आरोग्य आहार :
झणझणीत कोल्हापुरी भरले गोळे अन मोदक रस्सा
गोळे अन मोदक पारीचे साहित्य - २ वाटी चणाडाळीचे पीठ,मीठ,तेल,हळद,लाल तिखट
सारणासाठी अन रस्स्या साठी लागणारे साहित्य -अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं,दीड वाटी किसलेले ओले खोबरे,एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे, ४चमचे पांढरे तीळ,२चमचे खसखस,१०-१२ पाकळ्या लसूण,मीठ,कोथिंबीर,कडीपत्त्ता,हिरवी मिरची - ५,दोन मध्यम आकारचे चिरलेला कांदा,एक छोटा टोमॅटो,तेल,हळद,मीठ, २ ते ३ मोठे चमचे लाल तिखट (आम्ही साधे तिखट वापरत नाही कोल्हापुरी पद्धतीने घरी केलेले असते, तुम्ही एक चमचा साधे तिखट अन २ चमचे कांदा लसुण मसाला किंवा कोणताही दुसरा मसाला वापरु शकता)
कृती:
प्रथम पारीसाठीचे साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं मग ते झाकुन ठेवावे किमान १५ मिनिटे.
आता सारण अन रस्स्यासाठीची तयारी करुन घ्यायची.
१ - मिरची, आले, लसुण, कडीपत्ता, कोथींबर देठ थोड्याश्या तेलावर परतुन घेवुन मिक्सरला वाटुन घेतले.
२ - तिळ, खसखस थोडेसे मंद आचेवर परतुन वाटुन घेतले
३ - ओले अन सुके खोबरे भाजुन वाटुन घेतले.
४ - शेंगदाण्याचा जाडसर बारिक कुट करुन घेतला
५ - कांदा तेलावर खरपुस भाजुन घेतला, त्यातच चिरलेला टोमॅटो पण परतला अन वाटुन घेतला.
हि सगळी वाटणे वेगवेगळीच ठेवायची एकत्र करायची नाही.
सारणासाठी -कढईत थोडे तेल गरम करुन घ्यावे, त्यात वरची अर्धी मिरची आले पेस्ट , अर्धी तिळ खसखस पेस्ट, शेंगदाणे कुट, अर्धी खोबरे पेस्ट घालुन परतायचे. त्यात चविनुसार तिखट , हळद अन मिठ घालायचे.आता सारण तयार झालेय, ते निट एकजिव करायचे, ते झाले की पारीचे पिठ परत हलक्या हाताने मळुन त्याचे छोटे गोळे करायचे. त्या गोळ्याच्या पारी करुन त्यात सारण भरुन गोल्/चपटे गोळे करा किंवा मोदक करा.
रस्सा -
एकीकडे रस्सा जेवढा करायचा आहे तितके पाणी ऊकळुन घ्यायचे. दुसरीकडे एका कढईत सढळ हाताने तेल घालायचे, तेल गरम झाले की मंद आचेवर अर्धी ऊरलेली आले मिरची पेस्ट घालुन परतायची, मग त्यात तिखट (आम्ही घरी केलेला कोल्हापुरी तिखट मसाला वापरतो, तो नसेल तर दुसरा कुठलाही चालेल), हळद घालुन परतायचे, नंतर त्यात कांदा-टोमॅटो पेस्ट घालुन तेल सुटे पर्यंत परतायचे. तेल सुटले कि ऊरलेले सगळे मसाले - तिळ-खसखस, दाण्याचे कुट, खोबरे पेस्ट घालुन निट परतुन घ्यायची. सगळे निट तेलात परतले की त्यात गरम पाणी घालुन ऊकळी येऊ द्यायची. ऊकळी आली की तयार गोळे / मोदक, मिठ घालुन मध्यम आचेवर झाकुन १० ते १५ मिनिटे वाफ द्यायची. अगदी शेवटाला गॅस बंद करताना वरुन बारिक चिरलेली कोथींबीर पेरायची.
0 Comments