अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग: असे होते शहाजी राजे


अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग :

 असे होते शहाजी राजे 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व  व राजकीय जडणघडणीत त्यांचे वडील शहाजी राजे यांचे अनन्य साधारण महत्व  आहे. या संदर्भात मोडीलिपी तज्ज्ञ व इतिहास अभ्यासक नारायणराव आव्हाड यांनी लिहिलेला लेख.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकवी परमानंद याने ‘शिवभारत’ नामक संस्कृत काव्य ग्रंथ रचला. हा ग्रंथ संपादक सदाशिव महादेव दिवेकर यांना तंजावर येथे मिळाला. या ग्रंथाचे एकूण ३२ अध्याय व २२६२ श्लोक आहेत. १ ते ३१ अध्याय पूर्ण आहेत. शेवटचा ३२ वा अध्याय अपूर्ण आहे. काही अध्यायात ‘निधीवासकर परमानंद’ किंवा ‘निवासकर परमानंद’ असाही उल्लेख आढळतो. मिळालेल्या ग्रंथात शिवाजी महाराज यांचा उल्लेख ‘राजाराजगिरीश्वर’ या पदाने केलेला आहे. यावरून महाराजांचा कारभार राजगडावरून चालत असे. त्याकाळचा उल्लेख केलेला आहे. ग्रंथकर्ता निधीवासकर म्ह‍णजे तो नेवाश्याचा राहणारा होता हे सिद्ध होते. त्या‍ची कुलदैवत एकविरा होती. ‘शिवभारत’ हा ग्रंथ महादेव दिवेकर यांनी संपादन करून १९२७मध्ये प्रकाशित केला. कवींद्र परमानंदाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून हा संस्कृत काव्य चरित्रग्रंथ तयार केला आहे. या ग्रंथातील शहाजी राजे यांच्या विषयी माहितीचा अनुवाद – 

दक्षिणेत सूर्याप्रमाणे तेजस्वी, धैर्यवान, शुरवीर असे मालोजी राजे होऊन गेले. त्यांनी भीमा नदीच्या काठावर आपल्या राज्यांचा विस्तार केला. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘स्वामी’ नावाने ओळखू लागले. याच काळामध्ये  दौलताबादवर निजामशहा राज्य करीत होता. त्यांच्यामध्ये व विजापूरच्या  आदिलशाहीमध्ये‍ काही बेबनाव झाले. मालोजी राजे यांची कीर्ती निजामशहाला समजली होती. त्यांनी मालोजी राजे यांना दौलताबादला बोलावून त्‍यांचा यथोचित गौरव केला. त्यांच्या बरोबर त्यांचे बंधू होते. दोघांनी निजामशाहीच्या शत्रूचा धुव्वा उडविला. त्या‍वेळी निजामाने त्या दोघांना जहागिरी दिल्या . 

बराच काळ गेल्या नंतर त्यांना सुफी संत शाहशरीफ यांच्या  आशीर्वादाने व शंकराच्या आराधनेने दोन पूत्र झाले. एकाचे नाव शहाजी व दुसरे शरिफजी अशी नावे ठेवली. शहाजी राजे पाच वर्षांचे असताना मालोजी राजे निजामशहाच्या आज्ञेवरून इंदापुरीच्या स्वारीवर गेले. तेथे त्यांंनी शत्रू सैन्य  पराभूत केले. नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. शहाजीराजे तरूणपणी खूप सुंदर दिसत होते. लखुजी जाधव यांनी आपली कन्या जिजाबाई यांचा शहाजी राजे यांच्याशी विवाह लावून दिला. त्यानंतर त्यांंचे काका विठोजी मरण पावले. शहाजीराजे राज्य कारभार चालवू लागले. निजामशाहीचा वजीर मलिक अंबरचे निधन झाल्यावर शहाजी राजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीकडे आले. अशा प्रकारे ते कधी आदिलशहाकडे तर कधी निजामशहाकडे त्यांचे येणे जाणे चालू होते. याच कार्यकाळामध्ये शिवाजी महाराज १२ वर्षांचे झाले असताना दुरदर्शी शहाजी राजे यांनी पुण्याच्या जहागिरीचा कार्यभार सोपविला. त्यांना शिवाजी महाराजांना हत्ती, घोडे, पायदळ, विश्वासू अमात्य विपूल द्रव्य देऊन महाराष्ट्रात पाठविले, असा उल्लेख या ग्रंथात आहे. 

निजामशाहीत मलिक अंबर वजीर असतानाच शहाजी राजे व शरिफजी राजे यांनी भातो‍डी (जि. अहमदनगर) या लढाईत पहिल्यांदा गनिमीकाव्याचा वापर केला. या लढाईत शरिफजी राजे यांना वीरगती प्राप्त झाली. शरिफजी यांची भातोडीमध्‍ये समाधी आहे.  शहाजी राजे यांनी शोधून काढलेल्या याच गनिमीकाव्याचा उपयोग पुढे शिवाजी महाराज यांनी युद्धात उपयोग केला. शहाजी राजे यांनी काही काळ निजामशाहीचा राज्य कारभार चालविला होता. पुण्याची जहागिरी देताना शहाजी राजे यांनी शिवाजी महाराज यांना मुद्रा व ध्वज म्हणून भगवी पताका दिली. पुढे हीच मुद्रा व ध्व‍ज स्वराज्याची राजमुद्रा व ध्वज म्हणून शिवाजी महाराज यांनी वापरला. शहाजी राजे यांचा अनुभव व दूरदृष्टी चा उपयोग राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराज यांनी स्वराज्यू निर्मितीसाठी करून घेतला. 

शहाजी राजे व राजमाता जिजाऊ यांचे अहमदनगर शहरात बरेच दिवस वास्तव्य होते. शहाजी राजे व राजमाता जिजाऊ यांचे एकमेव एकत्रित स्मारक अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात आहे. 

लेखक : नारायणराव आव्हाड

मोडिलिपी वाचक (महाराष्ट्र शासन मान्य)

९८८१९६३६०३

Post a Comment

0 Comments