नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

नगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. 

वंचित बहुजन आघाडीची मागणी.

वेब टीम नगर : नगर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच या पुतळ्यासाठी जागा निश्चित करावी, नगर शहरातील प्रस्थावित उड्डाणपुलास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नुतनीकरण करावे या मागण्याचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण तर्फे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. 

जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, सल्लागार प्रा. जीवन पारधे, संघटक फिरोज पठाण, विवेक विधाते, जग्गु गायकवाड, राहुल कांबळे, राविभाऊ भिंगारदिवे, अमर निरभवणे, ऋषिकेश जाधव, आकाश जाधव, अतुल पाखरे आदी यावेळी उपस्थित होते. 

यापूर्वी अनेक वेळा याबाबत निवेदने देण्यात आली आहेत परंतु याबाबत शासन कुठलीही ठोस भूमिका किंवा निर्णय घेत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव फक्त राजकारणापूरतेच वापरले जाते. व समाजाची दिशाभूल केली जाते. यापूर्वी सक्कर चौक येथील जागा पूर्णाकृती पुतळ्यासाठी नियोजित होती. सदर जागा ही महानगर पालिकेची असून याबाबत प्रशासन उडवाउडवी चे उत्तरे देत आहे. तरी याकरिता सर्वपक्षीय समितीची स्थापना करून हा विषय मार्गी लावावा. यासाठी शासनाकडे पुरेसा निधी नसेल तर शासनाने तसे जाहीर करावे. 

नगर पुणे महामार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. तसेच टिळक रोड वरील महानगर पालिकेच्या मालकीचे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे व ते सामाजिक कार्यासाठी खुले करण्यात यावे. तिथे सुसज्ज असे वाचनालयाची उभारणी करावी जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी वाचनाची आवड निर्माण होऊन नवीन पिढी सुसंस्कारित होईल व त्यातून सामाजिक प्रगती होईल. 

सदर मागण्यांबाबत जोपर्यंत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी महामानवास अभिवादन करण्यासाठी येऊ नये अन्यथा अशा व्यक्तींना मज्जाव करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागरदेवळे येथे दि.१० रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

    वेब टीम  नगर : रोजी फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने गुरुवार दि.१०रोजी  मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळ येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.

     सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. रुग्णांची राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे.

     तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठीजालिंदर बोरुडे मो.नं. ९८८१८१०३३३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे : ॲड. सुभाष काकडे

वेब टीम नगर : करोनाचे आलेल्या संकटामुळे सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा वाढत आहे. फार भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे यावे. जिल्हा न्यायालय, मोहटा देवी देवस्थान, मढी देवस्थान व शिर्डी संस्थान मार्फत मी स्वतः पुढाकार घेवून जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहे. सेन्ट्रल बार असोशिएशन एका थॅलेसिमियाच्या रुग्णास दत्तक घेवून जनकल्याण रक्तपेढीच्या सेवा यज्ञात सेवेची आहुती टाकणार आहे,  असे प्रतिपादन सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे यांनी केले.

            राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण रक्तपेढीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगर मध्ये सामाजिक क्षेत्रात देणाऱ्या रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने रक्तपेढीस साहित्य हायजीन करण्यासाठी अत्याधुनिक ओव्हन मशीन भेट देण्यात आले. सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी ओव्हन मशीन जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर यांच्या कडे सुपूर्द केली. यावेळी जनकल्याण समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, रक्तपेढीचे कार्यवाह डॉ. उत्तम शिंदे, माजी कार्यवाह डॉ. दिलीप धनेश्वर, उपाध्यक्ष डॉ.पंकज शहा, खजिनदार अनिल धोकारीया, सहकार्यवाह प्रमोद सोनटक्के, डॉ. रुपाली म्हसे, रा.स्व. संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, पद्मजा कुलकर्णी, वैशाली कोलते आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, समाजाची गरज ओळखून जे काम केले जाते ते सेवा कार्य असते. यासाठीच जनकल्याण समिती संपूर्ण राज्यात सुमारे १४०० सेवा कार्य व विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. याच धर्तीवर जनकल्याण रक्तपेढी काम करत असून शुद्ध व चांगले रक्त रुग्णां पर्यत पोचवत आहे. या समाज हिताच्या कार्याला सर्वांनी पाठींबा द्यावा.

            गीता गिल्डा म्हणाल्या, रोटरी क्लब मिडटाऊनच्या महिला सदस्यांसह काही महिन्यापूर्वी जनकल्याण रक्तपेढीची पहाणी केली होती. इथले सामाजिक कार्य पाहून आम्ही प्रभावित झालो. म्हणूनच या कार्यात छोटासा खारीचा वाटा उचलावा यासाठी अत्याधुनिक ओव्हन मशीन रोटरी मिडटाऊनने दिले आहे.

            राजेश झंवर म्हणाले, नगर जिल्ह्याची गरज ओळखून १९९८ साली ही रक्तपेढी सुरु केली. गेले २२ वर्ष हे सेवा कार्य सर जाती धर्माला बरोबर घेत अविरत व अखंडितपणे चालू आहे. करोना मुळे रक्तदान शिबिर थांबले आहेत.  त्यामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी सातत्याने समाज जागृती व उपक्रम राबवत आहे. नागरिकांनी प्राधान्याने रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

            कार्यक्रमच्या प्रास्ताविकात कार्यवाह डॉ. उत्तम शिंदे यांनी जनकल्याण रक्तपेढीच्या इतिहासाची, कार्याची व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संचालक प्रा. भानुदास जगताप यांनी स्वागत केले. सोनली खांडरे यांनी सूत्रसंचलन केले. प्रमोद सोनटक्के यांनी आभार मानले. यावेळी रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये, डॉ. विलास मढीकर, प्रकाश स्मार्ट, सुशांत पारनेरकर आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबविण्याची मागणी

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचितांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली. घरकुल वंचितांचा प्रश्‍न आस्थेने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ग्रेट लॉरिस्टर फॉर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंगचा सन्मानाची मानवंदना यावेळी देण्यात आली.  याप्रसंगी अ‍ॅड. कारभारी गवळी, बाळासाहेब सुंबे, प्रकाश भंडारे, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, पोपट भोसले, योगेश वाघमारे, विठ्ठल सुरम, कुमार पवार, अंबिका जाधव, विमल सांगळे, रोहिणी पवार, हिराबाई शेकटकर, लतिका पाडळे, फरिदा शेख, अनिता वडागळे, मिरा साळवे आदिंसह घरकुल वंचित उपस्थित होते.

महसुल गांव निंबळक (ता. नगर) सर्व्हे नं. ५४ येथील दहा एकर जमीनीवर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबवून२३० घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देऊन संघटनेचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पा संदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना संघटनेचे शिष्टमंडळ व जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे सुचना केल्या आहेत. घरकुल वंचितांचा प्रश्‍न मोठ्या आस्थेने सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे जिल्हाधिकारी भोसले यांना घरकुल वंचितांच्या वतीने ग्रेट लॉरिस्टर फॉर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंगचा सन्मानाची मानवंदना देण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.  

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा हा सर्व शक्तीमान असून, समाजामध्ये क्रांतीकारक बदल घडवून आनण्याची शक्ती कायद्यात असल्याचे घटनेतून दाखवून दिले. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर वंचितांची प्रश्‍न सुटण्यास तयार नाही. सरकारी अधिकारी आस्थेने कामे करु लागल्यास वंचितांची प्रश्‍ने सुटणार आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक निर्णय घेऊन घरकुल वंचितांच्या जीवनात आशेची किरण निर्माण केली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. घरकुल वंचित आर्थिकदृष्ट्या दुबळे आहेत. त्यांच्या सधन नातेवाईकांनी त्याचे घर होण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. बाळासाहेब सुंबे यांनी घरकुल वंचित भगिनीला ८० हजार रुपयाची मदत दिल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. आंबेडकर यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाची नांदी ठरली

भगवान फुलसौंदर : जिल्हा माळी सेवा संघ संचलित सर्वधर्मीय वधुवर सूचक केंद्र कार्यालयाचे उद्घाटन

वेब टीम नगर : समता, न्याय, हक्क, अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाची नांदी ठरली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांच्या आयुष्याला नवा प्रकाश देण्याचे कार्य केले. समता, बंधुता, न्याय सर्वांना मिळावा म्हणून आयुष्यभर संघर्ष केल्यामुळेच आज परिवर्तन दिसून येत असल्याची भावना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली), जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, आधारवड बहुद्देशीय संस्था, द युनिव्हर्सल फाऊंडेशन, रायझिंग युथ अ‍ॅण्ड ट्रायबल फाऊंडेशन, उडान फाऊंडेशन, स्वप्नपुर्ती फाऊंडेशन, माहेर फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बालिकाश्रम रोड, लेंडकर मळा येथील अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ संचलित सर्वधर्मीय वधुवर सूचक केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी महापौर फुलसौंदर बोलत होते.

 यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, संतोष ग्यानप्पा, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर, संत सावतामाळी युवक संघाचे अशोकराव तुपे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, गणेश बनकर, जालिंदर बोरुडे, संतोष हजारे, जिल्हा माळी संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, उपाध्यक्ष मेजर नारायणराव चिपाडे, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, डॉ. सुदर्शन गोरे, सचिव सूर्यकांत रासकर आदि उपस्थित होते.

शाहीर दिलीप शिंदे, शाहीर वसंत डंबाळे यांनी आपल्या पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य विशद केले. प्रा. माणिक विधाते यांनी विवाह जमवण्यासाठी वरपिता व वधुपिता यांची आज चांगलीच दमछाक होते. दिव्यांग, विधवा, विधुर यांच्या विवाहासाठी सुद्धा अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी वधुवर सुचक केंद्र मोलाची भूमिका बजावीत आहे. सर्वधर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरू केल्याने सर्वच समाजाचा कौटुंबिक प्रश्‍न सोडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाचे कार्य खरोखर अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अ‍ॅड. भानुदास होले यांनी गेल्या वीस वर्षापासून अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ अविरतपणे कार्यरत आहे. समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भूमिका त्यांनी मांडली. पाहुण्यांचे स्वागत मेजर नारायण चिपाडे व सूर्यकांत रासकर यांनी केले. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान दिले. या सामाजिक उपक्रमासाठी अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, अ‍ॅड. अमोल जाधव, डॉ. गौरी सामलेटी, पोपट बनकर, आरती शिंदे, संग्राम साळवे, आशिष रणनवरे, किरण सातपुते, विद्या तन्वर, विनायक नेवसे, रजनी ताठे, सागर आलचेट्टी, रमेश चिपाडे, नंदकुमार वनवे, अशोक रासकर, मारुतराव गाडेकर, राजेश शिंदे, संतोष हजारे, राहुल धीवर, अक्षय वारे, चेतन सायनर, अंकुश पानमळकर, नंदा पुंड, अ‍ॅड. संगीता पाडळे, अशोक कासार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले. आभार अ‍ॅड. अनिता दिघे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गौतमनगर मित्र मंडळातर्फे  महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याने वेधले भिंगारकरांचे लक्ष

वेब टीम नगर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार येथील गौतमनगर मित्र मंडळा तर्फे त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. भीम वंदना घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आरपीआय (आठवले) आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, मयूर सोनावणे (मेंबर), आरपीआयचे भिंगार युवक शहराध्यक्ष अमित काळे, धम्ममित्र दिपक अमृत, सचिन धिवर, नागरदेवळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच युवराज पाखरे, बंटी धीवर, सूरज गायकवाड, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार, सिद्धार्थ उबाळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष सारसर, प्रविण वाघमारे, सुनिल साळवे, विलास साळवे, लखन आढाव, नगर तालुका संघटक महादेव भिंगारदिवे, सागर पाडांगळे, जगदीश साळवे, आकाश आरू आदिंसह युवक उपस्थित होते.

मंगेश मोकळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून समता, स्वातंत्र्यता व बंधुत्वाची मुल्ये समाजात रुजवली. गावकुसा बाहेरच्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा तर मनुष्याला मनुष्य म्हणून राहण्याचा अधिकार घटनेने दिला. दीन दलितांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. या महामानवाच्या विद्वत्तेने घटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही अवतरली असल्याचे त्यांनी सांगितले. गौतमनगर मित्र मंडळा तर्फे चौकात अभिवादनासाठी ठेवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले. अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम नगर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परिस्थिती बिकट बनत असताना दिव्यांगांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज -दत्तात्रय काटे


वेब टीम नगर : सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील हॉटेल सिंग रेसीडेन्सी येथे दिव्यांगांचा हा गौरव सोहळा पार पडला.  

जागतीक दिव्यांग दिन सप्ताह निमीत्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ दत्तात्रय काटे उपस्थित होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. हेलन केलर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेवगाव पंचायत समीती सभापती क्षितीज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनिल वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन आदिंसह विविध जिल्ह्यातून आलेले पुरस्कार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

दत्तात्रय काटे म्हणाले की, अनेक दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करुन विविध क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. निसर्गाने काही कमी दिले असले, तरी काही अधिक देखील दिलेले असते. आपल्यातील विशेष गुण ओळखण्याची गरज आहे. आज परिस्थिती बिकट बनत असताना, शासनाने देखील दिव्यांगांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना विना अडथळा मिळाला पाहिजे, असे सांगितले. तर गरजू घटकातील दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिव्यांग आश्रमची गरज स्पष्ट करुन, सावली दिव्यांग संस्थेने दिव्यांगांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव झाला. संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात मनोहर मराठे यांनी दिव्यांगांना प्रेरणा मिळण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलाचा खून करणार्‍या आरोपीला अटक करण्याची आईची आर्तहाक

अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा

वेब टीम नगर :  पंधरा दिवसापुर्वी नगर तालुक्यात ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असता सदर प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंगने सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले.  यावेळी आशाबाई कासार, विष्णू कासार, अंजली कासार आदि उपस्थित होते. नगर तालुका येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय २१) याला पंधरा दिवसांपूर्वी विश्‍वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी आरोपी असलेला विश्‍वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये नुकताच भा.द.वि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापि आरोपी फरार असून, पोलीसांनी त्याला अटक केलेली नाही. आरोपीच्यी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याने त्याला तातडीने अटक करण्याची मागणी मयत युवकाच्या आईसह त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. कुटुंबीयांच्या जिवीतास काही झाल्यास याची जबाबदारी आरोपी विश्‍वजीत कासार यांची राहणार आहे. आरोपीला अटक न करणार्‍या नगर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍याकडून सदर प्रकरणाचा तपास काढून इतर कोणत्याही पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍याकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा भालसिंग परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments