नगरटुडे बुलेटीन 23-03-2021

नगरटुडे  बुलेटीन 23-03-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जलवाहिनी शेजारीच  टाकली जात आहे मोबाईल कंपन्यांची केबल 

 नितीन भुतारे : भविष्यात केबालाच्या का मा करिता खोदाई करतांना जलवाहिनी फुटली तर जबाबदार कोण? 

वेब टीम नगर  : शहरातील नगर- पुणे महामार्गावर सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. हे काम करताना स्टेशनरोड, केडगाव तसेच शहरातील मुख्य भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी हलविण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई केलेल्या लाईन मध्येच आयडिया, एअर टेल, जिवो, व्होडाफोन या व ईतर कंपनीच्या केबल टाकण्याचे काम चालु आहे. तसे पाहता जलवाहिनी भविष्यात धोका होणार नाही. म्हणुन जलवाहिनी शेजारी कुठल्याही प्रकारच्या ईतर केबल, लाईन टाकता येत नाही. तरी सुद्धा या मार्गावर जलवाहिनी शेजारी या सर्व टेलिकॉम कंपनीच्या लाईन टाकल्या जात आहे. या लाईन टाकताना आयडिया एअर टेल, जिओ, व्होडाफोन व ईतर कंपन्यांनी महानगर पालिकेची कुठलीही परवानगी घेतलेली नाही हे मनसेच्या नितीन भुतारे यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन दिले असुन उड्डाण पुलाच्या मार्गावर जे जलवाहिनी टाकण्याचे काम चालु आहे. त्या मध्येच ईतर टेलिकॉम कंपनीच्या केबल टाकण्याचे काम बंद  करून टाकलेल्या केबल काढून टाकाव्यात भविष्यात या टेलिकॉम कंपनीच्या केबल ला काही दुरुस्ती करण्याची वेळ आली तर ती खोदताना जलवाहिनीला तडा जाऊ शकतो व शहरातील भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो . जलवाहिनी फुटण्याचे प्रकार दर महिन्यात समोर येत असताना असे कामे करून जलवाहिनी फोडण्यास आपण व आपले संबधित अधिकारी अश्या अनधिकृत कामाकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे निमंत्रण देतात. तसेच टेलिकॉम कंपनीच्या केबल टाळण्याकरिता महानगर पालिकेची रितसर परवानगी घेऊन जलवाहिनी पासुन विरुध्द बाजूला केबल टाकावी लागते जेणे करून जलवाहिनीला कुठलाही धोका पोहोचणार नाही असे असतांनाही आपल्या अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार दिसतं असताना हि सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला महानगरपालिका अश्या अनधिकृत कामाला करून घेऊन पाठीशी घालत आहे. भविष्यात या केबल च्या कामाकरीता खोदाई करतांना जलवाहिनी फुटली तर जबाबदार कोण? याचे उत्तर मनसेला व जनतेला द्यावे व चाललेले केबालाचे अनधिकृत काम ताबडतोप थांबऊन टाकलेल्या सर्व केबल काढून जलवाहिनी वाचावावी तसेच अनधिकृतपणे  काम करणाऱ्या ठेकेदारावर करवाई करावी अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील 

 विक्रम राठोड : लोढा हाईटस् व्यापारी असो. व शिवसेनेच्यावतीने सत्कार

   वेब टीम   नगर :  नगरमध्ये सिंधी समाज मोठ्या प्रमाणात आहे, नगरकरांचा एक अविभाज्य भाग असलेल्या या समाजाने नेहमीच विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष असलेल्या स्व.लालूशेठ मध्यान यांनी नगरच्या सामाजिक  कार्यातही सहभागी असत. समाजचे संघटन करुन दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या आकस्मित  निधनाने मोठी हानी झाली आहे. मध्यान कुटूंबियांने नेहमीच समाज उन्नत्तीचे काम केले आहे. महेश मध्यान हेही समाजातील विविध उपक्रमात नेहमीच सक्रिय राहून कार्य करत आहेत. चाली हो उत्सवाबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहेत. आता अध्यक्षपदाची सोपवलेली जबाबदारी ते सर्वांना बरोबर घेऊन पार पाडतील. समाजातील प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देतील. त्यांच्या कार्यास सहकार्य देऊ, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केले.

     सिंधी जनरल पंचायतच्या अध्यक्षपदी महेश मध्यान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा लोढा हाईटस् व्यापारी असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष व शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजु गुरुनानी, रमेश तनवानी, महेश कुकरेजा, पपी नागपाल, संजय तनवानी, मनिष गोपलानी, जयराम मेहतानी, ठाकूर चुग, दिलीप आहुजा, हरेश वाधवानी, जगदीश आहुजा, कन्हैय्यालाल लुथिया, विनोद कुकरेजा आदि उपस्थित होते.

     सत्कारास उत्तर देतांना महेश मध्यान म्हणाले, समाजसेवेचा वारसा आपल्याला घरातून मिळालेला असल्याने आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहोत. समाजातील विविध उपक्रमातील सक्रिय सहभागातून समाजाचे देणे लागतो, या भावनाने काम करत आहोत. समाजातील ज्येष्ठ व समाज बांधवांनी आपणावर ही अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे ती समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करुन. समाजाचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच विविध उपक्रमातून सर्वांसाठी कामा करण्यास प्राधान्य देऊ.  या सत्कारामुळे आपणास प्रेरणा मिळणास असून, असेच सर्वांचे सहकार्य राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैय्यालाल लुथिया यांनी केले तर आभार राजू गुरुनानी यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगरची विकसित शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील 

अविनाश घुले  : सारसनगर, पारिजात कॉलनी येथील रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

    वेब टीम  नगर :  नगर शहर हे पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा यामधील मध्य शहर असून, त्यामुळे शहराला विशेष महत्व आहे. त्याचबरोबर शहराला ऐतिहासिक पार्श्‍वभुमी असल्याने पर्यटकही या ठिकाणी येत असतात. त्यामुळे आपल्या शहराची विकसित शहर म्हणून ओळख निर्माण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी आ.संग्राम जगताप पुढाकार घेत असून, आपणही मनपाच्या माध्यमातून या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर प्रभागातील मुलभुत सुविधांबरोबर प्रभागात इतर प्रकल्प राबवून एक आदर्श प्रभागकडे वाटचाल सुरु आहे. नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात त्यांचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो. प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, काही सुरु आहेत. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाचा विकास होत आहे, ही प्रक्रिया निरंतर सुरु राहील, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केले.

     प्रभाग क्र.११, सारसनगर, पारिजात कॉलनी येथील रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा. कुरेशी, इम्रान जहागिरदार, छबुराव कांडेकर, के.डी.देशमुख, के.एस.क्षेत्रे, प्रणिल कसोटे, मिलापचंद पटवा, आनंद दरेकर, अक्षय कांडेकर, दिशा गवळी, सुरेखा देशमुख, लिला पटवा, वैशाली दरेकर, वैशाली साळवे, शितल मुनोत, शालिनी क्षेत्रे, नानासाहेब गायकवाड आदि उपस्थित होते.

     मिलापचंद पटवा म्हणाले, सारसनगर भागात चांगल्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. येथील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यास यासाठी प्रभागाचे नगरसेवक प्रयत्न करत आहेत. मुलभुत सुविधाबरोबर या भागाच्या सौदर्यात भर टाकणारे प्रकल्प उभे राहवेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. नागरिकांनी सार्वजनिक सुविधांचाा वापर चांगल्या पद्धतीने करावा. आपल्या भागातील कामांसाठी पाठपुरवावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा.कुरेशी, इम्रान जहागिरदार आदिंनी मनोगते व्यक्त करुन प्रभागाच्या विकासात आपणही चांगले योगदान देऊ, असे आश्‍वासन दिले. सूत्रसंचालन के.डी.देशमुख यांनी केले तर छबुराव कांडेकर यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

युवकांनी रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती व्यक्त केला आदर

श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या नगर शाखेचा उपक्रम

    वेब टीम  नगर : एकाचवेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी  मोगल, इंग्रज, डच व आप्तेष्ट यांच्याशी संघर्ष करत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करत स्वतःचे बलीदान दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कधीही, कोणीही विसरु नये. श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांच्या स्मृती कायम जागृत रहाव्यात, यासाठी दरवर्षी नगरमध्ये बलिदान मास पाळण्यात येतो. यावेळी श्रीशिव प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते विविध दैनदिन गोष्टींचा त्याग करुन महिनाभर सुतक पाळतात. यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान करुन युवकांनी त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे, असे प्रतिपादन श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नगर शाखेचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा बलिदान मास महिनाभर पाळतांना छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी केश मुंडण करतात, पायात चप्पल न घालता अनवाणी रहातात, महिनाभर गोड पदार्थ खाण्याचे टाळतात, कोणत्याही उत्साही व आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होता हिंदू धर्म रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेल्या यातनांचे चिंतन करत धर्मरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प करतात. नगर शहरासह जिल्ह्यातील राहुरी, पारनेर, नेवासा, श्रीरामपूर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, कडा, आष्टी अशा विविध भागातील युवक बलिदान मास अत्यंत निष्ठेने पाळतात. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रविवारी दि.११ एप्रिल रोजी फाल्गुन दर्श अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र वडु बुद्रुक येथून नगर शहरात धर्मवीर मशाल आणण्याचे नियोजन प्रतीवर्षाप्रमाणे करण्यात आले आहे. या धर्मवीर मशालीसह सायंकाळी ५.३० वाजता नगर शहरातील एस.टी.स्टॅण्डजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून मुक पदयात्रा काढण्यात येईल.

          धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या नगर शाखेच्यावतीने बलिदान मास पाळला जात आहे. या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचा शुभारंभ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाले. या शिबिरात ५० हून अधिक युवकांनी रक्तदान केले. यावेळी विनोद काशिद, अक्षय सुकटकर, रवि परदेशी, अमोल शिंदे, आशिष क्षीरसागर, अंकुश तरवडे, साई भोरे, डॉ.झेंडे आदिंसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रा.स्व.संघाच्या जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करून रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा रजिस्टार संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडे यांचा सन्मान

वेब टीम नगर : न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडे यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक २०२१ पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर जिल्हा रजिस्टार संघटनेच्या वतीने त्याचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. पेमराज सारडा महाविद्यालयात संघटनेचे प्रमुख सल्लागार अशोक असेरी यांनी संतोष कानडे यांचा सत्कार केला. यावेळी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे रजिस्टार शिवाजीराव साबळे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण बळीद, अहमदनगर कॉलेजचे रजिस्टार दीपक आल्हाट आदी उपस्थित होते.

          अशोक असेरी म्हणाले, महाविद्यालयाच्या कामकाजात शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर कार्माचारींचेही भरीव योगदान असते. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी हा महाविद्यालयातील प्रमुख घटक आहे. न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडे यांच्या महाविद्यालयातील चांगल्या कामाची दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यालयाने घेत दिलेला पुरस्कार नगर जिल्हा रजिस्टार संघटनेला अभिमानास्पद आहे.

          शिवाजीराव साबळे म्हणाले, शिक्षाकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचारी घटकही महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात सहभगी होत सर्वांना मदत करत असतो. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाची दाखल घेत राज्य शासनाने आदर्श शिक्षका प्रमाणे आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्यास सुरवात करावी, अशी मागणी केली.

          सत्कारास उत्तर देताना संतोष कानडे म्हणाले, महाविद्यालयात काम करतांना सुरवाती पासूनच मिळालेल्या सर्व जवाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडल्या. सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक कामां बरोबरच सामाजिक क्षेत्रातही काम करू शकलो. या कामांची दखल घेऊन मला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. नगर जिल्हा रजिस्टार संघटनेने केलेला सत्कार हा प्रेरणा देणारा आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 भिंगारच्या ‘एफएसआय’चा प्रश्‍न सोडविणे हीच राठोड, गांधी, पिल्ले, पाटील यांना श्रद्धांजली ठरेल

    वेब टीम  नगर : स्वर्गीय अनिल राठोड, स्व.दिलीप गांधी आणि स्व.रामकृष्ण पिल्ले यांनी आपापल्या पक्षावर निष्ठा कायम ठेवून, पक्षविरहित लोक जोडण्याचे काम केले तसेच लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. भिंगारचा पूल, पाणीप्रश्‍न, किल्ला सुशोभिकरणाचे मुद्दे या तिघांनी आक्रमकपणे मांडले. भिंगारच्या एफएसआयचा प्रश्‍न हा तिघांच्याही जिव्हाळ्याचा होता. मात्र तो अद्याप सुटला नसल्याने त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन तो प्रश्‍न सोडविला तर तीच खर्‍या अर्थाने या चौघांनाही श्रद्धांजली ठरेल, असे मत कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे यांनी व्यक्त केले.

     भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात स्व.अनिल राठोड, स्व.दिलीप गांधी, स्व.रामकृष्ण पिल्ले व ज्येष्ठ नागरिक संघाचे स्व.अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील या चौघांना भिंगार शहर वासियांच्यावतीने सर्व पक्षिय श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे अध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे होते तर व्यासपीठावर भाजपा महिला उपाध्यक्ष व माजी कॅन्टों.बोर्ड सदस्या सौ.शुभांगी साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ, काँग्रेसचे प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे, स्व.पिल्ले यांचे ज्येष्ठ बंधू गोपाळराव पिल्ले, सेवा दल उपाध्यक्ष सौ.कौसर महेमुद खान आदि उपस्थित होते.

     स्व.अनिल राठोड यांचा भिंगारवर विशेष लोभ होता. साध्या कार्यकर्त्याने फोन केला तरी काही मिनिटात अनिल भैय्या हजर होत असत. असेच काही किस्से दिलीप गांधींच्या बाबतीत होते. या दोघांनीही भिंगारसाठी आपआपल्यापरिने समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅड.रामकृष्ण पिल्ले हे सलग तीन वेळा कॅन्टों.बोर्डचे उपाध्यक्ष होते. त्यावेळीही त्यांनी विकासाची अनेक कामे केली. भिंगार एस.टी.स्टॅण्ड, सदर बाजार ही बाजारपेठ पिल्ले यांच्या कारकर्दीत वसली तर सुभाषचंद्र पाटील यांचे ज्येष्ठ नागरिक संघासाठीचे काम उल्लेखनिय असून, या चारही व्यक्तींनी भिंगारसाठी मोलाचे योगदान दिले आहे, अशा भावना सर्व पक्षिय श्रद्धांजली सभेत विविध वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.

     जिल्हा काँग्रेसचे अ‍ॅड.साहेबराव चौधरी, ज्येष्ठ काँग्रेस नेते अनिल परदेशी, भाजपाच्या सौ.साठे, शहर काँग्रेसच्या सरचिटणीस नलिनी गायकवाड, काँग्रेसचे श्री.वाघस्कर, भाजपाचे अध्यक्ष वसंत राठोड, राष्ट्रवादीचे श्री.सपकाळ, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वंचित बहुजन आघाडीचे विकास चव्हाण, नगर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, विशाल बेलपवार, शुभम पिल्ले आदिंची समयोचित भाषणे झाली.

     यावेळी काँग्रेसचे रिजवान शेख, भाजपच्या सौ.ज्योत्स्ना मुंगी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश कांबळे, बी.सी.बडवे, बी.आर.कांबळे, मुकुंद बोधे, रमेश कडूस, शाम चौरे, रमेश वराडे, सुधाकर चिंदबरम, अशोक जाधव, माजी कॅन्टों.बोर्ड सदस्य बाळासाहेब पत्की, भाजप उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, आनंद बोथरा, किशोर कटोरे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, भाऊराव बिडवे, अनंत रासने, सुभाष होडगे, सागर चाबुकस्वार आदि उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल बेलपवार यांनी केले.  

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह

अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर  : कमी वेतन असल्याने कामगारांना महागाईच्या काळात जगणे देखील अवघड 

वेब टीम नगर : पगारवाढीच्या कराराची मुदत संपून एक वर्ष होत असताना देखील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारवाढी प्रश्‍नी तोडगा निघत नसल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने कामगारांनी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु केले. पगारवाढीचा प्रश्‍न निकाली निघत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.  

पगारवाढ न देणार्‍या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष लांडे, युनिट अध्यक्ष सतीश पवार, लाल बावटा विडी कामगार युनियन उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार सहभागी झाले होते. या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अरणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव शेळके यांनी पाठिंबा दिला. तर मेहेरबाबा ट्रस्टचे विश्‍वस्त मेहेरनाथ कलचुरी व रमेश जंगले यांनी आंदोलकांची भेट घेऊन सदर प्रश्‍नी उद्या पर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. मात्र आंदोलकांनी पगारवाढचा निर्णय होई पर्यंत  उठणार नसल्याची भूमिका स्पष्ट करुन आंदोलन सुरु ठेवले आहे.  

 अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे व इतर कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. यापैकी मोजक्या तारखांना विश्‍वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा एक हजार चारशे पहिल्या वर्षीसाठी, दुसर्‍या वर्षी दोन हजार आठशे व तीसर्‍या वर्षी चार हजार दोनशे अशा टप्प्याटप्यांनी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने महागाईच्या काळात ही पगारवाढ परवडणारी नसल्याने कामगारांनी ट्रस्टचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. तर दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी केली आहे.

अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, कमी वेतन असल्याने कामगारांना महागाईच्या काळात जगणे देखील अवघड झाले आहे. कामगार बाबांच्या श्रध्देपोटी अनेक दिवसापासून सेवा देत असून, महागाईमुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत नाही. मेहेरबाबा ट्रस्टचे १२०कोटी रुपयाने बॅलेन्स शीट असताना, कोरोना काळात ट्रस्टने कोट्यावधी रुपयाच्या जमीनीचे खरेदी व्यवहार केले. मात्र कामगारांच्या पगारवाढीसाठी त्यांनी कोरोनामुळे आर्थिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे. ट्रस्टने कामगारांना परवडेल अशी पगारवाढ देऊ करुन हा प्रश्‍न सोडविण्याचे त्यांनी सांगितले. युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज असून, पगारवाढ प्रश्‍नी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सात तारखा होऊन देखील प्रश्‍न सुटत नाही. ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा वाद चिघळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, इतर धार्मिक संस्थांच्या तुलनेत मेहेरबाबा ट्रस्टमधील कामगारांना अत्यंत कमी वेतन आहे. किमान उदरनिर्वाह होईल एवढे वेतन कामगारांना मिळणे आवश्यक असून, या न्याय, हक्काच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघात ग्रामस्थांची कोरोना चाचणी

पै.नाना डोंगरे  : कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक

वेब टीम नगर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झालेल्या कोरोना चाचणीस गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.

आरोग्य सेविका सलिमा पठाण, आरोग्य सेविक निलेश हराळ, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, मदतनीस रेखा ठोंबरे, सलिम मोहंमद, घनश्याम कदम, संदिप येनारे, शंकर कापसे, पप्पू शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी  कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी निष्काळजीपणाने न वागता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन केल्यास कोरोनाला रोखता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विकास साधण्यासाठीमोठ्या गावांना लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देण्याची स्वयंसेवी संघटनांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते वसंत लोंढा आणि सुहास मुळे यांना लॉरीस्टर ऑफ मासेस

माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.आर.आर. पिल्ले यांना श्रध्दांजली

वेब टीम नगर :  तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या गावांना लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देऊन गावांचा विकास साधण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात मांडण्यात आला. तर राज्यातील 120 प्रगत गावांना 1 मे महाराष्ट्र दिनी लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देण्याची मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारे सामाजिक कार्यकर्ते वसंत लोंढा आणि सुहास मुळे यांना लॉरीस्टर ऑफ मासेस बहुमानाने सन्मान करण्यात आला.

प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.आर.आर. पिल्ले यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते 120 प्रगत गावांना 1 मे महाराष्ट्र दिनी लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाचे पूजन करण्यात आले. तसेच नागरिकांच्या निरोगी व सदृढ आरोग्यासाठी आरोग्य धनसंपदा मोहिमेची घोषणा करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका जाधव, पद्मा गोरख, गोपीनाथ म्हस्के, संगीता साळुंके, शारदा भालेकर, फरिदा शेख, सुशीला देशमुख आदी उपस्थित होते.  

ग्रामीण महाराष्ट्रात असलेल्या तालुक्यासह इतर मोठ्या गावांचा विकास साधण्यासाठी लोकमान्य उपतालुक्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगार, निवारा, आरोग्य व उच्च शिक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तसेच निरोगी व सदृढ आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करण्याची गरज आहे. सकाळी लवकर उठून निशुल्कपणे व्यायाम करता येऊ शकतो. यासाठी चालना देण्याची गरज असून, संघटनेने आरोग्य धनसंपदा मोहिम सुरु करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर नगर जिल्ह्यातील मिरजगाव, तळेगाव दिघे, तिसगाव, साकुर, आष्टी, घारगाव इत्यादी गावांना उपतालुक्याचा दर्जा देण्याची मागणी संघटनेने लाऊन धरली आहे. मोठ्या गावांना लोकमान्य उपतालुक्याचा दर्जा दिल्यास उच्च शिक्षण संकुलाची निर्मिती होऊ शकणार आहे. त्याशिवाय लघु उद्योगांचा विकास व स्वयंरोजगार निर्माण होऊन विकास साधला जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments