चार जणींची हत्या करून आरोपी फरार

 चार जणींची हत्या करून आरोपी फरार 

वेब टीम जमशेदपूर : झारखंडमधील जमशेदपूर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील टाटा स्टीलमध्ये अग्निशमन केंद्रात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपली पत्नी, दोन मुली आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षिकेची हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला. आरोपीचा मोबाइल फोन आणि त्याचा फेसबुक अकाउंट बंद आहे, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलच्या अग्निशमन दलात काम करणाऱ्या दीपक कुमार याने आपली पत्नी, दोन मुली आणि त्यांची शिकवणी घेणारी शिक्षिका रिंकी कुमारी यांची हत्या केली. दीपक कुमारने चौघांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून फरार झाला. रक्त घराबाहेर सांडलेले होते. ते पाहिल्यानंतर शेजाऱ्यांना घटनेबाबत समजले. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता, हादरून गेले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. घर सील केले आहे. आजूबाजूचे लोक घटनेनंतर वेगवेगळी चर्चा करत आहेत. अनैतिक संबंधांवरून हे हत्याकांड घडल्याची चर्चा सुरू आहे. दीपक कुमारच्या दोन मुली एक सात वर्षांची, तर एक तीन वर्षांची मुलगी एका शाळेत शिकत होत्या. त्यांची रिंकी कुमारी या शिकवणी घेत होत्या. दीपक कुमारची पत्नी त्याच्यावर संशय घेत होती. त्या शिक्षिकेला ती घरात येऊ देत नव्हती. मात्र, मुली तिच्याकडेच शिक्षण घेतील, असा त्याचा हट्ट होता. त्याचवरून त्यांच्यात भांडण सुरू होते. याच कारणावरून हे हत्याकांड घडले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पत्नी आणि दोन्ही मुलींचे मृतदेह एका खोलीत आढळून आले. तर दुसऱ्या खोलीत शिक्षिकेचा मृतदेह खोलीतील पलंगात एका बॉक्समध्ये होता. दीपक कुमार याची सासुरवाडी ही जमशेदपूरमध्येच होती. पत्नीचे दागिने तो घेऊन गेला आहे. जमीन खरेदी करण्याचे कारण त्याने सांगितल्याची माहिती त्याच्या सासुरवाडीच्या लोकांनी दिली.

Post a Comment

0 Comments