लग्नात २५ जणांपेक्षा जास्त गर्दी जमविल्याने ५० हजाररुपयांचा दंड

लग्नात २५ जणांपेक्षा जास्त गर्दी जमविल्याने ५० हजाररुपयांचा दंड 


वेब टीम गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १६ चेरपल्ली येथील लग्न समारंभात २५ हून अधिक लोक आढळल्याने प्रशासनाने सुरेश हनुमंता आत्राम यांना तब्बल ५० हजार रुपये दंड ठोठावला. गडचिरोली जिल्ह्यात या अगोदर धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथे लग्न समारंभात गर्दी आढळून आल्याने वधू-वरांचे आईवडील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, अहेरी नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या चेरपल्ली गावातील लग्न समारंभात दंडात्मक कारवाईनंतर गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे.

महाराष्ट्रासह गडचिरोली जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याआधी गर्दी न करण्याबाबत विविध आदेश दिलेले होते. तसेच कोणत्याही लग्नसोहळ्यात २५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही देखील संबंधित ठिकाणी लग्नसोहळ्यात दीडशेपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आढळून आल्याने अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी कारवाई करत संबंधितांकडून ५० हजार रुपये दंड वसूल केले. जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ही पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. 'मिशन ब्रेक द चेन'नुसार विविध आदेश देण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यालये, कोविड १९ व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवा वगळता उर्वरित कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थितीत कामकाज करावे, यासह प्रवासी वाहतूक, खासगी वाहतूक, लग्नसमारंभ आदींसाठी विविध नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची कारवाई करण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीच सांगितले आहे. मात्र, असे असतानाही लग्नसमारंभात २५ पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्याने नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली असून, ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे.

Post a Comment

0 Comments