प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोविड मदत व सहाय्यता केंद्र उभी करावीत : आ. डॉ. सुधीर तांबे

प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोविड मदत व सहाय्यता केंद्र उभी करावीत : आ. डॉ. सुधीर तांबे 

वेब टीम नगर  : सध्या कोरोनाने गंभीर स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात देखील प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात कोविड मदत व सहाय्यता केंद्र उभी करावीत, अशा सूचना आ. डॉ. सुधीर तांबे यांनी पदाधिकऱ्यांना केल्या आहेत.

तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व फ्रंटल प्रमुख आदींची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आ. तांबे यांनी याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी बैठकीला आ. लहू कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी कोविड सहाय्यता व मदत केंद्र राज्यभरात उभे करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नगर जिल्ह्यात देखील याची अंमलबजावणी पक्षाच्यावतीने केली जाईल. सध्या नगर जिल्ह्यात नागरिकांना बेड मिळणे, व्हेंटिलेटर मिळणे, रेमडीसेवर इंजेक्शन उपलब्ध होणे अशा विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी कंट्रोल रूम स्थापन केली आहे. मात्र प्रशासनाला सहाय्यभूत होईल आणि नागरिकांना थेट मदत होईल अशा पद्धतीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चोवीस तास सेवा देणारे तालुकास्तरावर कोविड मदत व सहाय्यता केंद्र उभी करावीत.

या केंद्रांचे हेलपलाईन क्रमांक वर्तमानपत्रां मधून आणि सोशल मीडियातून व्हायरल करावेत. महसूल मंत्री. ना. बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विशेषतः रेमडीसेवर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील यासाठी ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याचे आ. तांबे यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

आ. लहू कानडे म्हणाले की, श्रीरामपूर मध्ये ५०० बेडचे कोविड केअर सेंटर जनतेसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ५० ओक्सिजन बेडचे स्वतंत्र हॉस्पिटल उभे करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. श्रीरामपूरसह जिल्ह्यात कुठेही रेमडीसेवर इंजेक्शन मिळण्यात नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी पक्षाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड मदत व सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्ते काम करतील. राजेंद्र नागवडे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका आणि परिसरातील जनतेसाठी   २५० बेडचे कोविड केअर सेंटर उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जाणार आहे. 

त्या-त्या तालुक्यातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या कोविड मदत व सहाय्यता केंद्रांशी संपर्क साधत आपल्या अडचणी आमच्या पर्यंत पोहोचवाव्यात. स्थानिक पदाधिकारी सर्वतोपरी मदत करतील, असे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी म्हटले आहे. यावेळी मधुकर नवले, राजेंद्र नागवडे, अनुराधाताई नागवडे, बाबा ओव्हाळ, हिरालाल पगडाल, प्रवीण घुले किरण पाटील, अरुण नाईक, बाळासाहेब आढाव आदींसह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments