ऑक्सिजन देता का ऑक्सिजन ....???

ऑक्सिजन देता  का ऑक्सिजन ....??? 

रुग्णांच्या समस्या सोडविण्याऐवजी महसूल समस्या वाढवतयं...

  वेब टीम नगर : कोरोना प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असला तरी ज्या रुग्णांना कायम ऑक्सिजनची  गरज आहे अशा  जुन्या रुग्णांकडे कोणी लक्ष देणार आहे का... त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे का.. काेविडचे रुग्णांच्या नादात जुन्यांकडे दुर्लक्ष का करत आहेत... त्यांना येणाऱ्या ऑक्सिजनच्या अडचणीची साेडवणूक काेण करणार आहे... गेल्या अनेक वर्षांपासून ऑक्सिजनवर  असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची आता ऑक्सिजन पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे म्हणून सैरावैरा धावाधाव सुरु आहे. याबाबत काेणी प्रशासनाला याबद्दल साकडे घालीत आहेत... काेणी ऑक्सिजन प्लॅंटवर जाऊन फाईल दाखवून आम्हाला एक टाकी ऑक्सिजन द्या म्हणून जिवाच्या आकंताने विनवणी करीत  आहेत ... पण काेराेनाच्या रुग्णांना ऑक्सिजन मिळेना तुम्हाला कसा द्यावा... तुम्ही तहसीलदार व जिल्हाधिकार्यांशी बाेला.. तेच मदत करतील म्हणून वाटे लावत आहेत... याबाबत अनेकांनी तालुका व जिल्ह्याची जबाबदारी असणाऱ्याना दूरध्वनीवरून व्यथा मांडल्या.. पण त्यांनीही हात वर केले आहे... साहेब रुग्णाला ऑक्सिजन पाहिजे... काेविडबराेबरच जुन्या रुग्णांकडे लक्ष द्या म्हणून अनेकजण पाेटतिडकीने मागणी करीत आहेत . तरीही पाषाण हृदयी अधिकाऱ्याना पाझर फुटत नाही.   

अस्थमा, फुफ्फुस व इतर आजारांनी जिल्ह्यातील काहीजणांना ग्रासलेले आहे. अशा रुग्णांना कायम हाॅस्पिटलमध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार करणे संबंधित कुटुंबियांना न परवडणारे असल्यामुळे डाॅक्टरांनी संबंधित रुग्णांना घरीच ऑक्सिजनचा  पुरवठा करावा, असा सल्ला देऊन याेग्य मार्गदर्शन करून घरी साेडलेले आहे. डाॅक्टरांनी अनेक रुग्णांना ऑक्सिजनसाठी कन्सेंटरेटर (ऑक्सिजन यंत्र) खरेदी करायला लावलेले आहे. या कन्सेंटररेटरबराेबरच टाक्यांमधील ऑक्सिजन रुग्णांना द्यावा, असा सल्ला दिलेला आहे. त्यानुसार वर्षानुवर्षे अनेक रुग्ण घरीच ऑक्सिजन घेत आहे. ते आनंदाने त्यांचे जीवन जगत आहे. मात्र अशा सर्वच रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियावर आता माेठा डाेंगर काेसळलेला आहे.

काेराेनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे ऑक्सिजनला  मागणी वाढलेली असून त्याचा तुटवडा जिल्ह्यात जाणवू लागलेला आहे. हाॅस्पिटलमध्ये ही ऑक्सिजनच तुटवडा जाणवू लागलेला आहे. सर्वसामान्य रुग्णांना ताे मिळणे अशक्य झालेले आहे. घरातील रुग्णाला ऑक्सिजनची साेय व्हावी, यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु झालेली आहे. महसूलच्या कार्यालयांच्या पायर्या अनेकांना झिजविण्याची वेळ आलेली आहे. 

तालुक्याकडून न्याय न मिळाल्याने अनेकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी दूरध्वनी करून याबाबत माहिती दिलेली आहे. इमाने इतबारे काम करणाऱ्या प्रशासनातील कर्मचार्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून संपूर्ण हकीकत एेकून घेतली. त्यानंतर आपल्या वरिष्ठांशी याबाबत बाेलण्यास सांगितले. त्यानंतर तेथील एका अधिकार्याला पुन्हा सर्व माहितीचे कथन नातेवाईकांनी दूरध्वनीवरून केले. ते ऐकून झाल्यानंतर संबंधितांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत हाेत आहे. उद्या तुम्हाला ऑक्सिजन मिळेल, नाही मिळाला तर परत उद्या काॅल करा असे सांगून बाेळवण केली आहे. परंतु तुम्हाच्याकडे आता ऑक्सिजनची  सुविधा काय आहे... ऑक्सिजन किती शिल्लक आहे, हे विचारण्याची सदबुध्दी या पाषाण हृदयी अधिकाऱ्यांना मात्र सूचली नाही.

काेविडचे रुग्ण वाचविण्याच्या नादात प्रशासनाकडून इतर रुग्णांवर अन्याय सुरु झालेला आहे. आम्हाला काेवीडचे रुग्ण महत्वाचे आहे.. तुम्हाला घरी ऑक्सिजन देण्याची परवानगी काेणी दिली...  असा प्रश्न एका महसूलमधील अधिकार्याने एका नातेवाईकाला केला. डाॅक्टर अशा रुग्णांना कन्सेंटरेटर वापरण्यास सल्ला देतात ते विकत घ्या, असे सांगून त्या अधिकार्याने आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकली.

वर्षानुवर्षे घरात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांसाठी नातेवाईकांनी कन्सेंटरेटर मशीन खरेदी केलेले आहेत. मात्र जसे जास्त काम केल्यावर माणूस थकताे, तशी ती मशनरीही थकत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर अधिक थकते. मशीन गरम झाल्यानंतर त्यातून अनेकदा ऑक्सिजन गरम येत असल्यामुळे त्याचा रुग्णाला त्रास हाेताे. त्यामुळे टाकीतील ऑक्सिजन रुग्णांना देणे महत्वाचे असते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी नातेवाईकांकडून या ऑक्सिजनची मागणी हाेत आहे. मात्र प्रशासन आपल्या आडेलभूमिकेत राहून नागरिकांच्या व्यथाच समजून घेत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे आजारी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात नेमके अधिकारी नागरिकांच्या अडचणी साेडविण्यासाठी बसविलेले आहेत की सल्ले देण्यासाठी असाच सवाल आता रुग्णांच्या नातेवाईकांमधून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments