ऑनलाइन गेम च्या नादि लावून मुलीस पळविले

 ऑनलाइन गेम च्या नादि लावून मुलीस पळविले

अकोल्यातील आरोपी जेरबंद 

वेब टीम नगर : ऑनलाइन गेम खेळण्यात गुंतवून, ओळख वाढवून कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपास केल्याने तीन दिवसांत मुलीची सुटका करण्यात यश आले असून, आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तिला बाळापूर (अकोला) येथे पळवून नेण्यात आले होते.

या प्रकरणी कर्जत पोलिसांनी आरोपी मिथून पुंडलिक दामोदर (वय २४, रा. बाळापूर, जि. अकोला) याला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून १४ वर्षीय मुलीची सुटका केली आहे. याबाबत कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माहिती दिली की, २० मार्च रोजी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आमच्याकडे आली. ती अचानक गायब झाली आणि परिसरात शोध घेऊनही सापडली नसल्याने नेमके काय झाले, याचा अंदाज येत नव्हता. घटनास्थळी भेट देऊनही काहीच हाती लागले नाही. नंतर कळाले की तेथील मुले मोबाइलवर फ्री फायर नावाचा गेम खेळत होती. मग पोलिसांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले. तेव्हा बेपत्ता झालेली मुलगी आणि एक मुलगा हा गेम एकत्र खेळल्याचे लक्षात आले. हा धागा मिळाल्यावर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. तेव्हा तो आरोपी बाळापूरचा असल्याचे आढळून आले.

कर्जतचे पोलीस पथक तिकडे रवाना करण्यात  आले. माहिती मिळालेल्या आरोपीच्या घरी पोलिसांनी पहाटे छापा घातला. तेव्हा त्याच्या घरात ही मुलगी आढळून आली. पोलिसांनी त्या आरोपीला आणि मुलालाही कर्जतला आणले. आरोपी पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पकडले. आरोपीने प्रथम या मुलीच्या भावाशी मैत्री केली होती. त्याच्यासोबत आधी तो हा गेम खेळत असे. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने एकदा तिच्या भावाला तीन हजार रुपयांचा ऑनलाइन रिचार्ज करून दिला होता. त्यानंतर आरोपीने त्याच्या बहिणीसोबत खेळण्यास सुरुवात केली. खेळत असताना ते चॅटिंगही करत असत. त्यातूनच त्याने गोड बोलून तिची फसवणूक केली आणि तिला फूस लावून पळवून नेले. 

मुले ऑनलाइन गेम खेळत होते, याची माहिती घरातल्यांना नव्हती. त्यामुळे त्यावरून असे काही झाले असेल याचा अंदाज आला नाही. पोलिसांनी मात्र कोणताही पुरावा नसताना गुन्हा उघडकीस आणून मुलीची सुटका केली आणि आरोपीला जेरबंद केले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. यामध्ये फौजदार भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार तुळसीदास सातपुते, गणेश ठोंबरे, सायबर सेलचे नितीन शिंदे, मारुती काळे, सागर म्हेत्रे, बळीराम काकडे, गणेश भागडे, संपत शिंदे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments