नगरटुडे बुलेटीन 02-04-2021

 नगरटुडे बुलेटीन 02-04-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हभप सुभाष सुर्यवंशी सामान्य परिवारातील असामान्य व्यक्ती : बाळासाहेब भुजबळ

वेब टीम नगर : हभप सुभाष महाराज सुर्यवंशी सामान्य परिवारातील असामान्य व्यक्ती होते. त्यांचे विचार आणि विठ्ठलभक्ती त्यांनी अनेक प्रवचन, किर्तनातून स्पष्ट केली. ‘झी टिव्ही’च्या माध्यमातून त्यांचे किर्तन राज्याच्या कानाकोपर्‍यात गेले पण महाराजांच्या वागणुकीत किचिंतही बदल झाला नाही, असा विठ्ठलभक्त आपल्यातून वैकुंठवासी झाला तरीही त्यांच्या स्मृती, त्याचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केले.

अहमदनगर शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ आणि पदाधिकारी यांनी सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी भुजबळ बोलत होते. पक्षाचे प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, महिलाध्यक्षा सविता मोरे, मार्गारेट जाधव, निजाम पठाण, राजेश बाठिया, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, किरण आळकुटे आदि यावेळी उपस्थित होते. शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवी सुर्यवंशी यांचे हभप सुभाष महाराज हे ज्येष्ठ बंधू होते.  

प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर म्हणाले, महाराज राजकारणा पलिकडे समाजकारणावर चर्चा करीत. त्यांना समाजकारण अभिप्रेत होते. ते म्हणत निवडणूक वगळता इतर सर्व काळ समाजाच्या हिताचे प्रश्‍न हाती घेऊन ते सोडविण्याचा आग्रह धरावा, प्रश्‍न सुटेल न सुटेल पण प्रश्‍न मांडणारे हे खरे कार्यकर्ते म्हणून नावारुपाला येतील. 

यावेळी अनेक वक्त्यांनी महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळ दिला. शेवटी शहर चिटणीस मुकुंद लखापती यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्य सरकारचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार क्रांती मोरे यांना जाहीर

वेब टीम नगर : राज्यातील कृषी प्रयोगशिलतेला चालना मिळावी यासाठी  कृषी, कृषीसंलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची काल (दि. ३१) रोजी राज्य सरकारने घोषणा केली. नगर जिल्ह्यातील प्रादेशिक साखर संचालक येथे कार्यरत असणाऱ्या क्रांती मोरे यांना  या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कृषी सेवारत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कर्तव्यदक्ष  कृषी अधिकारी क्रांती मोरे यांनी  शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य केले. कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या सहयोगाने राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवणे हे क्रांती यांच्या कार्याचे स्वरूप असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. पशुधन आणि शेती यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न, शेतकरी महिलांना मत्स्य शेतीचे प्रशिक्षण, महिलांना फळ प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे या कामासोबतच लॉकडाऊन काळात  भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेचा' नवा पर्याय शेतकऱ्यायांना उपलब्ध करून दिला. त्यातून अनेक शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात नफा आणि आत्मविश्वास मिळाला. शेतकरी ते थेट ग्राहक या क्रांती मोरे यांनी उभारलेल्या चळवळीतील अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वखुशीने मदत केली. मोरे यांच्या शेतकऱ्यांसाठी तळमळीने केलेल्या या अभूतपूर्व, लोकोपयोगी, आणि निस्वार्थी कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र शासनाने त्यांची कृषी क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली. आजवर हा पुरस्कार केवळ पुरुष अधिकाऱ्यांनाच मिळाला, मात्र; हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेय. यंदा हा पुरस्कार एका महिला अधिकाऱ्याला मिळाल्याने महिला अधिकाऱ्यांसाठी ही भूषावह अशीच बाब आहे.  पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्राय व वंचित विकास संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयास विविध साहित्याची भेट

मास्क, थर्मलगन, साबण, हॅण्डवॉश, लिक्विड, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजचा समावेश

वेब टीम नगर :  कोरोना महामारीत सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारींसाठी क्राय व वंचित विकास संस्थेच्या वतीने मास्क, थर्मलगन, साबण, हॅण्डवॉश, लिक्विड, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजची भेट देण्यात आली. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेने वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.

संस्थेच्या वतीने ४ हजार मास्क, २४ लीटर लिक्विड हॅण्डवॉश, चारशे डेटॉल साबण, ४ थर्मल गन,१०लीटर सॅनिटायझरचे साहित्य जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ.घुगे व औषध निर्माण अधिकारी मृणाल कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव राजेंद्र काळे, नंदा साळवे, सुदीप पडवळ आदी उपस्थित होते. या कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांना हे साहित्य उपयोगी पडणार असून, सामाजिक जाणीव ठेऊन ही मदत देण्यात आल्याचे राजेंद्र काळे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हनुमान ,नृसिंह विशेषांकासाठी साहित्य पाठवा : आवाहन        

 वेब टीम नगर : हनुमान व नृसिंह भगवान या देवतेची उपासना , भगवान शंकराचा अवतार हनुमान आणि विष्णूचा अवतार नृसिंह यांचे अवतार कार्य,या विषयी विशेष लेख,छायाचित्रे,या दोन्ही देवतांच्या दुर्मिळ मंदिरांची माहीती व मंदिरांची छायाचित्रे आदी साहित्य सिटी टाइम्सच्या १) हनुमान जयंती अंकासाठी दि.१९एप्रिल तर २) नृसिंह जयंतीसाठी दि.३० एप्रिल २०२१पर्यंत संपादक राजेश सटाणकर,व्दारा: नवकार प्रोव्हिजन स्टोअर,नगर अर्बन बॅंक जवळ,पानसरे गल्ली,अ.नगर. किंवा सुधीर झालानी ,पंचवटी कॅफे,लालटाकी रोड,नगर मो.९८५०४०९९९२ किंवा rajeshsatankar01@gmail.com किंवा व्हाटस् ॲप नं.९२७१४५९४६५ वर पाठवावे असे आवाहन  करण्यात आले आहे.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमरापूरकरनंतर खराडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नगरचे नांव उंचावले 

हरजितसिंह वधवा : गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने  फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्याबद्दल कामोद खराडे यांचा सन्मान

वेब टीम नगर : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड नगरचे कलाकार असलेले कामोद खराडे यांना मिळाल्याबद्दल गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी थप्पड या हिंदी चित्रपटासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईनला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.

मिस्किन मळा येथील ट्रील म्युझिक अकॅडमी येथे झालेल्या सत्कार समारंभात खराडे यांचा श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, जनक आहुजा व सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत मुनोत, जय रंगलानी, मनयोग माखीजा, संतोष बडे, संजय वाळूंज, संगीत प्रशिक्षक अजीतसिंग वधवा, डॉ. गलांडे, प्रमोद जगताप, प्रितम गायकवाड, शुभम शेरकर, जस्मित वधवा, सीमर वधवा, अनिरुध्द देशमुख, मोहसीन सय्यद, स्वराज गुजर, ओमकार पाटसकर आदी उपस्थित होते

नगर येथील कलाकार असून, २००४ पासून ते ध्वनी डिझाइनर आणि ध्वनी अभियंता म्हणून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटाचे ध्वनी डिझाईन केले आहे. स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतर फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारे ते नगरचे दुसरे कलाकार ठरले असून, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नगरचे नांव उंचावले असल्याची भावना हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी नगरच्या मातीत अनेक कलाकाररुपी हिरे दडलेले असून, जिल्ह्याच्या शिरपेचात या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना व्यक्त केली. पाहुण्यांचे स्वागत संगीत प्रशिक्षक अजीतसिंग वधवा यांनी केले. जनक आहुजा यांनी खराडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना कामोद खराडे यांनी फिल्म इंडस्ट्रीजमधील अनेक पैलूंचा उलगडा करुन संगीत व ध्वनी डिझाईनबद्दल माहिती दिली. तर नगरमधील संगीतप्रेमी कलाकारांसाठी मार्गदर्शन करणार असल्याची इच्छा व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समता पतसंस्थेच्या ठेवीमध्ये ६८ कोटिंची वाढ 

 संदीप कोयटे : ३१  मार्च  रोजी  समता  पतसंस्थेचे  आर्थिक  पत्रके जाहीर

वेब टीम नगर : ३१ डिसेंबर २०२० रोजी १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करून महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळविलेल्या समता पतसंस्थेचा २०२१ वर्षाचा आर्थिक अहवाल सालाबादप्रमाणे   ३१ मार्च रोजीच प्रसिद्ध करण्यात समता पतसंस्थेने आघाडी घेतली आहे. गत आर्थिक वर्षात समता पतसंस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल ६८ कोटी रुपयांची वाढ होऊन ठेवी ६०० कोटी ६ लाख एवढ्या झाल्या आहेत. तसेच कर्ज वाटपामध्ये ७२ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे कर्ज वाटप ४५० कोटी ५५ लाख एवढे झाले आहे. समता पतसंस्थेला ३१ मार्च २०२१ अखेर ७ कोटी २० लाख इतका नफा झालेला आहे. पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना काळातही समता पतसंस्थेची घोडदौड चालू आहे, अशी माहिती संस्थेचे  संचालक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

          याबाबत अधिक माहिती देताना संदीप कोयटे म्हणाले कि, ‘गत आर्थिक वर्ष संपत असतानाच लॉक डाऊन जाहीर झाला, तसेच गत वर्षभर कोरोनामुळे सर्वांच्याच व्यवहारांवर परिणाम झाला असताना देखील समता पतसंस्थेची ठेव, कर्ज व गुंतवणूक यामध्ये विक्रम प्रस्थापीत केले आहेत. विशेषतः समताचे सोनेतारण कर्ज दि.३१ मार्च २०२० अखेर १८ कोटी रुपये इतकेच होते, ते आता १०० कोटी रुपयांचे आसपास जाऊन पोहोचले आहे. सोने तारण कर्जामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जलद सेवा ग्राहकांना देण्याचे काम समता पतसंस्था करीत आहे.’ त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श घेवून कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.’

          समता पतसंस्थेने वेअर हाऊस कर्ज २७ कोटी तसेच अतिशय नगण्य थकबाकी असलेले मायक्रो फायनान्स मध्ये २५ कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक १७५ कोटी ८० लाख असून गुंतवणूक, सोनेतारण, वेअर हाऊस कर्ज, मायक्रो फायनान्स हे कधीही उपलब्ध होणारे कर्ज  एकूण ३२८ कोटी रुपये आहे. एकूण कधीही उपलब्ध होणारे कर्ज गुंतवणुकीचे प्रमाण ५५% इतके आहे. केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने  दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास, स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘कॉप शॉप वर्ल्ड’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून विक्रीस प्रारंभ    

केला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.            

         समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्वप्रथम आणून समता पतसंस्था देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई  शहा यांनी सांगितले.      

          समताच्या अनेक व्यवसायांविषयी माहिती देतांना समताच्या व्हा. चेअरमन श्वेता अजमेरे म्हणाल्या की, ‘समताने गत आर्थिक वर्षात तब्बल ७ कोटी रुपयांच्या नफा मिळविलेला आहे. त्याचबरोबर लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाचे अंतर्गत समता पतसंस्थेच्या ७ लाख रुपया पर्यंतच्या ९८ % ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत.’

          ‘कर्ज वितरण करताना देखील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणाली यांचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. त्याचप्रमाणे निम्जा सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली ई-नोटीस प्रणाली देखील समताने वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल, शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘बँकिंग क्षेत्रात आतापर्यंत वापर करत असलेले क्लॉऊड बँकिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून समताचे व्यवहार पूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही गावात असलेले ग्राहक आता करू शकत असल्याने समता पतसंस्था महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील बँकिंग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी सर्वोच्च संस्था ठरेल अशी खात्री संस्थेचे सर व्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली.

          समताची कर्ज वसुली देखील समताचे टीमने कोरोना व लॉक डाऊनचे काळात अतिशय शांत व संयमी पद्धतीने केली असून एकाही थकबाकीदाराची तक्रार येऊ न देता अत्यल्प एन.पी.ए. ठेवण्यात यश आल्याची माहिती समताचे वसुली विभागाचे अधिकारी जनार्दन कदम यांनी दिली.

          समताच्या या यशामध्ये २५०च्या वर संख्येने असेलेले कर्मचारी, अधिकारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे समता कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान पठारे यांनी सांगितले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

   एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी

    वेब टीम  नगर : दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकदंत कॉलनी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवुन परिसर स्वच्छ करुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. कॉलनीत सर्वत्र भगवे पताके व झेंडे लावण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच महाराजांच्या जीवन चरित्रावरील पोवाडे लावण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

     यावेळी ओंकार बुरगुल, गणेश नागुल, विनित इराबत्तीन, ऋषिकेश इराबत्तीन, ऋषिकेश सामल, रितेश मेरगु, संतोष चेन्नुर, प्रथमेश चाटला, यश मंचे, आकाश सिरसुल, श्रीनिवास इराबत्तीन,रोशन सुंकी, साई बेत्ती, समर्थ बोडखे,  निखिल सग्गम, स्वप्निल सग्गम, गौरव म्याना, गणेश नागुल, राजेश नागुल, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत 

संतोष गेनप्पा : आदर्श युवक मंडळ ट्रस्टच्यावतीने शिवजयंती साजरी

   वेब टीम नगर : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुचय होय.  शत्रूला निधडया छातीने भिडण्याचे धैर्य, युद्ध जिंकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धीमत्ता, रणांगणात स्वत: आघाडीवर राहण्याची तत्परता, विलक्षण युद्धकौशल्य, साथीदारांविषयी अपार आत्मीयता होती. त्याचबरोबर प्रजेविषयी वात्सल्य, यश मिळवून देणारी निर्णयक्षमता, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या भल्याची चिंता, अधिकार्‍यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ती कठोरता, धार्मिक सहिष्णुता अशा असंख्य वैशिष्ट्यांनी बहरलेले त्यांचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने प्रेरणास्त्रोत आहे. ‘रयतेचा राजा म्हणून तरुण पिढीला सदैव प्रकाशाचा मार्ग दखविणारा आहे, असे प्रतिपादन संतोष गेनप्पा यांनी केले.

     कोर्टगल्ली येथील आदर्श युवक मंडळ ट्रस्टच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपशहरप्रमुख संतोष गेनाप्पा, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन शिंदे, दिपक खैरे, दत्ता जाधव, संजय गेनाप्पा, शेखर गोंगले, प्रकाश इंदापुरकर, प्रशांत दिक्षित, संजय कोरपे आदि उपस्थित होते.

     यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी भाऊसाहेब भंडारी, सुजित गोंगले, अमोल जोशी, सचिन पेटकर, विनायक जोग, महेश चोभे, चुटके आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करावे 


 सचिन डफळ : मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

   वेब टीम  नगर : छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणार्‍यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपणही समाजात काम केले पाहिजे. समाजातील दुर्लक्षित दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे. युवकांनी आपल्या शक्तीचा उपयोग समाजाच्या उन्नत्तीसाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एस.टी. स्टॅण्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, अ‍ॅड.अनिता दिघे, मनोज राऊत, अशोक दातरंगे, डॉ.संतोष साळवे, संकेत व्यवहारे, अशोक तुपे, आदेश सत्रे, गणेश शिंदे, इंजि.विनोद काकडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. त्यांचे जीवनकार्याचा सर्वांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे.   स्वराज्याचे रक्षक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीच्याही कायम स्मरणात राहिल, असेच कार्य त्यांनी केले आहे.

     याप्रसंगी गजेंद्र राशीनकर, अ‍ॅड.अनिता दिघे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन मधील विद्यार्थ्यांनी  फी भरली नाही म्हणून ऑनलाईन वार्षिक परीक्षा घेणार नाही अशी धमकीचे पालकांना फोन

शिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर धमकीला उत्तर मनसे स्टाईल ने देणार... नितीन भुतारे 

वेब टीम नगर  : दिवसेंदिवस खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी वाढतच चालली आहे. आता २०२०-२०२१ हे शैक्षणिक वर्ष संपत आले असुन कोरोणाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रुग्ण वाढत असल्यामुळे अहमदनगर जिल्हयातील व शहरातली शाळा बंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आसुन शासनाने पहिली  ते आठवी पर्यंत चे सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गात वर्षात पाठवण्याचे जाहीर केले असताना देखिल काही शाळा फी च्या नावाखाली वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा च्या नावाखाली फी भरण्यास सक्ती करत असुन फी भरली नाही तर वार्षिक परीक्षा तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची घेणार नाही अशी धमकी रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन च्या सेठ नंदलाल धुत शाळेतुन शिक्षक पालकांना फोन करुण देत आहे. त्यामुळे सदर शाळेवर आपन ताबडतोप कारवाई करावी. जो पर्यंत शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा ईतर फी रद्द करून फक्त शिकवणी फी घेत नाहि तो पर्यंत कोणीही शाळांची फी भरणार नाहि असे आवाहन मनसेने मागेच केले होते. या मागणीवर मनसे पालकांच्या बाजूने आजही ठाम आहे. तसेच शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी यांना निवेदन सुद्दा दिले परंतु शासनाने या वर परिपत्रक काढून पालकांना दिलासा दिला परंतु कुठलीही खाजागी इंग्रजी माध्यमांच्या शाळा या परिपत्रकाला जुमानत नसुन अश्या प्रकारच्या धमकी देण्याचे काम पालकांना करत असुन आपण या व अश्य धमक्या देणाऱ्या शाळेंवर कारवाई करावी व यांची मुजोरी थांबवावी असे निवेदन मनसेचे नितीन भुतारे यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.आपण जर या अश्या शाळांवर ताबडतोप कारवाई केली नाही तर अश्या रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन च्या सेठ नंदलाल धूत स्कूल सारख्या धमकी देणाऱ्या शाळेना मनसे स्टाईल धडा शिकवू असा ईशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे

यावर शिक्षणाधिकारी  दोन दिवसात जिल्हयातील व शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची ऑनलाईन मीटिंग घेऊन या प्रश्नावर मार्ग काढू असे आश्वासन मनसेला शिक्षणाधिकारी यांनी दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments