म्हणे "ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवा "

 म्हणे "ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवा "

पियुष गोयल यांचे बालिश विधान 

नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत असताना अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजनच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येतंय. याच दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिलाय. ऑक्सिजनच्या पुरवठ्यास चालना देण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधून काढण्यासाठी आरोग्य अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि खासगी क्षेत्रातील भागधारकांची भेट घेतल्याचंही आज पीयूष गोयल यांनी म्हटलंय.

देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याचं दिसून येतंय. रुग्णालयांत दाखल होऊनही ऑक्सिजन पुरवठा न होऊ शकल्यानं काही रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे.अशा वेळी पीयूष गोयल यांनी, 'रुग्णांना जेवढी गरज असेल तेवढ्याच ऑक्सिजनचा वापर करावा. अनेक ठिकाणी गरज नसतानाही रुग्णांना ऑक्सिजन दिला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत', असं ट्विट पीयूष गोयल यांनी केलं आहे.

न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य सरकारनं मेडिकल ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवायला हवी. मागणी आणि पुरवठ्याचं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. कोव्हिड १९ चा संसर्ग रोखण्याचं काम राज्य सरकारचं आहे, ही जबाबदारी त्यांनी निभवायला हवी' असंही पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.

'कोव्हिड रुग्णांची संख्या अशाच अनियंत्रित पद्धतीनं वाढत राहिली तर याचा देशाच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होईल. आम्ही राज्य सरकारसोबत उभे आहोत, परंतु त्यांनी मागणीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे तसंच कोव्हिड संक्रमण रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील', असंही पीयूष गोयल यांनी म्हटलंय.

पीयूष गोयल यांनी दिलेल्या सल्ल्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केलीय. 'पीयूष गोयल यांच्या असंवेदनशील वक्तव्याची निंदा करतो. आपल्या खासगी वापरासाठी नाही तर रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांसाठी राज्य सरकारांना ऑक्सिजनची मागणी केली आहे' अशी प्रतिक्रिया गेहलोत यांनी दिलीय.

तर, 'संक्रमण फैलाव रोखण्याचं काम राज्यांचं आहे पण क्रेडिट घेण्याचा मात्र अधिकार पंतप्रधानांचा आहे' असा टोला माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रस नेते जयराम रमेश यांनी भाजप सरकारला लगावलाय.

तर, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षानं आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर प्रतिक्रिया दिलीय. 'यातील मागणी व्यवस्थापनाचा अर्थ काय? आपात्कालीन पुरवठा करण्याऐवजी मंत्री महोदय रुग्णांना आपले श्वास सीमित करण्याचा सल्ला देत आहेत की त्यांनी मृत्यू स्वीकारावा? ही गुन्हेगारी प्रवृत्तीची क्रूरता आहे' असं सीपीआय (एम)नं म्हटलंय.

यापूर्वी, गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजच्या मागणी आणि पुरवठ्यातील अंतर दूर करण्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं होतं. यावर पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांवर 'तुच्छ राजकारण' करण्याचा आरोप केला होता.

'उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या ऑक्सिजनसंबंधी राजकारण पाहून मी दु:खी आहे. भारत सरकार सर्वांसोबत एकत्रितपणे देशात ऑक्सिजनचं जास्तीत जास्त उत्पादन सुनिश्चित करत आहे. आम्ही सध्या ११० टक्के क्षमतेसह ऑक्सिजन तयार करीत आहोत तसंच वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी उद्योगांच्या वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा तूर्तास थांबवण्यात आला आहे' असंही पीयूष गोयल यांनी म्हटलं होतं. 

Post a Comment

0 Comments