बाटला हाऊस चकमकीशी संबंधित आरिज खानला फाशी

बाटला हाऊस चकमकीशी संबंधित आरिज खानला फाशी 

वेब टीम नवी दिल्ली  : दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या हत्येसाठी आणि२००८ च्या बाटला हाऊस चकमकीशी संबंधित अन्य खटल्यांत आरिज खानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. साकेत कोर्टाने याला अतीदुर्मिळ प्रकरण मानले आहे.

'इंडियन मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या खान याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. पोलिसांनी सांगितले की हे केवळ खुनाचे प्रकरण नाही तर न्यायाचे रक्षण करणार्‍या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकाऱ्याच्या खुनाची घटना आहे. आरिज खानच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेस विरोध केला. यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा निर्णय राखून ठेवला होता.

२००८ मध्ये बाटला हाऊस चकमकी दरम्यान शर्माच्या हत्येप्रकरणी आणि इतर गुन्ह्यांसाठी ८ मार्च रोजी कोर्टाने शर्माला दोषी ठरवले होते. त्यात कोर्टाने  म्हटले होते की आरिज खान आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार करून त्याला ठार मारले हे सिद्ध झाले आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर शर्मा हे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात २००८ मध्ये बाटला हाऊस चकमकी दरम्यान मारले गेले. या प्रकरणासंदर्भात जुलै २०१३ मध्ये कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी शहजाद अहमद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या निर्णयाच्या विरोधात अहमद याची अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरिज खान घटनास्थळावरून पळून गेला होता आणि त्याला फरार घोषित करण्यात आले होते. खानला १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली, तेव्हापासून खटला चालू आहे.

Post a Comment

0 Comments