पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यानाच वाझेंकडून लाच ?

 पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यानाच वाझेंकडून लाच ?

वेब टीम मुंबई : निलंबित पोलिस सहनिरीक्षक सचिन वाझे प्रकरणात पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना लाच दिली गेल्याचे  समोर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने गिरगावातील एका क्लबमध्ये टाकलेल्या धाडीत सापडलेल्या डायरीतील नोंदीवरून 'एनआयए'चा संशय बळावला असून, त्यादृष्टीने  आता तपास सुरू करण्यात आला आहे.

एनआयएने याप्रकरणी गुरुवारी गिरगाव भागातील एका क्लबवर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाला एक डायरी सापडली होती. त्यामध्ये काही महत्त्वाची आकडेवारी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. ती आकडेवारी काही पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाचेसंबंधी असून, महिनावार ती मांडण्यात आली आहे, असे एनआयए पथकाचे म्हणणे आहे. 

एनआयएकडून लवकरच ही माहिती जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. परंतु त्याआधी त्या क्लबमालकाची कसून चौकशी होणार आहे. हे दस्तावेज व डायरी क्लबमध्ये आलेच कसे, याबाबतही चौकशी होणार आहे. वाझे या क्लबमध्ये सातत्याने येत असत. महाराष्ट्र एटीएसने अटक करून एनआयएकडे सोपवलेला क्रिकेट बूकी नरेश गोर व निलंबित पोलिस अधिकारी विनायक शिंदे हे दोघे याच क्लबमध्ये नोकरीला होते, अशीही माहिती तपासात समोर आल्याचे एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, एनआयए ही मुख्यत: दहशतवादविरोधी कारवायांचा तपास करणारी संस्था आहे. त्यामुळे गरज भासल्यास हे दस्तावेज आर्थिक तपासासाठी प्राप्तिकर विभाग किंवा सीबीआयकडेदेखील सोपवले जातील, असे पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments