहिले. परंतु, डॉक्टरांनी बाहेरून ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यास सांगितलं. काही व्यवस्था होण्याअगोदरच अली हसन यांनी आपले प्राण सोडले.

उल्लेखनीय म्हणजे, करोना संक्रमणकाळात देशातील अनेक राज्यांना ऑक्सिजनची चिंता भेडसावत आहे. उत्तर प्रदेशातही ऑक्सिजन पोहचवण्यासाठी 'ऑक्सिजन एक्सप्रेस'ची मदत घेण्यात येतेय.

रुग्णालयानं हसन अली यांची करोना चाचणी न करताच त्यांचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवला. शुक्रवारी सायंकाळी हसन अली यांचा मृतदेह गंज शहिदा कब्रस्तानात 'सुपुर्द-ए-खाख' करण्यात आला.

Post a Comment

0 Comments