नगरटुडे बुलेटीन 25-0-2021

 नगरटुडे बुलेटीन 25-0-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योजनांच्या माध्यमातून सभासदांचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न

सुदामराव बनसोडे  :  छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन संपन्न

   वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यात लोकशाही तत्वाने चालणारी ग्रामसेवकांची एकमेव पतसंस्था म्हणून नावलौकिक आहे. पतसंस्थेची सभासद संख्या १११२असून, सभासदांच्या हितांचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त फायदा कसा होईल, यासाठी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत. पतसंस्थेच्यावतीने सभासदांसाठी विविध कर्ज योजना राबवून सभासदांचे जीवनमान उंचविण्याचे काम केले आहे.  कोणत्याही प्रक़ारचे आर्थिक हित न पाहता सभासदांच्या हितास प्राधान्य दिले आहे. सभासदांच्या कर्ज मर्यादेतही वाढ करण्यात आलेली असून, भागभांडवल, कायम ठेव व मुदतठेव यामुळे संस्थेचा पाया भक्कम झालेला आहे. त्यामुळेच संस्थेने सांस्कृतिक भवन उभारणी कामी १७ गुंठे जागा खरेदी केली आहे. संस्थेस स्थापनेपासून असणारा ऑडिट वर्ग ‘अ’ कायम ठेवला आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष  सुदामराव बनसोडे यांनी दिली.

     छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगीअध्यक्ष  सुदामराव बनसोडे, उपाध्यक्ष  ज्ञानेश्‍वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकिर, संचालक सुरेश मंडलिक, प्रमोद कानडे, दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी उपाध्यक्ष  ज्ञानेश्‍वर सुर्वे म्हणाले, संस्थेस आयएसओ मानांकन प्राप्त असून, मोबाईल सेवा,  सभासदांचा अपघात विमा, मयत सभादांच्या कुटूंबियांना मदतीचा आधार व विमा संरक्षण, विवाहभेट योजना अशा विविध योजनांद्वारे सभसदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, गुणवंतांचा सत्कार करुन एक कौटुंबिक नाते निर्माण केले आहे. संस्थेचे पदाधिकारी  संस्थेसाठी कार्यरत असल्यामुळे पतसंस्था आज प्रगतीपथावर आहे. पतसंस्थेच्या कार्यात सर्वांनी सक्रीय सहभाग देऊन प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     याप्रसंगी मानद सचिव चंद्रकांत तापकिर यांनी कोरोना काळातही संस्थेने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे कौतुक करुन संस्थेच्यावतीने आर्थिक वर्षभरात केलेल्या कामाचा ताळेबंद सादर केला. यापुढेही संस्था सभासदांचे हित जोपासत प्रगतीपथावर राहिल, असा विश्‍वास व्यक्त केला.

     या ऑनलाईन सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना संचालक मंडळाने समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. सभेस संचालक रामदास जाधव, जयराम ठुबे, दादासाहेब डौले, संजय गवळी, अरुण गाढवे, संजय गिर्‍हे, बाळासाहेब मेहेत्रे, सुनिता बर्वे, अर्चना कडू, अशोक जगदाळे, सेक्रेटरी पवनकुमार घिगे, सुरेश निनावे आदि सहभागी झाले होते. शेवटी व्यवस्थापक राजेंद्र शेडाळे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऋषीकेश खोसे सी.ए.उत्तीर्ण

   वेब टीम नगर  :  प्रेमदान हडको येथील रहिवासी ऋषीकेश खोसे यांनी नुकतीच सी.ए. परिक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी सी.ए.ची आर्टिकलशिप पुण्याच्या खोसे अ‍ॅण्ड खोसे चार्टर्ड अकौंटटस्चेसीए संजय खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. त्यांना सीए संदिप देसर्डा, सीए प्रसाद भंडारी, सीए राजेंद्र काळे, सीए महेश तिवारी, विक्रांत शिवगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.

     ऋषीकेश यांचे माध्यमिक शिक्षण सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमधून रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेजमधून बारावी कॉमर्स उत्तीर्ण झाला. वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातून केली आहे. न्यू लॉ कॉलेजमधून डीटीएल चा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच शासनाच्या जीडीसी अ‍ॅण्ड ए चा कोर्स विशेष श्रेणित उत्तीर्ण झाला आहे. छत्रपती चौथे शिवाजी महाराज इन्स्टिट्युटमधून व्यवस्थापन शास्त्रातील एमबीए फायनल करीत आहे.

     ऋषीकेश हा माजी ग्रंथपाल दशरथ खोसे यांचे ते सुपूत्र आहेत.  त्यांच्या यशाबद्दल जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सेक्रेटरी जी.डी.खानदेशे, सहसेक्रेटरी अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे पा.,विश्‍वस्त जयंतराव वाघ, माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, ज्येष्ठ नेते डी.एम.कांबळे, सीए रमेश फिरोदिया, सीए राजेंद्र गुंदेचा तसेच शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष  शांतीलाल गुंदेचा, सेक्रेटरी रतीलाल कासवा, वृद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष  आप्पासाहेब राजळे पा., आ.मोनिकाताई राजळे, संचालक डॉ.यशवंत गवळी, पं.स.सदस्य राहुल गवळी, डॉ.विजय पाटील, डॉ.प्राची पाटील, साहित्यिक प्रा.इंद्रजीत भालेराव, कवी प्रा.प्रशांत मोरे, डॉ.कैलास दौंड, डॉ. संजय कळमकर, किशोर मरकड आदिंनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अलौकिक व अविस्मरणीय कामे करणारे दिलीप गांधी कायम स्मरणात राहतील :  माजी अधिक्षक अभियंता एन.डी.कुलकर्णी

वेब टीम नगर : दिलीप गांधी यांनी पहिल्याच निवडणुकीत बलाढ्य नवनीतभाई बार्शीकर यांचा पराभव करून राजकारणात जोरदार एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. लहानपणापासूनची दिलखुलास मैत्री जपणारे दिलीप गांधी यांनी आयुष्यभर जिद्दीने काम करत विकासाचे मोठे प्रकल्प उभारले. शहरातील उड्डाणपूलाच्या सुरवातीच्या कामासाठी वेळोवेळी सल्लामसलत केल्याने याकामात माझाही खारीचा वाट आहे. सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची स्थपना दिलीप गांधी यांच्या हस्तेच झाल्याने या संघटनेचा त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध आहेत. असे अलौकिक व अविस्मरणीय कामे करणारे दिलीप गांधी कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे संस्थापक व माजी अधिक्षक अभियंता एन.डी.कुलकर्णी यांनी केली.

          सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आयोजित शोक सभेत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी एन.डी.कुलकर्णी बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देशपांडे, सुरेश बोरुडे, नंदकुमार परदेशी, गोरक्षनाथ घोडेस्वार, आदिनाथ खरात, शंकर कुलकर्णी, प्रमोद तरवडे आदी सदस्य उपस्थित होते.

          यावेळी सुधाकर देशपांडे म्हणाले, खासदार म्हणून काम करतांना दिलीप गांधी यांनी गावागावात विकास कामे केली. सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवली. शहरातील उड्डाणपूल मंजूर होण्यासापासून प्रत्यक्ष कामास सुरवात होण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर तो पाहण्यास ते आता नसणार. असे चांगले काम करणाऱ्या व्यक्तिमत्वास कोरोनाने सोडले नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खेळामध्ये ही युवकांना करिअर करण्याची संधी 

रफिक मुन्शी : अजीम नजीर काझी यांच्या यशाबद्दल सन्मान

वेब टीम नगर : युवकांचा मैदानी खेळाकडे कमी होत चाललेला ओढा ही चिंतेची बाब आहे. सोशल मिडियाच्या जमान्यात युवक हा मोबाईलमध्येच गुंतलेला दिसून येतो. त्यामुळे अकाली वयातच अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. आज खेळांनाही ग्लॅमर निर्माण झाल्याने त्यातही करिअर करता येऊ शकते. सध्याच्या ‘आयपीएल’ जमान्यात युवकांना खेळामध्येही उत्तम संधी आहेत. अजीम नजीर काझी यानेही आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक क्रिकेट सामन्यात मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्याचा पुढील काळ उज्वल असेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी केले.

दिल्ली येथील विजय हजारे ट्रॉफी, हिमाचल व मुंबई येथील क्रिकेट सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करुन विविध पुरस्कार प्राप्त करणारे अहमदनगर येथील खेळाडू अजीम नजीर काझी यांचा मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, शरद पवार होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ.रिजवान, नफिस चुडीवाला, न्यामत चुडीवाला, हमजा चुडीवाला, जुनेद शेख, समीर खान, शहारुख रंगरेज, अतहर सय्यद, सरफराज चुडीवाला आदि उपस्थित होते. यावेळी एनएसयुआय काँग्रेसच्या शहर जिल्हा प्रभारीपदी अनिस शकुर चुडीवाला यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी नफिस चुडिवाला यांनी अजीम काझी यांनी गाजविलेल्या विविध स्पर्धांची माहिती दिली. डॉ.रिजवान यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सामाजिक संस्थांच्यावतीने शहिद दिनी रक्तदान करुन आदरंजली

वेब टीम नगर- शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त सामाजिक समता विचारधारा फौंडेशन, कै.गणपतराव शेकटकर सामाजिक प्रतिष्ठान,अंजना फौंडेशन अहमदनगर यांच्या एकत्रित सहसंयोजक आणि नेशनल इंटीग्रेटेड फोरम आर्टिस्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्टीविस्ट ( निफा ) संवेदना फौंडेशन हरियाणा यांच्यासंयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक महाराष्ट्र बालक मंदिर सिद्धार्थनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सामाजिक समता विचारधारा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भोसले, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी रक्तदान करुन शुभारंभ केला.याप्रसंगी सुनिल भोसले म्हणाले, सध्या कोव्हीड-१९या महामारी विरोधातील लढ्यामध्ये संपूर्ण भारतात रक्ताचा तुटवडा भासत आहे पुरवठा आणि मागणी यांत तफावत वाढली आहे.आजच्या दिवशी संपूर्ण भारतात १५०० रक्तदान शिबिरांतुन ९०,००० हजारांहून अधिक रक्त संकलित करण्यात आले आहे तसेचसदरचे रक्तदान शिबीर भारतासहीत अमेरिका, रशिया, आदी ठिकाणी पंधरादेशांतून एकाच दिवशी रक्त संकलनाचे कार्य हाती घेतले आहे याची दखलही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या नामांकित संस्थेनं घेतली असल्याचे श्री.भोसले यांनी सांगितले.

याप्रसंगी सुनिल सकट म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत युवकांनी रक्तदान करुन शहिद दिन साजरा करुन त्यांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव केला आहे. अशा उपक्रमातून समाजामध्ये एकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबरच आरोग्य सेवा आबाधीत राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

जन कल्याण रक्तपेढी अ.नगर यांनी रक्त संकलन करुन हा कार्यक्रम यशस्वी केला. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहिद हुतात्म्यांना आदरांजली दिली. यावेळी मानव हक्क अभियानचे अशोक भोसले, शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे, गणेश शेकटकर, अंजना फौंडेशनचे अध्यक्ष ऋषीकेश इवळे, अमित भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. गणेश राजगुरु, सुदाम वैराळ, मिनाताई भोसले, उमाताई शेकटकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी प्रशासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देश उभारणीसाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले : सुभाष गुंदेचा

वेब टीम नगर :  देश बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी धावून जाण्याची वृत्ती असलेल्या कुटुंबात भगतसिंग जन्माला आले. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला ते महत्व देत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न त्यांच्यावर होणारे अन्याय यासाठी ते लढले. देश उभारणीसाठी बलिदान दिलेल्या या क्रांतीकारकांचे स्वप्न मात्र आजही अपूर्णच राहिले, अशी खंत शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा यांनी व्यक्त केली.

हुतात्मा स्मरण प्रबोधन मंच आयोजित हुतात्मा शहिद दिवस शहर सहकारी बँकेत साजरा करण्यात आला. क्रांतीकारक राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गुंदेचा बोलत होते. याप्रसंगी मंचचे अध्यक्ष कुतुबुद्दीन शेख, संचालक संजय घुले, प्रकाश वैरागर, बजरंग पवार, भाऊसाहेब विधाते, जयंत गायकवाड, शाम साठे, गोरक्ष दिवटे, विजय जगताप आदि उपस्थित होते.

गुंदेचा पुढे म्हणाले, समाजासाठी शेतकरी आणि मजूर महत्वाचे घटक शहिद भगतसिंग मानत होते. या दोन घटकांची लूट समाजाकडून त्यावेळी होत असत. अन्नधान्याची निर्मिती करणारा भुकेने मरत असत. जे मजूर सगळ्यांसाठी कपडे विणतात, त्यांच्या मुलांना मात्र अंगभर कपडे मिळत नव्हते. ज्यांनी शेतकरी व मजूर यांच्यासाठी बलिदान दिले तरी त्या शेतकर्‍यांचे व मजूरांचे आजही हाल होत आहे. त्यामुळे क्रांतीकारकांनी केलेल्या बलिदानानंतर ही त्यांचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले. याचे वाईट वाटते, असे गुंदेचा म्हणाले.

प्रास्तविकात मंचचे अध्यक्ष कुतुबुद्दीन शेख यांनी क्रांतीकारकांची प्रेरणा समग्र परिवर्तन करु शकते. इतिहास हा घडत असतो, भुगोल हा बदलत असतो आजही युवकांनी इतिहासापासून प्रेरणा घेतली पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शहिदांचे स्मरण करणे काळाची गरज आहे; तरच पुढच्या पिढीला त्यांच्या बलिदानाचे महत्व समजेल. केवळ शहिद दिवस साजरा करुन चालणार नाही तर ते का शहिद झाले, त्यांची प्रेरणा सर्वांनी घेणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले.

यावेळी कासिफ शेख व अब्दुल हादी शाबीर या विद्यार्थ्यांनी शहिद राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांच्या विषयी महिती आपल्या मनोगतामधून दिली. शेवटी संजय घुले यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वृक्षसंवर्धन हि काळाची गरज : वनक्षेत्रपाल डी.आर.जिरे

वेब टीम नगर : तालुक्यातील देवगाव येथे नाबार्ड व कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या आर्थिक सहकार्याने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोटक्षेत्र विकास प्रकल्प राबविला जातो. गावामध्ये नवजीवन प्रतिष्ठान व सामाजिक वनीकरण विभाग अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन व हवामान दिन वृक्षारोपण, वन्य पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार करणे, झाडांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन करणे इ. उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल डी.आर.जिरे म्हणाले कि, वाढत्या शहरीकरणामुळे वनक्षेत्र घटत चालले आहे. सिमेंट ची जंगले वाढत चालली आहेत. यात ग्लोबल वॉर्मिंग चा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे वातावरण बदलत चालले आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे. याचा विपरीत परिणाम ऋतुमानावर होतो आहे. त्यामुळे जल , जंगल, जमीन, जनावर आणि जीवन यांची यात विलक्षण हानी होते आहे. हे रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन हि काळाची गरज आहे असे ते म्हणाले

याप्रसंगी नवजीवन चे राजेंद्र पवार, वनपाल ए.डी.बोरुडे,  सरपंच संभाजी वामन, जयकिसानचे संजयमास्तर वामन, सोमनाथ वामन , महेंद्र वामन, निखील शिंदे, मिठूभाऊ वामन, अजिनाथ बळे, जयेश गायकवाड आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाल्मिकी समाजाचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून युवकांपुढे येणार 

दीप चव्हाण : वाल्मिकी समाज उत्पत्ती स्थिती आणि परिवर्तन या पुस्तकाचे प्रकाशन

वेब टीम नगर : शहरातील वीर गोगादेव मंदिरात वाल्मिकी समाज उत्पत्ती स्थिती आणि परिवर्तन या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रभाकर मांडे लिखीत या पुस्तकात भारतातील वाल्मिकी समाजाचे निरीक्षण व अनेक ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी लेखक प्रभाकर मांडे, सारडा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व संशोधण केंद्राच्या समन्वयक प्रा.डॉ. ज्योती बीडलान, गोदावरी प्रकाशनच्या संचालिका वृषाली मांडे, प्रा. सुनीता थोरात आदी उपस्थित होते.

या पुस्तकात वाल्मिकी समाजाचं उदय, या समाजातील जाती, जमाती समावेश व विकास, आराध्य दैवत गोगादेव, समाजाची धार्मिक श्रद्धा याबाबत सविस्तर विचार मांडण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी ऋषी पासून सन १८५७ चा स्वतंत्र लढा यामध्ये अनुसूचित जाती, जमाती म्हणून सहभागाचा अभ्यास आहे. दिल्ली येथील अंतर राष्ट्रीय म्युझिअम ऑफ टॉयलेट, भंगी मुक्त चळवळ व आजच्या आधुनिक काळात समाजात होत असलेले बदल व विकास, भारतीय समाज व्यवस्थेत त्यांचे स्थान याबाबत लेखक मांडे यांनी सविस्तर मांडणी केली आहे.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी दीप चव्हाण म्हणाले की, या पुस्तकातून वाल्मिकी समाजाचा इतिहास युवकांपुढे येणार आहे. आजपर्यंत असा प्रयत्न कधीही झाला नाही. समाजाचा श्रम, संस्कृती व उद्याचा अभ्यास यामध्ये मांडण्यात आला असल्याने हे पुस्तक युवकांना चालना देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.डॉ. ज्योती बीडलान म्हणाल्या की, हे पुस्तक सामाजिक ऐक्य व विकासासाठी कायम मार्गदर्शक राहणार आहे. समाजातील युवक-युवतींना आपल्या पुर्वजांचा इतिहास ज्ञात होणार आहे. वंचित घटक असलेल्या वाल्मिकी समाजातील लोक समूहाला हे पुस्तक नवक्षेत्रात विकास, मूल्य व संस्काराला चालना देण्यासाठी बहू उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले. वृषाली मांडे यांनी या पुस्तकाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.प्रमोद तांबे यांनी केले. आभार प्रा. विलास नाबदे यांनी मानले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेडिकल चालकाचा प्रमाणिकपणा

दुकानात विसरलेली ७० हजार रोख रक्कम असलेली पैश्याची पिशवी केली परत

वेब टीम नगर : तारकपूर बस स्टॅण्ड समोर मेडिकल दुकानात विसरलेली पैश्याची पिशवी मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका यांनी प्रमाणिकपणा दाखवित डॉ. कथुरिया यांच्या हस्ते वैभव शेळके यांना परत केली.

वैभव शेळके कर्जतहून उपचारासाठी तारकपूर बस स्थानक समोर डॉ. कथुरिया यांच्याकडे सकाळी आले होते. औषध घेण्यासाठी ते आनंद मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये आले. मात्र त्यांची एक पिशवी दुकानात राहिल्याचे मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका  यांच्या निदर्शनास आले. त्यांने ती पिशवी उघडली असता त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात डॉ. कथुरिया यांना सांगितले मात्र शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दुपारी उशीरा शेळके यांना पिशवी हरवल्याची जाणीव झाली. त्यांनी पिशवी शोधत मेडिकल स्टोअर्समध्ये आले असता आनंद धोका यांनी त्यांची ओळख पटवून सदर पैश्याची पिशवी डॉ. कथुरिया यांच्या हस्ते परत दिली. मेडिकल चालकाचा प्रमाणिकपणा पाहून शेळके भारावले. त्यामध्ये ७० हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगून पैश्याची पिशवी परत दिल्याबद्दल आभार मानले . 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवनाथ विद्यालयाला नगर तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान

वेब टीम नगर : निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाने नगर तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान पटकाविला आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नवीन निकषाप्रमाणे जिल्हा तंबाखूमुक्त नियंत्रण अभियानांतर्गत लाम मुंबई फाऊंडेशन व हम संस्थेच्या वतीने शाळेचे परीक्षण करुन तंबाखूमुक्त शाळा होण्याचे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती उपक्रमशील शिक्षक उत्तम कांडेकर यांनी दिली.

तंबाखू मुक्त अभियानातंर्गत शाळेत पालक, विद्यार्थी यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. तर तंबाखू मुक्तीसाठी विविध स्पर्धा व उपक्रमे घेण्यात आले. शाळेच्या १०० मीटर अंतराच्या परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणार्‍या व्यक्तीला दंडात्मक कारवाईच्या सुचना करुन तंबाखूची विक्री व सेवन रोखण्यात आले. हा बहुमान मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या उपक्रमास डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी उत्तम कांडेकर, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. हा बहुमान मिळाल्याबद्दल गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन आंदोलन : ईव्हीएम मशीन हटविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चोभे मास्तरांचे धरणे

निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपर वापरण्याचे ग्रामपंचायतींना ठराव घेण्याचे आवाहन  

वेब टीम नगर :  ईव्हीएम मशीन हटवून लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन आंदोलनाच्या वतीने जालिंदर चोभे मास्तर यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. तर ग्रामपंचायतीने निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपर वापरण्याचे ठराव घेण्याचे आवाहन करुन, त्यांनी नागरिकांना ईव्हीएम मशीन विरोधी पत्रके वाटली.  

ईव्हीएम मशीन भारतीय राज्यघटना आणि लोकतंत्राच्या विरोधातील पाऊल असून, यामुळे देशात हुकूमशाहीचे प्रस्थ वाढत आहे. निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग झाल्याचे अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील २०१३साली यावर शिक्कामोर्तब केला होता. तरीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरण्यात आले. त्यानंतर झालेल्या विविध राज्यातील निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएम मशीनद्वारे उमेदवारांच्या मतांची अदलाबदल होत असल्याचा आरोप करुन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन आंदोलनाच्या वतीने अनेकवेळा धरणे आंदोलन, उपोषण करून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ईव्हीएम मशीनमध्ये अपहार होऊन मतांची हेराफेरी होऊ शकते. ईव्हीएम मशीन मधील मायक्रोचीप अमेरिकेतून येते. त्यामध्ये मतांच्या हेराफेरीचा प्रोग्राम सेट करण्याची व ते परदेशातून ऑपरेट करण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असून, देशातील सर्व निवडणुका बॅलेटपेपरवर होण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणने आहे.

सर्व ग्रामपंचायतींनी निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेटपेपरवर घेण्याचा ठराव घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. घेतलेला ठराव जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे ठरावला संसदेच्या ठराव इतकेच महत्त्व भारतीय राज्यघटनेने दिलेले असल्यामुळे हा ठराव ईव्हीएम मशीन बंद करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकारी, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार रद्द करू शकत नाही. मग मत प्रक्रियेबाबत घटनात्मक पेच निर्माण होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन राज्यघटनेचा अवमान न करता घटनात्मक तरतुदीनुसार ईव्हीएम मशीन बंद होणार असल्याची भावना जालिंदर चोभे मास्तर यांनी व्यक्त केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने वन्यजीव तहान तडफड सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन

पाण्याअभावी वन क्षेत्रातील पशु, पक्षी मरत असताना वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

वेब टीम नगर : पाण्याअभावी वन क्षेत्रातील पशु, पक्षी मरत असताना याकडे दुर्लक्ष करणार्‍या वन विभागाच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने वन्यजीव तहान तडफड सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून वन विभागाच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

मार्च पासूनच उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना वन क्षेत्रातील पशु, पक्षी पाण्यासाठी भटकत आहे. संघटनेने आठ वर्षापुर्वी महाराष्ट्रात भिम हनुमान बंधारे बांधण्याची मागणी तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे केली होती. मात्र ही संकल्पना त्यांना रुचली नसल्याने भिम हनुमान बंधारे बांधण्यास परवानगी मिळाली नाही. अनेक वर्षे मार्च ते जून डोंगराळ व वन विभागाच्या हद्दीत वन्य पशु, पक्षी तहान व अन्नापासून वंचित राहतात. यामध्ये अनेक पशु-पक्ष्यांचा जीव देखील जातो. मात्र हा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. जंगलातील पशु व प्राणी पाणी, अन्नाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची दहशत पसरलेली आहे. नुकतेच राज्याचे वनमंत्री एका नाजुक प्रकरणात अडकले असताना, वन विभागाचा टंगळमंगळ कारभार सुरु आहे. राज्यकर्त्यांना वन्यजीवांची पर्वा नसल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

राज्य सरकारने भिम हनुमान बंधारे बांधल्यास वन्य पशु-पक्ष्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. तसेच जलयुक्त जंगल ही संकल्पना असतित्वात येणार आहे. उन्हाच्या तीव्रतेने पशु, पक्षी पाण्याअभावी तडफडून मरत असताना वनविभाग याकडे फक्त बघ्याची भूमिका घेत असून, या विरोधात संघटनेने वन्यजीव तहान तडफड सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन जारी केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments