मला नाशिक जेल मध्ये ठेवा : बाळ बोठे

मला नाशिक जेल मध्ये ठेवा : बाळ बोठे 

वेब टीम नगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, कोतवाली पोलिसांनी आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्याचा अर्ज दिला. तो न्यायालयाने मंजूर केल्याने पोलीस त्याला नगरला घेऊन आले.

या दरम्यान आरोपीचे वकील अॅड. संकेत ठाणगे यांनी पारनेरच्या न्यायालयापुढे एक अर्ज केला. त्यामध्ये आर्थिक व्यवहार अडले असल्याने काही धनादेशांवर सह्या करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली. आयकर रिटर्न्स भरण्यासाठीही सह्यांची आवश्यकता असल्याचे अर्जात म्हटले होते. त्याला न्यायालयाने परवानगी दिल्याने संबंधित कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या.

 आरोपीला पारनेर, नगर किंवा येरवडा येथील तुरुंगात न ठेवता नाशिकच्या तुरुंगात ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली. पत्रकारिता करताना ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ज्यांच्या विरोधात बातम्या दिल्या, त्यातील काही आरोपी नगर व येरवडा तुरुंगात आहेत. त्यांच्यापासून जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे तिथे ठेवू नये, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून नगरच्या न्यायालयात नेण्यात येणार आहे. त्यामुळे या अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. नगरमधील दोन गुन्ह्यांसंबंधी आधी निर्णय होऊन आधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरच आरोपीला पुन्हा पारनेरच्या गुन्ह्यात नेण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची वेळ आल्यानंतरच या अर्जावर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments