नातेवाईकांचा संयम का सुटतो ? .... कोरोनाग्रस्ताच्या मृत्यू नंतर रुग्णालयाची तोडफोड
वेब टीम नगर : एका कोरोना ग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना आज घडली. कोरोना ग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांच्या भावना संतप्त होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत मात्र सतत घडणाऱ्या या घटनांमागची मानसिकता प्रशासनाने लक्षात घ्यावी अशी भावना नागरीकातून व्यक होत आहे.
नगर तालुक्यातील वाकडी या गावातील एका करोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णाच्या नातेवाइकांनी यावरून खूप गोंधळ घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तोडफोडीचा पंचनामा केला. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी फिर्याद दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, असे तोफखाना पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत उपचार होत नसल्याबद्दल तक्रारी केल्या जात होत्या. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले होते. मात्र आता थेट तोडफोडीची घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, नगरमधील बधितांची संख्या कमी होत नाही. आज साडेतीन हजारांवर नवे रुग्ण आढळून आले आहेत. सुमारे १९ हजार रुग्णांवर उपचार सुरू असल्याने यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.
एखाद्या कोरोना बाधिताला त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या नातेवाईकांची बेड मिळवण्यासाठी होणारी धावाधाव त्यानंतर रेमडेसिवीर च्या इंजेक्शन साठी करावी लागणारी वणवण व त्यातूनच मधेच संपणारा ऑक्सिजन इतक्या सगळ्या दिव्यातून पार पडल्यानंतर जर रुग्ण दगावला तर नातेवाईकांची होणारी विमनस्क अवस्था आणि त्यातून घडणारे तोडफोडीसारखे प्रकार यातून नातेवाईकांचे भावनिक संतुलन सुटते. यापूर्वीही एका बधिताला अनेक रुग्णालये फिरून आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच अखेरचा श्वास घ्यावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाने रुग्णांना तातडीने बेड मिळावा ,औषधे उपलब्ध व्हावीत , मुबलक ऑक्सिजन मिळावे यासाठी प्रयत्न करावे गरजेचे आहे. अन्यथा जीव गमावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही.
0 Comments