नगरटुडे बुलेटीन 06-04-2021

नगरटुडे बुलेटीन 06-04-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सलून व्यवसायवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ दशक्रिया विधी बंद : नाभिक महामंडळाचा इशारा

   वेब टीम नगर : सलून व्यवसाय करण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दशक्रिया विधीसह सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू. तसेच शासनाने२०,००० रुपयांची आर्थिक मदत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरविण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा शांताराम राऊत, उत्तर विभागीय सरचिटणीस सुनिल वाघमारे, राज्य कार्य.सदस्य विकास मदने, जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी, शहराध्यक्ष विशाल मदने आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी लॉकडाऊन जसा सुरु झाला, तेव्हापासून महाराष्ट्रातील सलून व्यवसाय मोडकळीस आला आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही शासनाकडे बिहार, आंध्रप्रदेश, राज्यस्थान या राज्यामध्ये सलून व्यवसायाला ज्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ही २०,०००आर्थिक मदत करावी. तसेच गाळा भाडे, लाईट बील माफ करण्यात यावे. यासाठी नगर शहरामध्ये आमरण उपोषण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरुपाचे आंदोलन झाले. नगर येथील उपोषण ना.ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाचे प्रश्‍न सोडविले जातील. योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असे आश्‍वासन दिले, आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.

     सलून आणि ब्युटी पार्लर या संदर्भात आपण ३० एप्रिल पर्यंतची जी बंदची घोषणा केली आहे. त्याबाबत आपण नाभिक समाजावर एक प्रकारचा मोठा आघात केलेला आहे, आपण सर्व आस्थापनांना व गर्दी होणार्‍या ठिकाणांना काम करण्याची सकाळी आठ ते सायंकाळी सात पर्यंत सवलत दिलेली आहे. मग सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकच आपण टार्गेट करीत आहात. आमच्या सलूनमध्ये आम्ही गर्दी होऊ देत नाही व जवळून जरी काम करत असलो तरी सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून काम करतो. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्ही आमचे व्यवसाय अतिशय काळजीपूर्वक, सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून करत आलेलो आहोत. आम्हालाही आमच्या जीवाची पर्वा आहे. सलून व्यववसायिक हा पोटावर हात असणारा आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना रोजची गुजरण करत आहे. दिवसभरात केलेल्या कामावर तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात इतका मोठा बंद म्हटल्यानंतर त्यांच्या कुटूंबावर उपासमारी शिवाय किंवा आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आम्ही व्यवसाय आठ दिवसांपर्यंत बंद ठेवणे सहाजिक आहे. हे संपूर्ण महिनाभर बंद ठेवणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक कारागीरास रु.२०,००० मानधन देण्यात यावे. तसेच आम्ही सलून दुकान बंद ठेवू अन्यथा येणार्‍या काळात आम्ही सहकुटूंब व सहपरिवार रस्त्यावर येऊ, असेही निवेदनात म्हटले आहे.

     निवेदनावर शिवाजी दळवी, अरुण वाघ, बापू क्षीरसागर, नासिर शेख, इम्रान शेख, अब्दुल रहेमान, सतीश साळूंके, अशोक खामकर, सुरेश राऊत, राजेंद्र ताकपेरे, दिपक बिडवे, बाळासाहेब शेजूळ, गणेश कदम, अजय कदम, सुनिल खंडागळे, संतोष वाघमारे आदिंसह सलून व्यवसायिकांच्या सह्या आहेत.







-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंडित दीनदयाळ पतसंस्थेची अत्याधुनिक मोबाईल ॲप बँकिंग सेवा सुरु

 वसंत लोढा : २९ वी वार्षिक सभा ऑनलाईन संपन्न

   वेब टीम नगर : पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व सभासदांना आधुनिक व चांगली तत्पर सेवा मिळावी यासाठी पतसंस्थेच्या कारभारात काळानुरुप बदल करत आधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा देताना आता डीजीटल बँकिंग क्षेत्रात प्रवेश करत आहोत. दीनदयाळ पतसंस्थेने आता स्वतःचे मोबाईल ॲप सुरु केले आहे. त्यामुळे या अत्याधुनिक बँकिंग सुविधांमुळे ग्राहकांना पतसंस्थेशी ऑनलाइन व्यवहार करता येणार असल्याने ग्राहकांचा मौलिक वेळ व पैसा वाचणार आहे. त्यामुळे सर्व  ग्राहकांनी आपल्या मोबाईल मध्ये दीनदयाळ पतसंस्थेचे ॲप डाऊनलोड करून या आधुनिक सेवांचा जास्ती जास्त लाभ घ्यावा. गेल्या वर्षापासून आलेल्या करोना संकट काळातही दीनदयाळ पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावला आहे. अनेक महिला बचत गटांना पतसंस्थेने कर्ज देवून महिलांना उद्दोजीका बनवण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे, अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केले.

     पंडित दीनदयाळ पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष वसंत लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी मानद सचिव विकास पाथरकर, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, जेष्ठ संचालक सुधीर पगारीया, शैला चंगेडे, डॉ. ललिता देशपांडे, नकुल चंदे, किरण बनकर, नरेंद्र श्रोत्री आदींसह सभासद ऑनलाईन सहभागी झाले होते.

    मानद सचिव विकास पाथरकर म्हणाले, शहरात अनेक बँका व पतसंस्था आहेत. मात्र स्पर्धेच्या व मंदीच्या काळातही दीनदयाळ पतसंस्थेचा उत्कृष्ट व विना तक्रार कारभार होत आहे. यात सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचा मोलाचे योगदान आहे. करोनाच्या संकटा मुळे  कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी संयमाने पण रीतसर कर्ज वसुली करत एनपीए कमी करण्यात यश आले आहे. केवळ नफा कमविणे हा उद्देश नसून झालेल्य नफ्यातून काही भाग हा सामाजिक कार्यासाठी खर्च करत आहे.

     महिला बचत गट योजने बद्दल माहिती देतांना सुधीर पगारिया म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सुचविलेली अंत्योदय योजना आम्ही महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी कुटूंब उभे केले आहे. या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी दीनदयाळ पतसंस्था महिला बचत गट कर्ज योजना राबवत आहे.

          सभेचे सूत्रसंचालन किरण बनकर यांनी केले, व्यवस्थापक निलेश लाटे यांनी अहवाल वाचन केले. उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रा.मधुसूदन मुळे, मंगेश निसळ, प्रा.सुनील पंडित, भैय्या गंधे, सचिन पारखी, मुकुंद वाळके, हेमंत मिरीकर आदींनी चर्चेत भाग घेत सूचना केल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

नागरदेवळे येथे दि.९रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

    वेब टीम  नगर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने शुक्रवार दि.९एप्रिल  रोजी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळे येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.

     सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. रुग्णांची राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे.  कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाचे सर्व नियम पाळून हे शिबीर होणार आहे.

     तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. जालिंदर बोरुडे मो.नं.९८८१८१०३३३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वैभव कॉलनीतील समस्या दूर करण्याची राहिवास्यांची आयुक्त ,महापौरांकडे मागणी.

वेब टीम नगर : वार्ड क्रमांक ५ मधील वैभव कॉलनी येथे गेल्या १ आठवड्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे येथील राहिवास्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागात त्वरित शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी वैभव कॉलनी येथील राहिवास्यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे व पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

आ. संग्राम भैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत दिघे यांच्या  शिस्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी दादा वाघ, अजयकुमार गुप्ता, शेखर काळे, मंगलेश गुप्ता व वैभव कॉलनी येथील रहिवासी मंदाकिनी दिघे, पद्मा कुलकर्णी, शुभांगी केसकर, अश्विनी वैद्य, स्मिता पिपाडा, अंकिता देवचके, आरती वाघ, जयश्री राऊत, सुवर्णा पवार, तृप्ती चव्हाण, शारदा वैद्य, निता चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक ५ मधील वैभव कॉलनी परिसरात बंदिस्त पाईप गटार योजनेचे काम अत्यंत घाई घाईने करण्यात आले. यावेळी जुन्या ड्रेनेज लाईनचे पाईप जे सी बी च्या साहाय्याने काढतांना या भागातील पिण्याचे पाणी पूरवठा करणारे पाईप व नळ जोड अनेक ठिकाणी उखडले गेले. त्यामुळे हे संपूर्ण पाईप लाईन येथील नागरिकांना स्व खर्चाने बदलून घ्याव्या लागल्या. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड येथील राहिवास्यांना सोसावा लागला. 

श्री संत गाडगेबाबा वसतिगृह ते वैभव कॉलनीतील शेवटच्या अपार्टमेंट कडे जाणारा ५०० मिटर लांबीचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वैभव कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे तसेच रामेश्वर मंदिर परिसर व वैभव कॉलनीतील रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट एल.इ. डी. व हायमॅक्स बसविण्यात यावेत. या परिसरात पूर्ण दाबाने पुरेशा प्रमाणात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. 

वैदूवाडी ते वैभव कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये टाकण्यात आलेले खडी, वाळू, विटा व सिमेंट हे बांधकाम साहित्य ताबडतोब हटवून हा रस्ता वैभव कॉलनीतील राहिवास्यांच्या रहदारीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या बाबत येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास वैभव कॉलनीतील नागरिक महापौर व आयुक्तांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

याबाबत विक्रांत दिघे, पद्मा कुलकर्णी, अंकिता देवचके, स्मिता पिपाडा यांनी आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे व पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली असता येत्या २ दिवसात आपल्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी


ट्रस्ट व महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधकाम केल्याचा आरोप

वेब टीम नगर : शहरातील जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेत करण्यात आलेले बेकायदेशीर नवीन बांधकामाचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे निवेदन ट्रस्टचे विश्‍वस्त व मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, विश्‍वस्त आरिफ खान, हाजी वाहिद कुरेशी, अन्सार सय्यद, शेख अब्दुल कादिर, बरकतअली शेख, मुजाहिद कुरेशी आदी उपस्थित होते. सदर अतिक्रमण तीन दिवसात न हटविल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील जुन्या कोर्टाच्या मागील बाजूस जामा मशिद आहे. ही मशिद औरंगाबाद वक्फ बोर्डकडे कायदेशीर नोंदणीकृत असून, ही मस्जिद एतिहासिक आहे. शहरातील सर्वात मोठी मशिद असून, शहरातील या जामा मशिदेला धार्मिक महत्त्व आहे. मशिदीच्या जागेत ट्रस्ट व महापालिकेची कोणत्याही प्रकारे पूर्वपरवानगी न घेता गॅसोद्दीन शब्बीर हुसेन शेख याने बेकायदेशीर बांधकाम सुरु केले आहे. सदर इसमाने लोखंडी अँगल उभे करुन बांधकाम सुरु केले आहे. सदर बांधकाम मशिदीच्या प्रवेशद्वारातच असल्याने ऐतिहासिक वास्तूपासून अत्यंत जवळ आहे. शासनाच्या नियमानुसार ऐतिहासिक वास्तूपासून तीनशे मीटरच्या आत कोणतेही बांधकाम खोदकाम पूर्वपरवानगीशिवाय करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील गॅसोद्दीन शेख यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरु केलेले आहे. अतिक्रमण विभागाने सदर बांधकामाची स्थळ पाहणी करून पंचनामा केलेला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रभाग अधिकारी याने शेख यांना पत्र पाठवून सदर ठिकाणी चालू असलेले बांधकाम थांबवून बांधकाम परवानगीचा तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे कळविले होते. तरी देखील अतिक्रमण करणार्‍या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे खुलासा केलेला नाही. सदर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी देखील महापालिकेच्या पुर्वपरवानगीने बांधकाम न करण्याचे सुचवले होते. परंतू सदरचे बांधकाम सुरु ठेवण्यात आलेले आहे. हे अनाधिकृत बांधकाम तीन दिवसाच्या आत न पाडल्यास महापालिकेत मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोटरी इंटिग्रिटीने माणुसकीच्या संवेदना जपल्या 

आ.संग्राम जगताप : हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्कचे वाटप

वेब टीम नगर : वाढते ऊन व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने शहरातील हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क वाटप उपक्रमाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. माळीवाडा बस स्थानक व जुनी महापालिका येथील रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या कष्टकरी बांधवास छत्री व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी, सचिव सुयोग झंवर, नगरसेवक आसिफ सुलतान, उद्योजक पै.अफजल शेख, डॉ. रिजवान अहेमद, अय्युब खान आदींसह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीत सर्वसामान्य हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यांना रोटरी सारख्या विविध सामाजिक संघटनांनी आधार देण्याचे कार्य केले. सध्या देखील कोरोनाचे संक्रमण व उन्हाची तीव्रता वाढत असताना हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधव घटक दुर्लक्षीत राहू नये या भावनेने रोटरी इंटिग्रिटीच्या वतीने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. रोटरीने माणुसकीच्या संवेदना जपण्याचे कार्य केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी म्हणाले की, कष्टकरी बांधव मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने त्यांचे ऊन, पाऊस व कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी रोटरी इंटिग्रिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन, शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क देण्यात येणार असल्याची माहिती दिली. रणरणत्या उन्हात व्यवसायासाठी डोक्यावर छत्रीच्या रुपाने सावली दिल्याबद्दल लाभार्थींनी रोटरीचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने

आ. संग्राम जगताप यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव

वेब टीम नगर :  जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी आमदार जगताप यांना सन्मानपत्र प्रदान केले.  यावेळी संभाजी पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस गणेश बोरुडे, आढाव सर, दीपक खेडकर, प्रवीण शिंदे, अमोल येवले, श्रीकांत कुटे आदी उपस्थित होते.    

शरचंद्र आढाव म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात आमदार संग्राम जगताप यांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. हातावर पोट असलेल्या श्रमिक कामगार कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रेशनिंग व किराणा किटचे वाटप केले. अनेक गरजूंना रुग्णालयात बेड उपलब्ध करुन आयुर्वेद महाविद्यालयात कोविड सेंटरची उभारणी केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देखील ते सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य करीत असून, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना कोरोना योध्दा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय पाठशाळेस युकेचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त


वेब टीम नगर : येथील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल या विद्यालयास गुणवत्तापूर्ण व्यवस्थानाच्या कार्याबद्दल आय.एस.ओ. 9001-2015 चे मानांकन मिळाले. या आय.एस.ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रा. सुनिल पंडित यांच्या हस्ते राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांना प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनपाचे विषयतज्ञ अरुण पालवे उपस्थित होते.

प्रशासकीय अधिकारी सुभाष पवार म्हणाले की, राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल विद्यालयाने कात टाकली आहे. या शाळेने अमूलाग्र बदल केल्याचे दिसत आहे. या संस्थेचे सेक्रेटरी अ‍ॅड. विद्याधर काकडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व मार्गदर्शनाने तसेच मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे व सर्व शिक्षकांच्या परिश्रमामुळे शाळेचे रुप बदलले आहे. म्हणूनच गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी आय.एस.ओ. मानांकन मिळवणारी खाजगी अनुदानित व्यवस्थापनाची ही पहिली शाळा आहे. शहरातील या मराठी माध्यमाच्या शाळेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. शाळेने पूर्वी अनेक स्वातंत्र्य सैनिक व उच्च पदस्थ अधिकारी घडविलेले आहेत. ही शाळा पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करत असल्याचे सांगितले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.सुनील पंडित म्हणाले की, माझा व या शाळेचा नोकरीला सुरुवात केल्यापासूनचा संबंध आहे. या शाळेने अनेक अधिकारी व नेतेसुध्दा घडविलेले आहेत. मध्यंतरी या शाळेला थोडी अवकळा आली होती. परंतु अ‍ॅड. विद्याधर काकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था व्यवस्थापनाने या शाळेत मोठा बदल केला आहे. या शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे व सर्व शिक्षक झटत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. गत् वर्षभर कोरोनामुळे येथील शिक्षक ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत आहे. शाळेच्या  या सर्व उपक्रमाची दखल घेऊन युके एकेडीटेरिंग फोरम लिमिटेड या संस्थेच्या वतीने शाळेस आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे.

विषयतज्ञ अरुण पालवे यांनी 2007 सालापासून सर्वच शाळाच्या संपर्कात असून, या कालावधीत राष्ट्रीय पाठशाळेत अमुलाग्र बदल घडले आहेत. शाळेचा गुणवत्तेचा आलेख वाढत आहे. ही ऐतिहासिक वारसा जपणारी शाळा असून, येथे आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व शाळेने केलेल्या नव-नवीन उपक्रमांची माहिती दिली. आय.एस.ओ. चे मानांकन मिळण्यासाठी लागणार्‍या सर्व भौतिक सोयी-सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने संस्था पदाधिकार्‍यांचे आभार मानण्यात आले. शेवटी शाळेची माहिती देणारी ध्वनिचित्रफित प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली.


Post a Comment

0 Comments