मदतीसाठी आले आणि लुबाडून गेले

 मदतीसाठी आले आणि लुबाडून गेले  

वेब टीम मुंबई : एक तरुण एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला . युवकाने मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे काही निघाले नाहीत. तितक्यात पाठीमागे उभे असलेले दोघेजण तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने पुढे आले .  त्यांनी तरुणाकडील एटीएम कार्ड घेत या कार्डाचा पिन नंबरही प्राप्त केला आणि तरुणाला दुसरे कोणाचे कार्ड दिले. त्यानंतर या भामट्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये एटीएमकार्डद्वारे तरुणाच्या बँकखात्यातून ४५ हजार रुपये काढले. फसवणुकीचा हा प्रकार भिवंडीतील पडघा परिसरात घडला असून दोन आरोपींविरुद्ध पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यवसायात असलेला २७ वर्षांचा तरुण भिवंडीतील जांभुळपाडा येथे राहतो. सोमवारी दुपारी १२ वाजता हा तरुण पडघा येथील एटीएम सेंटरमध्ये १० हजार रुपये काढण्यासाठी गेला होता. मात्र मशिनमधून पैसे आले नाहीत. त्याचवेळी पाठीमागे उभे असलेल्या दोन व्यक्तींपैकी एकजण तरुणाजवळ आला आणि त्याने जास्त रक्कम टाकल्यामुळे पैसे येत नाहीत, असे तो बोलला. तरुणाने पाच हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील पैसे एटीएममधून आले नाहीत. त्यामुळे पाठीमागील व्यक्तीने तुम्ही एटीएम कार्ड चुकीच्या पद्धतीने टाकत आहात, असे बोलून त्याने तरुणाचे एटीएम कार्ड मशिनमधून बाहेर काढत पुन्हा मशिनमध्ये टाकले आणि तरुणाला पिन नंबर टाकण्यास सांगितल्याने तरुणाने पिन नंबर टाकला.

 तरीदेखील पैसे न आल्याने अखेर हा तरुण एटीएम कार्ड घेऊन घरी निघून गेला. थोड्या वेळानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा तरुणाला मेसेज आला. दुपारी एक वाजता तरुणाच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या रकमा असे एकूण ४५ हजार रुपये कोणीतरी परस्पर काढून तरुणाची फसवणूक केली. हा तरुण तात्काळ त्याचे खाते असलेल्या बँकेत गेला आणि चौकशी केल्यानंतर दुसरीच धक्कादायक बाब समोर आली.

कारण, तरुणाकडे असलेले एटीएम नवी मुंबईतील एका व्यक्तीचे होते. अशाप्रकारे भामट्यांनी तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने तरुणाकडील एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून तरुणाला दुसऱ्या व्यक्तीचे एटीएम कार्ड दिले. शिवाय भामट्यांनी अत्यंत चलाखीने तरुणाच्या एटीएम कार्डचा पिन प्राप्त करत अवघ्या एका तासात तरुणाच्या बँक खात्यातून एटीएम कार्डद्वारे पैसे काढत तरुणाची फसवणूक केली आहे.

Post a Comment

0 Comments