प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी 

वेब टीम नगर : वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करण्यात येणार असून यापुढे त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच (सीसीसी) ठेवण्यात यावे. प्रत्येक तालुक्यांनी तसेच महानगरपालिकेने अशी सेंटर अद्यावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदीची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.  भोसले म्हणाले, सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसते आहे. मात्र, त्याच प्रमाणात बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांच्याही चाचण्या होणे गरजेचे आहे. तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी तसेच अगदी गावपातळीवरही याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.  त्यासाठी जी पथके कार्यरत करण्यात आली आहेत, त्यांनी याची कडक अंमलबजावणी करावी. संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे असून त्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच प्रत्यक्ष लोकसहभाग महत्वाचा आहे. रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे असणार्‍या अथवा त्रास जाणवणार्‍या व्यक्तींनी तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताची चाचणी करुन घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरची उभारणी, तेथील व्यवस्था, औषधांची उपलब्धता याबाबत दक्षता घ्यावी. यापुढे जिल्ह्यात बाधित आलेला कोणत्याही रुग्णाला गृह अलगीकरणाची (होम आयसोलेशन) परवानगी दिली जाणार नाही. त्यांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या. सीसीसी आणि डीसीएचसी येथील व्यवस्थेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि त्याची नोंद दैनंदिन स्वरुपात पोर्टलवर करण्यात यावी. नागरी भागात एकाच परिसरात पाचपेक्षा अधिक तर ग्रामीण भागात एकाच परिसरात पंधरा पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले तर तेथे कंटेन्टमेन्ट झोन करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करुन कंटेन्टमेन्ट झोनमध्ये प्रतिबंधित उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जावी. त्या क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या चाचण्या केल्या जाव्यात. पथकामार्फत तेथे सर्वेक्षण केले जावे. त्या क्षेत्रात नागरिकांची ये-जा प्रतिबंधीत करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. 

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ते आवश्यक आदेश वेळोवेळी जारी केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार यांची आहे. त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून ती कार्यवाही करावी, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचे तंतोतंत पालन केले जावे. विनाकारण फिरणार्‍या तसेच विनामास्क फिरुन इतरांच्या आरोग्यास अपाय करण्यास कारणीभूत ठरणार्‍यांवर कडक कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments