एकतर्फी प्रेमातून तरुणीचे ओठ कापले

एकतर्फी प्रेमातून तरुणीचे ओठ कापले 

वेब टीम नवी मुंबई : एकतर्फी  प्रेमातून एका तरुणाने तरुणीचे चाकूने ओठ कापल्याची धक्कादायक घटना  ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये  घडली आहे.. या घटनेनंतर आरोपी जखमी तरुणीला घटनास्थळीच सोडून फरार झाला. या गुन्ह्यात आरोपी तरुणाला त्याच्या मित्राने मदत केली. त्या दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी पीडित तरुणीला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनांबद्दल पोलिसांच्या माहितीनुसार, किडवई नगर येथील २३ वर्षीय तरुणाचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मागील वर्षभरापासून तरूण तिचा पाठलाग करत होता. त्याने तिला लग्नाची मागणीही घातली होती. मात्र, तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यावर त्याने तरुणीला धमकावले होते.

तरुणीने आरोपीने दिलेल्या धमकीकडे दुर्लक्ष केले. तरुणी काही कामानिमित्त घरातून बाहेर पडली. त्यावेळी आरोपी आणि त्याच्या मित्राने तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यातच थांबवले. दोघांनी तिचे हात पकडून ठेवले. त्यानंतर चाकूने तिचे ओठ कापले.

तरुणीवर हल्ला करून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. तरुणीला जखमी अवस्थेत तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे ओठांवर शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


Post a Comment

0 Comments