एप्रिलअखेर पर्यंत संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करा

एप्रिलअखेर पर्यंत संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करा

जिल्हा प्रशासनाचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

वेब टीम नगर: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासन सातत्याने विविध उपाययोजना राबवित असून तालुका आणि गाव पातळीवर त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी,  यादृष्टीने कार्यरत आहे.  येत्या ३० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहेत. त्याचबरोबर, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन एप्रिल महिनाअखेर संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधा उभारणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या सूचनेनुसार आज निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी सर्वश्री उदय किसवे, डॉ.अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, जयश्री आव्हाड, उज्ज्वला गाडेकर, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेन्द्र बडदे आदींची उपस्थिती होती.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशन संपूर्ण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांवर संस्थात्मक पातळीवरच उपचार केले जावेत. तालुकापातळीवर घटना व्यवस्थापक तसेच आरोग्य यंत्रणेने यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री. निचित यांनी दिल्या. कोविड केअर सेंटरमधील सुविधा, बेडस व्यवस्था, औषधसाठा आदी बाबी योग्य प्रमाणात असतील, याकडे लक्ष द्यावे. विनाकारण रुग्णाला जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करु नये.  केंद्र सरकार तसेच आरोग्य यंत्रणा पोर्टलवरील माहितीवरुन जिल्ह्याचे विश्लेषण करतात. त्यामुळे सर्व यंत्रणांनी अद्यावत माहिती या पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी इतर नोडल अधिकारी यांनीही त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारी आणि त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला पूर्ततेच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments