जारकीहोळीच्या "सेक्स फॉर जॉब " व्हिडीओ प्रकरणाला नवे वळण

 जारकीहोळीच्या "सेक्स फॉर जॉब " व्हिडीओ प्रकरणाला नवे वळण 

वेब टीम बेळगाव : "सेक्स फॉर जॉब " अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला आहे.  युवतीला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी केला होता. शिवाय रमेश जारकीहोळी यांचे काही अश्लील व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. आता  नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या  प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 

सीडी प्रकरणातील तरुणीने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात सीडी प्रकरणाचा व्हिडिओ कोणी केलाय, कसा केलाय याची मला काही कल्पना नाही. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची अब्रू गेली.  माझ्या आई-वडिलांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मी देखील तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे या व्हिडीओतून तरुणीने सांगितले आहे. 

आमच्या पाठीशी कोणीही नाही. आम्हाला कोणाचाही राजकीय पाठिंबा नाही. रमेश जारकीहोळी यांनी नोकरी देतो म्हणून सांगितले आणि नंतर काही केलं नाही. नंतर व्हिडिओ देखील त्यांनीच बाहेर आणला आहे. मला संरक्षण द्या अशी मागणी सीडी प्रकरणातील तरुणीने कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे केली आहे. तरुणीने हा व्हिडिओ प्रसारित केल्यावर सगळ्या वाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी देखील बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना त्या तरुणीला सुरक्षा देण्यासाठी एसआयटीला सांगितल्याची माहिती दिली. दरम्यान तरुणीच्या व्हिडिओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून अध्यक्षा प्रमिला नायक यांनी त्या तरुणीने घाबरु नये, आत्महत्या हा उपाय नसल्याचे म्हटले आहे. 

रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली होती. 



Post a Comment

0 Comments