नगरटूडे बुलेटीन -१६-०३-२०२१

 नगरटूडे  बुलेटीन -१६-०३-२०२१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खासगीकरणाविरोधात नगर येथे बँक कर्मचाऱ्याची निदर्शने

वेब टीम नगर : सरकारच्या बँकांच्या खाजगीकरणाच्या निर्णया विरोधात दि. १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसाच्या संपाचे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या संघटनांच्या संयुक्त युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आवाहन केले. त्याला अहमदनगर शहरात १०० प्रतिशत प्रतिसाद देत सर्व बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संप यशस्वी केला.  या प्रसंगी गांधी रोड येथे सर्वसामान्य नागरिक व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागण्यांचे फलक घेऊन खाजगीकरणाचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा हा निर्णय जनविरोधी व समाजविरोधी असल्याचे सांगितले.

 तत्कालीन पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांनी जनतेचा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या  विकासासाठी वापरण्यात यावा या उद्देशाने १९ जुलै १९६९ रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते.  त्यामुळे बँकांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला व बँकिंग सुविधा ह्या सर्वसामान्यांना उपलब्ध झाल्या.  त्याचप्रमाणे कृषी, लघु उद्योग, कुटीर उद्योग, छोटे व्यावसाईक यासारख्या दुर्लक्षित क्षेत्राला कर्जपुरवठा केला जाऊ लागला. परिणामी देशात हरित क्रांती व औद्योगिक क्रांती घडून आली. या छोट्या  उद्योगांचा विकास होऊ लागला व अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा मोलाचा वाटा होता. बॅंका ह्या समाजाभिमुख झाल्या व त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपू लागल्या. सरकारच्या विविध योजना राबवण्यात  त्या नेहमी अग्रेसर आहेत. आजपर्यंत सरकारमार्फत  अनेक गरीब दुर्बल घटकांसाठी २० कलमी कार्यक्रम, शहरी रोजगार, प्रधानमंत्री रोजगार योजना, विविध महामंडळा अंतर्गत ऋण योजना ह्या बँकांमार्फत राबविण्यात येत असत.  त्यामुळे बेरोजगार, कृषी पूरक उद्योग, लघु उद्योग, ग्रामीण उद्योग यांचा विकास होऊ शकला. परंतु बँकांकडून  मोठ्या कारखानदार व उद्योग घराण्यांना करण्यात आलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने हि  कर्जे थकीत व डुबीत कर्जामध्ये समाविष्ट झाली व त्यांच्या साठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागत असून तसेच यापैकी अनेकांची कर्जे राईट ऑफ करण्यासाठी बँकांच्या ढोबळ नफ्यातून तरतूद केल्यामुळे बँकांचा नफा वळता केल्यामुळे बँकांचा निव्वळ नफा कमी किंवा बॅंका  तोट्यात असल्याचे दिसून येते.  यासाठी बँक कर्मचारी व अधिकारी जबाबदार नसून सरकारी धोरण जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले.  

बँक कर्मचारी व अधिकारी संघटना वेळोवेळी अश्या कर्जबुडव्यांची नवे जाहीर करून त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत आहे. या साठी कायद्यामध्ये  विशेष व शिक्षेची तरतूद असावी अश्या सूचना सुद्धा करण्यात आल्या.  परंतु सरकार अश्या कर्जबुडव्यांना अभय देत आहे.  आता मात्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खाजगीकरण करणार असल्याचे सूतोवाच केले असतांना मा. पंतप्रधानांनी व्यवसाय करणे सरकारचे काम नाही त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे  खाजगीकरण करण्यात असल्याचे जाहीर केले.  बँकांच्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य जनता हि बँकिंग सेवेपासून वंचित होणार असून देशातील गरीब व दुर्बल घटक यांना ऋण मिळणे कठीण होणार आहे.  तसेच सामान्य नागरिकांची मेहनतीची कमाई जी बँकांमध्ये ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे त्याची परतफेडीची हमी राहणार नाही. 

 खाजगी कारखानदार व उद्योगपतींच्या हातात बँकांचे व्यवस्थापन गेल्याने आज देशात खाजगी बँकांची काय परिस्थिती आहे हे सर्वज्ञात आहे.  अनेक खाजगी बॅंका बुडाल्या असतांना त्या सार्वजनिक बँकांमध्ये विलीन करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यात सरकारला यश मिळाले.  जर बॅंका खाजगी झाल्या तर अश्या परिस्थितीत ठेवीदारांच्या ठेवींचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटणार नाही. देशात बेरोजगारांची  भीषण परिस्थिती असतांना कामगार कपातीचे शस्त्र उपसले जाणार त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागणार. बँकांचे खाजगीकरणामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असून ती अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेतील फोर्ब्स मासिकाचे पत्रकार निक मिलानोविक यांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या एका लेखात ज्याचे शीर्षक "दि यु. एस. नीड्स बँकिंग ऍज ए पब्लिक सर्व्हिस" होते त्यामध्ये अमेरिकेमध्ये सार्वजनिक बँकांची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते.  त्यात त्यांनी त्याचे समाजाला होणारे फायदे जाहीर पने सांगितले होते.  सन २००९-१० मध्ये जागतिक मंदी असतांना भारतीय अर्थव्यवस्थेला फक्त व फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळे धक्का पोचला नाही हे तत्कालीन अर्थमंत्री मा. पी. चिदंबरम यांनी सुद्धा मान्य केले होते.   परंतु आज आपल्या देशात सुरळीत असलेल्या बँकिंग उद्योगाला खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरुंग लावण्याचे प्रयत्न  होत आहे. तेंव्हा सामान्य नागरिकांनी वेळीच भविष्यातील धोके लक्षात घेऊन सावध होणे गरजेचे असून बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या या लढ्याला पाठिंबा देऊन सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी हात बळकट करावे असे आवाहन करण्यात आले.

 यावेळी मा. जिल्हाधिकाऱ्याना सरकारने बँकांचे  खाजगीकरण करू नये या विषयी निवेदन देण्यात आले.  निषेधाच्या कार्यक्रमात बँक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सुरक्षितता बाळगून सहभागी झाले होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉ. कांतीलाल वर्मा, कॉम. उल्हास देसाई, कॉ. माणिक अडाणे, कॉ. उमाकांत कुलकर्णी, कॉ. महादेव भोसले, कॉ. सुजय नळे, कॉम. सुजित उदरभरे, कॉ. आशुतोष काळे, कॉ. नहार, कॉ. विशाल इत्यादींनी परिश्रम घेतले.  उद्या दि. १६ मार्च २०२१ रोजी दिल्ली गेट या ठिकाणी अश्याच प्रकारे शांततेत निषेध नोंदविण्यात येणार आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शहर जिल्हा काँग्रेसची  बैठक

शहरातील पक्ष विस्ताराचे ना. थोरातांकडून कौतुक, लवकरच नगर दौऱ्यावर

वेब टीम नगर : शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर कारखान्याच्या विश्रामगृह येथे पार पडली. आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी शहरातील पक्षाच्या संघटनात्मक कामांची माहिती दिली. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, निजाम जहागीरदार, अनंतराव गारदे, रियाज शेख, फारुख शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते आदी यावेळी बैठकीला उपस्थित होते. 

किरण काळे यांनी बैठकीमध्ये शहरात काँग्रेस बळकटीकरण सप्ताहात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम, नेहरू पुतळा होर्डिंग विषय, शहरात झालेले पक्ष प्रवेश, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी पक्षाने काढलेला मोर्चा आदीं बद्दल माहिती दिली. पक्ष विस्तारासाठी शहरामध्ये पुढील सहा महिन्यांसाठी हाती घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमां बद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने ना.थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 

जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने ना. बाळासाहेब थोरात यांचा दोन वेळा नगर दौरा झाला होता. मात्र लवकरच पुन्हा शहराच्या दौऱ्यावर ते येणार आहेत. यावेळी पक्षाचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले आहे. 

आढावा बैठकीत ना. थोरात यांनी काळे यांच्या कामाचे कौतुक केले. काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात काँग्रेसला उज्वल भवितव्य असल्याचे यावेळी ते म्हणाले. दौऱ्यात शहर काँग्रेससाठी ना.थोरात स्वतंत्र वेळ देणार असल्यामुळे किरण काळे यांना पक्षवाढीसाठी शहरामध्ये विशेष बळ दिले जाणार आहे.  

फारुख शेख यांनी मनपामध्ये सध्या सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींची माहिती बैठकीत ना. बाळासाहेब थोरात यांना दिली. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाध्ये आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची भूमिका घेतली असल्याचे यावेळी शेख यांनी सांगितले. सत्तेपेक्षा लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी ना. थोरात यांनी बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना केल्या. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विकास कामांची श्रृखंला अशीच कायम राहील

अविनाश घुले : प्रभाग क्र.11, राऊत मळा रस्त्याच्या कॉक्रीटीकर कामाचा शुभारंभ

    वेब टीम  नगर : प्रभागाच्या विकासासाठी आपण कायम तत्पर राहिलो आहोत.  नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यामुळे प्रभागातील अनेक कामांसाठी मोठा निधी उभारुन कामे मार्गी लागत आहेत. आता स्थायी समितीचा सभापती म्हणून नगर शहरातील विविध विकास कामे करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचबरोबर प्रभागातील प्रलंबित कामेही पुढील काळात मार्गी लागून एक आदर्श प्रभाग करण्याचा आपला मानस आहे. नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्या दूर करण्यास प्राधान्य देत असल्याने अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. पुढील काळातही विकास कामांची ही श्रृंखला अशीच कायम राहील, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.

     प्रभाग क्र.11, राऊत मळा, सिताबन लॉन शेजारीला रस्त्याच्या कॉक्रीटीकर कामाचा शुभारंभ स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा.कुरेशी, इम्रानभाई जहागिरदार, रुपसिंग कदम, श्रीमल गुंदेचा, बाबासाहेब काळे, भिमराज रासकर, रामचंद्र रासकर, नितीन भाटिया, भाऊसाहेब जाधव, मच्छिंद्र रासकर, अशोक काळे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा.कुरेशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अविनाश घुले यांची मनपा स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रभागाच्या नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सौ.प्रणिता भंडारी, मोहिनी काळे, आरती रासकर, गिता भाटिया, कामिनी रासकर, चेतन जाधव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक काळे यांनी केले तर आभार मच्छिंद्र रासकर यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नालेगाव अमरधाममधील  अस्थी रक्षेचे गंगा-गोदावरीत विसर्जन

अस्थी रक्षेची विटंबना होत असल्याने नागापूर भाजीपाला असोसिएशनचा पुढाकार

वेब टीम नगर : शहरातील नालेगाव येथील अमरधामसाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने दोन रक्षा अस्थी कलश कुंड भेट देऊन, कुंडात जमलेल्या अस्थी रक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व सभासदांनी पैठण येथील गंगा-गोदावरी येथे विसर्जित केल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड, अशोक भाकरे, घनश्याम कातोरे, बाळू गायकवाड, गणेश भोसले, आजीनाथ सकट आदी उपस्थित होते.  

शहरातील अमरधाममध्ये बेवारस, गोर-गरीब व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या रक्षा अमरधाम येथील कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन विटंबना होत होती. या अस्थी रक्षा अमरधाममध्ये लावण्यात आलेल्या अस्थी कलश कुंडात संकलीत करण्याचे काम नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. तर जमा झालेल्या अस्थी रक्षा गंगा-गोदावरी येथे विसर्जित करण्याची निशुल्क सेवा देण्याची जबाबदारी देखील संस्थेने घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर जमा झालेल्या अस्थी रक्षेचे विसर्जन करण्यात आले आहे.

अंतोन गायकवाड म्हणाले की, माणुसकीच्या भावनेने निस्वार्थपणे नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने या उपक्रमास पुढाकार घेतला आहे. नालेगाव येथील अमरधाममध्ये अंत्यविधी पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात अस्थी रक्षा कचरा व गटारीच्या ठिकाणी पडून विटंबना होत होती. यासाठी अमरधाममध्ये अस्थी रक्षा कळस बसवून, ही विटंबना थांबावी या हेतूने हे उपक्रम सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमास नगरसेवक सुभाष लोंढे, उमेश (गणेश) कवडे, सोनाली चितळे, सुवर्णा गेनाप्पा यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सविता कोटा यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

वेब टीम नगर : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका सविता प्रकाश कोटा यांची निवड झाल्याबद्दल पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण सिद्दम यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक शरद क्यादर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक रामदिन, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, पर्यवेक्षीका एस.डी. रच्चा, प्रकाश कोटा, सेवक सुहास बोडखे आदी उपस्थित होते.

प्रा.बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या सहकारी संचालिका सविता कोटा यांची भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांची कार्य करण्याची उत्तम शैली व महिला संघटन कार्याने पक्षाला याचा निश्‍चितच फायदा होणार आहे. त्यांचे राजकारणात कार्य करताना सर्वसामान्यांची सेवा घडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शरद क्यादर यांनी कोटा यांना राजकारणाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निवारा व रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी झावळी उद्योग ग्रामचे प्रस्ताव पूजन

महामार्गालगत असलेल्या खडकाळ पड जमिनीवर उद्योगधंद्यांच्या  विकासासाठी लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्विकारण्याची मागणी

वेब टीम नगर : महामार्गालगत असलेल्या खडकाळ पड जमिनीचा वापर करुन घरकुल वंचितांचा निवारा व बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झावळी उद्योग ग्रामचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर हा प्रस्ताव कार्यान्वीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, अंबिका जाधव, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, गिता डहाळे, दिनेश वाजे, किशोर शेरकर, सखुबाई बोरगे, फरिदा शेख, पोपट भोसले, सोमनाथ अडागळे, रवी साळवे आदिंसह महिला सहभागी झाल्या होत्या.

उपस्थित शाहिरांनी पारंपारिक वाद्य वाजवून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन उपस्थितांनी झावळी उद्योग ग्रामचा प्रस्ताव ठेवला. कल्याण-अहमदनगर, पुणे-नाशिक, पुणे-अहमदनगर-औरंगाबाद, अहमदनगर-शिर्डी या सर्व महामार्गाच्या दुतर्फा माळरानाच्या पड जमिनीवर झावळी उद्योग ग्राम उभे करून आत्मनिर्भर रोजगार आणि निवाराचा प्रश्‍न सोडविण्याची घोषणा देण्यात आली. तर झावळी उद्योग ग्राम निर्मितीसाठी प्रत्येक उद्योजकाला सौर उद्योग तळ्याची निर्मिती करण्यासाठी संघटनेने आग्रह धरला.

इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये स्वयंरोजगार आणि निवार्‍याचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. शिक्षणाचा प्रचार प्रसाराबरोबर देशात बेरोजगारी देखील वाढत आहे. गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकीमध्ये मतांची झोळी भरण्यासाठी देण्यात आला. परंतु प्रत्यक्षात या देशात गरिबी हटवणे ऐवजी प्रत्येक शहरात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेचा स्विकार करुन निवारा आणि स्वयंरोजगारासाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

नारळाच्या प्रत्येक फांदीला झावळी म्हटले जाते. नारळाचा अन्नरस झावळीच्या माध्यमातून एकत्रित केला जातो. त्याच प्रकारे महामार्गालगत असलेल्या खडकाळ पड जमिनीवर प्रत्येक बाजूला 5 कि.मी. पर्यंत दुतर्फा औद्योगिक रस्त्यांची निर्मिती झाली पाहिजे. अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उद्योग ग्रामची निर्मिती होऊ शकणार आहे. प्रत्येक लघु उद्योजकाला राहण्यासाठी एक गुंठा तर कारखान्यासाठी पाच गुंठे भूखंड स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा हा प्रस्ताव आहे. प्रत्येक उद्योजकाला एक गुंठा जमिनीमध्ये सौर उद्योग तळ्याची निर्मिती करता येऊ शकणार आहे. प्लास्टिकचा कागद वापर करुन शेततळे प्रमाणे पावसाळ्यात पाणी भरून ठेवायचे त्यावर दहा फूट उंचीवर सोलर ऊर्जेचा छोटा प्रकल्प राबवायचा. त्याशिवाय तळ्यात फ्लोटिंग स्विमिंग टँक उभे करता येणार आहे. तसेच त्यामध्ये मत्स्यपालन करून उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण करुन उत्पादन खर्चात बचतीद्वारे इतरांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्याची तरतुद झावळी उद्योग ग्रामच्या प्रस्तावात आहे.

अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी आज निवारा व स्वयंरोजगाराचे प्रश्‍न सोडविण्यास केंद्र सरकार व राज्य सरकार उदासीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांवर भूमिगत पाण्याच्या तळ्याची निर्मिती केली होती. त्याच प्रकारे उद्योजकांना उद्योग तळ्यांच्या माध्यमातून मदत केल्यास प्रत्येक उद्योगांमध्ये किमान शंभर ते दोनशे लघुउद्योजकांना कारखाने उभे करुन घरकुल वंचितांसाठी निवारा व बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविता येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन इयत्ता १ ली ते ९ वी ची मूल्यमापन योजना घोषित करा 

बाबासाहेब बोडखे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

वेब टीम नगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मागील शैक्षणिक वर्षाची परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक वर्ष २०२०-२१  साठी इयत्ता १ ली ते ९ वी ची मूल्यमापन योजना घोषित करून सत्र समाप्ती करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यात जवळजवळ सर्वत्रच थोड्या प्रमाणातच प्रत्यक्ष अध्यापन झालेले आहे. मुंबई परिसरात विद्यार्थ्यांसाठी तर अजिबातच प्रत्यक्ष अध्यापन झालेले नाही . ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. शासन आदेशाप्रमाणे आठवड्यातून मोजक्याच तासिका अध्यापन झालेले आहे.दरवर्षी १० मार्च पर्यंत सर्व इयत्तांचा पाठ्यक्रम पूर्ण होऊन मुल्यमापन सुरू होते. त्यामुळे २०२०-२१हे शैक्षणिक वर्ष संपलेले असून, इयत्ता १ली ते ९ वी पर्यंतची मूल्यमापन पद्धती, परीक्षांचे नियोजन, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांचे स्वरुप कसे असावे? याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस निर्णय निर्गमीत करण्यात आलेले नाहीत. कोरोनाची परिस्थिती पाहता दरवर्षीपेक्षा यावर्षी मुल्यमापन पद्धतीत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना यात नक्की बदल अपेक्षित आहेत.

शैक्षणिक वर्षसमाप्ती होत आले तरी मुल्यमापन योजना कशी असावी? याबबत शासनाकडून कोणतेच आदेश निर्गमित  करण्यात आलेले नाहीत. शासनाने याबाबतचा निर्णय घेऊन सन २०२०-२१ हे शालेय वर्ष इयत्ता १ ते ९ वीसाठी समाप्त घोषीत करुन यापुढील शाळा जून २०२१ पासून सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाला आदेश निर्गमित करण्याबाबत सूचित करावे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशा स्वरुपाची मागणी पुढे येत आहे. मे २०२१महिन्यात शाळा सुरु असणार, अशा बातम्या प्रसारीत होत आहेत ते अजिबात ही योग्य ठरणार नाही. कडक उन्हाळ्यात उष्माघातामुळे मार्च, एप्रिलमध्ये तर शाळांची वेळ आणि सत्र बदलली जातात. काही ठिकाणी उष्माघातामुळे जुलै महिन्यात नविन शैक्षणिक सत्र सुरु होते. हा पूर्वानुभव आहे. मागील वर्षी एप्रिल, मे  २०२० या महिन्यात ही मोघम निर्णय घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू केले पण अभ्यासक्रम १०मार्च २०२० पर्यंत संपलेला होता.त्यामुळे मे २०२१ महिन्यात वर्ग न भरवता जून पासून शाळा सुरू करणे योग्य राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इयत्ता १० वीच्या परीक्षांबाबत शिक्षक परिषदेने निवेदनाद्वारे अभ्यासक्रम कमी करणे व मुल्यमापन बदल सुचवला होता. त्यानुसार शाळांनाच परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे म्हणजे होम सेंटर ठेवावे. मात्र याबाबत शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वजण चिंताग्रस्त असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगार शहर व नागरदेवळे भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने प्राजक्त तनपुरे यांना निवेदन                                                

वेब टीम नगर : भिंगार शहर व नागरदेवळे भागातील पाणी पुरवठा नियमित सुरळीत करण्याचे निवेदन नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देताना वंचित बहुजन आघाडी चे भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार समवेत अच्युत गाडे, विलास साळवे, भुषण कांबळे, अक्षय पाथरिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.                                                                               

 सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून भिंगार व नागरदेवळे भागात अनियमित पाणीपुरवठा चालू आहे भिंगार शहरांमध्ये बारा दिवसांनी पाणी सुटते तर नागरदेवळे भागात पाणी आठ दिवसांनी सुटते पाणी हा माणसाचा ज्वलंत प्रश्न आहे आठ दिवसांनी व बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असला तरी पाणीपट्टी मध्ये कोणत्याही प्रकारची सवलत भिंगार कॅन्टोन्मेंट व नागरदेवळे ग्रामपंचायत देत नाही तसेच या बाबत ग्रामपंचायत व ग्राम विकास अधिकारी यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे तर प्राजक्त तनपुरे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित नागरदेवळे च्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क साधून पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments