लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्याचे महत्वाचे विधान

 लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्याचे महत्वाचे विधान 

वेब टीम मुंबई : राज्यात करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. गुरुवारी २५ हजार ८३३ रुग्णसंख्येसह आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन हादरलं आहे. त्यासोबतच सरकारी पातळीवर कोविड नियमावली अधिक कठोर करण्यासाठी पावले टाकली जाऊ लागली आहेत. त्यामुळे राज्यभरात पुन्हा कडकलॉकडाऊन लावले जाणार का, हा  प्रश्न उपस्थित झाला असून यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचे विधान केले आहे.

'राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात जो सर्वोच्च बिंदू रुग्णसंख्येने गाठला होता तो ओलांडला गेला आहे. ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन करणं हा एक पर्याय समोर दिसत आहे पण लगेचच ते करणार नाही. लोक मास्क वापरू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे पण मला अजूनही लोकांकडून सहकार्य हवं आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सूचना वजा इशारा दिला. राज्यात अचानक वेगाने रुग्णवाढ का होत आहे, यावरही मुख्यमंत्री बोलले. परदेशात आढळलेला करोनाचा स्ट्रेन आपल्याकडे आला आहे मात्र त्याचे आकडे नियंत्रणात आणण्यात यश आलं होतं. त्यामुळे आता ज्या वेगाने करोना पसरत आहे त्याचे नेमके कारण काय, हा नवा विषाणू आहे का, याचा शोध घेतला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

गेल्यावर्षी जेव्हा करोनाची साथ आली होती तेव्हा आपल्याकडे व्हॅक्सिन नव्हते. आता आपल्या हातात व्हॅक्सिन आहे. त्यामुळेच लसीकरणावर आमचा भर असून प्रत्येकाने न घाबरता लस घेतली पाहिजे. लसीकरणाला प्रतिसाद वाढला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले. लस घेतल्यानंतरही करोनाची लागण झाल्याच्या अगदी मोजक्या केसेस आहेत. मात्र, त्यातून कुणी दगावण्याचा प्रकार घडलेला नाही. त्यामुळेच लस पूर्णपणे सुरक्षित आहे व ती सर्वांनी घ्यावी, अशी माझी विनंती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

0 Comments