नगरटुडे बुलेटीन - 26-03-2021

नगरटुडे बुलेटीन - 26-03-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्र ध्वजाच्या सन्मानार्थ धावणार्‍या सौरभ जाधवचे भविष्य उज्ज्वल 

 

क्रीडा अधिकारी शेखर पाटील : क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार

वेब टीम नगर :  तालुक्यातील अकोळनेरचा उदयोन्मुख धावपटू सौरभ जाधव याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हातात राष्ट्रध्वज घेऊन पावणे आठ तासात ७२ किमी अंतर पार केले तर त्याच मार्गावर दि.२१ मार्च रोजी ९० किमी अंतर राष्ट्रध्वजासह सव्वा चार तासात सायकलवर पार केले. इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या या विक्रमाची नोंद झाली. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी त्याचा सत्कार केला.

याप्रसंगी शेखर पाटील म्हणाले, चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही. त्यासाठी खेळाडूंनी चमत्कारपूर्ण कामगिरी केली पाहिजे. सरावातील सातत्य, योग्य

आहार, पुरेशी झोप महत्वाची आहे. यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीचा सातत्याने ध्यास घेतला तर यश हुलकावणी देत नाही. सौरभवने राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ धावून राष्ट्रप्रती आपली भक्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे भविष्यात तो अनेक स्पर्धां आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. नगरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवेल यात शंका नाही. त्याचे भविष्य उज्वल आहे, असे सांगितले.

यावेळी नगर जिल्हा शहर युवक काँग्रेचे अध्यक्ष किरण काळे म्हणाले,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणार्‍या या धावपटूला सर्वतोपरी मदत

करण्यात येईल, असे सांगून शुभेच्छा दिल्या. सौरभ जाधवच्या या यशाबद्दलजि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्याचे अभिनंदन केले.

याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, स्काऊट गाईड निदेशक दिलीप भोर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पोपट धामणे, शिक्षक दत्तात्रय धामणे,साहेबराव जाधव, विजय जाधव, रमेश पोवार आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगरसेवकांनी सेवकाची भुमिका बजावल्याने प्रभाग 2 चा समतोल विकास 

हरिभाऊ महांडूळे  : अवधूत नगरला बंद गटार पाईप योजनेचा शुभारंभ

वेब टीम नगर : मोठ-मोठ्या शहरात मोठ-मोठी माणसे निवडून येतात, पण नगरसेवक झाल्यानंतरही ते प्रभागाला वेळच देत नाहीत, त्यामुळे नागरिकांचे प्रश्‍न सुटत नाही, मात्र आपल्या भागातील नगरसेवक ही सर्वसामान्य कुटूंबातील छोटी माणसे असूनही नगरसेवक झाल्यावर सेवकाची भुमिका बजावल्याने प्रभाग 2 चा समतोल विकास झाला, असे प्रतिपादन केंद्रीय विद्यालयाचे माजी शिक्षक हरिभाऊ महांडूळे यांनी केले. श्रीराम चौकाजवळील अवधूत नगरला बंद गटार पाईप योजनेचा शुभारंभ महांडुळे यांचे हस्ते झाला. यावेळी ते बोलत हाते. 

याप्रसंगी नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, अशोक औटी,संदिप सदाफुले, वनराज ढवळे, विजय नवले, दत्तात्रय कोकाटे, अमित डापसे,चंद्रकांत गवळी, पी.एम.साळे, बाळासाहेब कांगणे, कुलकर्णी साहेब आदिउपस्थित होते.

महांडूळे पुढे म्हणाले, फक्त निवडणुकीतच प्रचाराला येणारी माणसे आता नागरिक लक्षात ठेवतात. मतदारांना प्रलोभने दाखवून निवडून येण्याचे दिवस

संपले. या प्रभागाचे नागरिक सुज्ञ असल्याने काम करणार्‍या नगरसेवकांच्या पाठिशी असतात. आमच्या भागातील चारही नगरसेवक विकास कामे करतांना समतोल विकास करतात. सर्वांना सारखा न्याय देतात. अभ्यासपुर्वक प्रश्‍न सोडवितात, त्यामुळे या प्रभागाचा विकास होत आहे, असे ते म्हणाले.संदिप सदाफुले यांनी आपल्या भाषणातून प्रभाग 2 चे चार नगरसेवक हे विकासाचे चार महारथी आहेत. मोठा प्रभाग असूनही छोटे-छोटे प्रश्‍न देखील ते सोडवितात. त्यामुळे पुढील निवडणुकीत त्यांना प्रचार करण्याची गरज पडणार नाही. मतदारच त्यांना पुन्हा निवडून देतील, असे सांगितले.

प्रभागामधील महत्वाचे प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने या चारही नगरसेवकांचा सन्मान करुन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना निखिल वारे म्हणाले, ज्या नागरिकांनी नगरसेवक पद मिळवून दिले, त्यांची सेवा या पदाच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्‍न

सोडवून करणे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडतो. विकास कामे करतांना भेदभाव न करता चारही नगरसेवकांचे एकमत असते. तसेच आ.संग्राम जगताप यांचा निधी मोठ्या प्रमाणावर आपल्या प्रभागासाठी उपलब्ध होत असल्याने त्यांचे सहकार्य मिळते. त्यामुळे विकास कामांना गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली.यावेळी सचिन वारे, सचिन गाडे, सुनिता सदाफुले, शितल नवले, नंदा कोकाटे,लता औटी, गीता ढवळे, निता पवार, सारिका कोकाटे, गवळी, कांगणे,कुलकर्णी आदिंसह रहिवासी उपस्थित होते. शेवटी अशोक औटी यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सभापती म्हणूनही धडक निर्णय घेऊन नगर शहराचा विकास साधतील 

 डॉ.शकिल फातेमा शेख : अविनाश घुले यांचा जिल्हा महिला विकास मंडळाच्यावतीने सत्कार

   वेब टीम नगर : घुले परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेला आहे. स्व.शंकरराव घुले यांचे विविध क्षेत्रातील योगदान हे विसरु शकत नाही. तोच वारसा अविनाश घुले चालवित आहेत. हमाल पंचायत, प्रतिष्ठान, मंडळ याबरोबर नगरसेवक म्हणूनही ते सर्वांच्या मदतीसाठी धावून येत असतात. त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी झालेली निवड सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. सभापती म्हणूनही ते धडक निर्णय घेऊन नगर शहराचा विकास साधतील यात शंका नाही. नुकतीच सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेला ‘पाणी’ यासाठी त्यांनी तातडीने बैठक घेऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेले प्रयत्न हे एक उदाहरण आहे. यापुढील काळातही ते असेच चांगले निर्णय घेऊन नगर शहराला विकसित करतील, असा विश्‍वास अहमदनगर जिल्हा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकिल फातेमा शेख यांनी व्यक्त केला.

     मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा महिला विकास मंडळाच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन डॉ.शकिल फातेमा शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिव रफिया शेख, खजिनदार जाहिदा शेख, यास्मीन शेख, उपाध्यक्षा सखुबाई संदुपटला आदि उपस्थित होते.

     सत्काराला उत्तर देतांना नगरसेवक अविनाश घुले म्हणाले, समाजसेवेचा वारसा घरातून मिळालेला असल्याने व मित्र परिवाराच्या सहकार्याने आपणास विविध पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासात सातत्यातर आहे, परंतु आता स्थायी समितीचा सभापती म्हणून नगर शहराच्या प्रश्‍नांच्या मुळाशी जावून ते सोडविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. शहरातील नागरिकांना रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज या मुलभुत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहोत. सर्वांचे सहकार्य आणि समन्वयातून अनेक समस्यांवर मात केली जावू शकते. अनेकांनी केेलेले सत्कारामुळे आपली जबाबदारी वाढली आहे, ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगरसेवकांची ओळख त्यांच्या कामातून होत असते 

 आसाराम कावरे : भाग क्रमांक 12मधील भिस्तगल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

   वेब टीम नगर : प्रभागातील नागरिकांना मुलभुत सुविधा देणे हे नगरसेवकाचे प्रथम कर्तव्य आहे. रस्ते, वीज, पाणी ही दैनंदिन जीवनातील महत्वाच्या गोष्ट असल्याने त्या पुरविणे आवश्यक आहे. गल्ली,कॉलनीतील नागरिकांना या सुविधा मिळाल्यास शहराच्या विकासात भर पडत असते. छोट-छोट्या कामातून प्रभागाचा विकास होतो अन् पर्यायाने शहराच्या विकासास चालना मिळत असते. नगरसेवकांनी या भागाकडे विशेष लक्ष देऊन सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विकास कामे करतांना नागरिकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन त्या सोडविल्या पाहिजे. प्रभागाच्या विकासाबाबत नगरसेवकांचे सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामातून त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक आसाराम कावरे यांनी केले.

     प्रभाग क्रमांक १२, बंगाल चौकीजवळील, भिस्तगल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक राशदभाभी कलोसिया यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक आसाराम कावरे, रजनी वाघमारे, समीना गफुर शेख, पत्रकार सय्यद वहाब, ऋषीकेश कावरे, मतीन शेख, फारुक बागवान, अय्युब खान, गणेश चव्हाण, सय्यद शफीभाई, सादिक जमालखान, गफुरभाई बर्फवाले, राजू चव्हाण, शेख निसार इब्राहीम आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सय्यद वहाब म्हणाले, प्रभागातील नागरिकांनी आपल्या भागातील प्रश्‍नांबाबत जागृत राहिले पाहिजे,  त्या नगरसेवकांपर्यंत पोहचविल्यास त्या सोडविण्याची त्यांची जबाबदारी आहे. या भागातील नगरसेवक आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबतचा पुढाकार कौतुकास्पद आहे.  नागरिकांनीही सुरु असलेल्या दर्जेदार होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. यापुढेही अशीच कामे होत रहावीत, अपेक्षा व्यक्त केली.

     याप्रसंगी महिलांनी मनोगत व्यक्त करुन या भागातील प्रश्‍न मांडले. शेवटी ऋषीकेश कावरे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भुईकोट किल्ला समोरील डीएसपी चौकाडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण सुरु राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश

भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यास राष्ट्रवादी नेहमीच कटिबध्द 

संजय सपकाळ : भिंगारला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीची केली होती मागणी  

वेब टीम नगर  : भिंगार येथील अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्याचे डांबरीकरण सुरु आहे. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आले असून, या कामाची भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पहाणी केली. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, संपत बेरड, मेजर दिलीप ठोकळ, मच्छिंद्र बेरड आदी उपस्थित होते.

 भिंगारच्या विविध नागरी प्रश्‍नासह खराब झालेल्या एमईएस छावणी परिषद अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होण्यासाठी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. राणा यांनी सदर निवेदनाची दखल घेत प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कामकाम मार्गी लावले जात असून, नुकतेच  भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भिंगार येथील अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यात आले आहे. येथील प्रश्‍न सोडविण्यास राष्ट्रवादी नेहमी कटिबध्द राहणार आहे. भिंगार छावणी मंडळ परिसरातील नागरिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करणे, भिंगार छावणी मंडळ हॉस्पिटल येथे डॉक्टर व कर्मचारी वाढवणे, केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. हे प्रश्‍न देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुटणार असल्याची भावना संजय सपकाळ यांनी व्यक्त केली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाण्याची बचत हे उज्वल भविष्याचे नियोजन

डॉ. संतोष गिर्‍हे : जल दिनानिमित्त उमंग फाऊंडेशन व नगर तालुका वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम

पिंपळगाव उज्जैनीत ग्रामस्थांमध्ये जल बचतची जागृती

वेब टीम नगर : उमंग फाऊंडेशन व नगर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे जल दिनानिमित्त ग्रामस्थांमध्ये जल बचतची जागृती करण्यात आली. गावातील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पाण्याचे महत्त्व विशद करुन जल बचत व योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.

जल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच चंद्रकला कानिफनाथ वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, वंचित बहुजन आघाडी नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे, उपसरपंच राजश्री सूर्यकांत आल्हाट, शंकर आढाव, इस्माईल शेख, गोरक्षनाथ काकडे, दिपक आल्हाट, लता चव्हाण, संजय मगर, मीरा मुळे, भीमाबाई कराळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, सचिव बाळासाहेब कांबळे, महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, विशाल पाटोळे, प्रवीण निकाळजे, उमंग फाऊंडेशनच्या सचिव वैशाली आडकर-कुलकर्णी, संतोष चाबुकस्वार, राहुल आल्हाट, कुंदन आल्हाट, रोहित आल्हाट, पांडू गायकवाड, सुनील वाघ, आनंद पाटोळे, विकी नेटके, अमोल खळे, प्रमोद निकाळजे, आदेश सोनावणे, स्वपनील पाटोळे, प्रवीण पाटोळे, चांद शेख, उमंग फाऊंडेशनच्या सचिव वैशाली आडकर-कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. संतोष गिर्‍हे म्हणाले की, पाणी हे जीवन असून, त्याचे महत्त्व भविष्यात समजणार आहे. पाण्याची बचत हे उज्वल भविष्याचे नियोजन आहे. नदी, झरे, तलाव व झाडांचे महत्व आजच्या युवा पिढीला माहित नाही. वाढलेल्या शहरीकरणामुळे नदी, तलाव, झरे बंद करुन झाडांची कत्तल केली जात आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. आमच्या पूर्वजांनी यासर्व बाबींचे महत्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी त्याचा सांभाळ केला. त्यांनी निसर्गाने दिलेल्या सर्व बाबींचा ठेवा ठेवून त्याबरोबर राहण्याचे उत्कृष्ट नियोजन करायचे. पाण्याबाबत देखील आपल्या पूर्वजांकडून बोध घेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मारुती पाटोळे यांनी निसर्गाने दिलेली पाण्याची अमुल्य देणगी आपल्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवली पाहिजे. यासाठी पाऊसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, एकएक पाणीच्या थेंबाचे जतन करणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात वैशाली आडकर-कुलकर्णी यांनी उमंग फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. आभार उपसरपंच राजश्री आल्हाट यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम पार पडला, तसेच यावेळी ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सामाजिक वनीकरण निमगाव वाघात करणार दीड हजार झाडांची लागवड

खड्डे खोदण्याच्या मोहिमेची सुरुवात

वेब टीम नगर : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पावसाळ्यात दीड हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून, या पार्श्‍वभूमीवर झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते खड्डे खोदण्याच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी वन रक्षक अफसर पठाण, सतीश उधार, गणेश येणारे, संतोष रोहोकले आदींसह कामगार उपस्थित होते.

निमगाव वाघा ते कल्याण रोड (बारा खोंगळा मार्गे) व मिलन मंगल कार्यालय ते पिंपळगाव वाघा (जुन्नर रोड) रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दीड हजार झाडे लावण्यात येणार आहे. यासाठी खड्डे घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नगर तालुका सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल दिलीप जीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मागासवर्गीय कुटुंबीयास डांबून ठेवणार्‍या वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दखल घेतली जात नसल्याचा आरोप

वैरागर कुटुंबीयांच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन

वेब टीम नगर : अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या मालकाने मागासवर्गी वीटभट्टी मजूर कुटुंबीयांना डांबून ठेऊन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार सुरु केला असल्याचा आरोप करुन सदर वीटभट्टी मालकावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार काकासाहेब वैरागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संविधान नायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास वैरागर, रामदास क्षीरसागर, बाबासाहेब वैरागर, सोमनाथ ओहळ, सुरेश शिरसाठ आदी उपस्थित होते.  

चिचपूर (ता.पाथर्डी) येथे बाळासाहेब दहिफळे व ईश्‍वर दहिफळे अनाधिकृतपणे वीटभट्टी चालवित आहे. तेथे  काकासाहेब वैरागर व त्यांचे कुटुंबीय (रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) पंधरा वर्षापासून वीटभट्टी मजूर म्हणून काम करत आहे. दहिफळे यांनी वीटभट्टी मजूर असलेल्या वैरागर कुटुंबीयांना डांबून ठेवले आहे. वैरागर कुटुंबीयांच्या सदस्यांवर अन्याय, अत्याचार सुरु असून, त्यांच्या लहान मुलांना अवजड काम करण्यास भाग पाडले जात आहे. महिलांशी देखील असभ्यपणे वागत असून, त्यांची छेड काढली जात आहे. सांगितलेली कामे न केल्यास मारहाण केली जात आहे. कामगारांना पैसे देऊन खरेदी केले असल्याचे सांगून, या ठिकाणाहून बाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील पोलीसांनी संबंधीत अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्‍या मालकावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप तक्रारदार काकासाहेब वैरागर यांनी केली आहे. अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या मालकाने मागासवर्गी वीटभट्टी मजूर कुटुंबीयांना डांबून ठेऊन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केल्याप्रकरणी दहिफळे पिता-पुत्रांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी वैरागर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना तपासणीचा सावळागोंधळ ,एकच व्यक्ती जिल्हा रुग्णालयात निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये ठरला पॉझिटिव्ह

 विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने चौकशी करण्याची मागणी : अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

वेब टीम नगर : शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना, एकाच दिवशी एका व्यक्तीने केलेल्या कोरोना चाचणीचा जिल्हा रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने, अशा दोन प्रकारच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी विश्‍व मानवाधिकार परिषदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद शफीबाबा, जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, अल्ताफ शेख, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव शब्बीर शेख, सचिव मुजम्मिल पठाण, ललित कांबळे, शादाब कुरेशी, ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, वाहिद शेख आदी उपस्थित होते.

कोठी येथील चंद्रकांत उजागरे यांनी अस्वस्थता जाणवत असल्याने शंकेचे निरसन करण्यासाठी सावेडी येथील भूमी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दि.18 मार्चला कोरोनाची तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत अधिक खात्री करण्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्याच दिवशी कोरोनाची तपासणी करुन घेतली. याचा अहवाल दोन दिवसांनी निगेटिव्ह आल्याने ते चक्रावले. एकाच दिवशी एका व्यक्तीचे कोरोना तपासणीचे निगेटिव्ह व पॉझिटिव्ह अशा दोन प्रकारचे अहवाल आले आहे. एकावेळी एकाच माणसाचे दोन वेगवेगळे कोरोना तपासणी अहवाल येत असल्याने कोणत्या अहवालावर विश्‍वास ठेवायचा ह प्रश्‍न पडला आहे. एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढणार आहे. तर तो व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असून, पॉझिटिव्ह दाखविल्यास उपचारा दरम्यान काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? अशा तपासणी अहवालामुळे प्रश्‍न व शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर ४२०चे गुन्हे दाखल करण्याची मागणी विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments