नगरटुडे बुलेटिन 12-03-2021

नगरटुडे बुलेटिन 12-03-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनामप्रेम संस्थेतील मुलांना मिष्ठान्न भोजन

वंचित घटकांसाठी काम करण्याची आवश्यकता-सुरेखा कदम

   वेब टीम नगर : स्व.अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांचे हे कार्य आता आपण पुढे सुरु ठेवणे आवश्यक आहे. यासाठीच त्यांच्या जयंती निमित्त  सामाजिक उपक्रमातून राबविण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी काम करुन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम आपणास करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम

     माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यावतीने अनामप्रेम संस्थेस मिष्ठान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर सुरेखा कदम, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, दत्ता कावरे, अशोक दहिफळे, शिवाजी कदम, आशा निंबाळकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, स्व.अनिल राठोड हे शिवसैनिक व सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान होते. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची तळमळ सर्वश्रुत आहेत. त्यांनी नेहमीच तळगळातील लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतला, त्यांचे हे कार्य कोणीही विसरु शकत नाही. त्यांनी कायम शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम केले. जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देऊन त्यांच्या स्मृती कायम ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्त केला आहे.

     याप्रसंगी विक्रम राठोड, संजय शेंडगे आदिंनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आशा निंबाळकर यांनी आभार मानले.  रमेश परतानी, पप्पू भाले, अप्पू बेद्रे, संतोष तनपुरे, सोनू सैंदाणे, सुमित धेंड, अजित कुलकर्णी आदि.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवी हक्क, अधिकार व कर्तव्य याबाबत प्रत्येकाने जागरूक रहावे

अ‍ॅड. भानुदास होले : राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. महेश शिंदे यांची फेरनिवड

वेब टीम नगर : मानवी हक्क, अधिकार व कर्तव्य याबाबत प्रत्येकाने जागरूक रहावे. आपल्या कर्तव्य व अधिकाराचा विसर पडल्यास मानवी अधिकाराची पायमल्ली होते. नागरिकांच्या न्याय, हक्कासाठी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. महेश शिंदे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा जुन्या न्यायालयाजवळ त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. होले बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. अमोल जाधव, अ‍ॅड. पोपट चव्हाण, अ‍ॅॅड.गौरी सामलेटी, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, संतोष कांडेकर, पोपटराव बनकर, अ‍ॅड. छाया निमसे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप लोंढे यांनी व अ‍ॅड. प्रशांत साळुंके यांनी शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीच्या फेरनिवडीचे पत्र दिले. सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, सलग तिसर्‍या वर्षी संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन मोठा विश्‍वास दाखविला आहे. या विश्‍वासाला तडा जाऊ न देता मानवधिकाराच्या रक्षणासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा कार्यकारणी जाहीर करुन प्रत्येक तालुक्याची कार्यकारणी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल शिंदे यांचे शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे, अ‍ॅड. बाबासाहेब रणसिंग, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. दिलीप शिंदे, अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड. सुनील तोडकर यांनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन प्रकाशमान केले 

निकिता वाघचौरे : परिस फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

वेब टीम नगर : सावेडी येथील परिस फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी परिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, उपाध्यक्षा रंजना वाघचौरे, संदीप वाघचौरे, कैलास उशीर, आश्‍विनी उशीर, योगेश खोडके, अनिता वाघचौरे, प्रियंका अकोलकर, वर्षा काळे, मयुरी कार्ले, जयेश कवडे, युवराज कराळे, अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड.भानुदास होले, पोपट बनकर, डॉ. अमोल बागुल आदी उपस्थित होते.

निकिता वाघचौरे म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन प्रकाशमान केले. स्त्री शिक्षणाची बीजे त्यांनी रोवल्याने महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर दिसत आहे. समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाईंनी सर्वस्वी पणाला लावले. त्यांच्या प्रेरणादायी विचाराने समाज सावरला असल्याचे त्यांनी सांगितले. महेश शिंदे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री शिक्षण चळवळीचा वटवृक्ष बहरला असून, महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांच्या महान कार्य व योगदानाने आजच्या स्त्रीला प्रतिष्ठा व सन्मान मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मोर्चा 

वेब टीम नगर : रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. 

यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे उत्कर्ष झावरे, जाहिद शेख, सुजित जगताप, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, स्वप्नील पाठक, उद्धव माने आदींसह काँग्रेस पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

बालिकाश्रम रोड येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मोर्चामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा निलक्रांती चौका मध्ये आला त्यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली. 

मात्र पोलिस प्रशासनाच्या आवाहनानंतर सामंजस्य दाखवत निलक्रांती चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना तीव्र भावना व्यक्त केल्या. एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची वाट मोकळी करून द्यावी असा एकसुरी आवाज आंदोलक विद्यार्थ्यांचा होता. 

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की,  महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेस सहभागी असली तरी देखील एमपीएससीने घेतलेला निर्णय हा निश्चितच अत्यंत चुकीचा आणि विद्यार्थ्यांना देशोधडीला लावणारा आहे. विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा एमपीएससीने कदापि पाहू नये. आपल्या निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरामध्ये करण्यात येईल, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विडी कामगार युनियन आयटकच्या आंदोलनाची दखल

विडी कामगारांना मजुरी मिळाल्याने वादावर पडदा ; समाधानाचे वातावरण

वेब टीम नगर : विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने लालबावटा विडी कामगार युनियन आयटकच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले असून, बागडपट्टी येथील विडी कंपनीने विडी कामगारांना बुधवार (दि.१० मार्च) पासून मजुरी देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर व उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली यांनी दिली.

शहरातील बागडपट्टीत एका विडी कंपनीचे मुख्य कार्यालय असून, शहरात इतर ठिकाणी देखील त्यांच्या शाखा आहेत. सदर विडी कंपनीने विडी कामगारांची मजुरी थकविल्याने त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला होता. विडी कामगार महिलांना उसनवारी करून कुटुंब चालवावे लागत होते. संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत सदर कंपनीच्या व्यपस्थापकाने दुपारनंतर विडी कामगारांना मजुरी देण्यास सुरुवात केली. मजुरी मिळू लागल्याने विडी कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नगर शहरात इतर चार ते पाच विडी कारखाने असून, त्यांच्याकडून वेळेवर मजुरी दिली जाते. मात्र बागडपट्टीतील विडी कारखान्याने मजुरी थकविल्याने विडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. मजुरी किमान वेतन कायदा १९६३ नुसार वेतन वेळेवर देणे ही मालकाची जबाबदारी आहे. सध्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विडी कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. विडी संघटना व कारखानदारमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसून, विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. सर्व विडी कामगारांना दर महिन्याला १ ते ५तारखे दरम्यान मजुरीचे वाटप होणे आवश्यक असल्याची भावना अ‍ॅड.सुधीर टोकेकर यांनी व्यक्त केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत वासनजीत वॉरियर्स संघ विजयी

नगर क्लबच्या मैदानावर तीन दिवस-रात्र रंगला होता क्रिकेटचा थरार

वेब टीम नगर :  पंजाबी युथ ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धा नगर क्लबच्या मैदानावर उत्साहात पार पडली. अंतिम सामना वासनजीत वॉरियर्स विरुध्द खालसा वॉरियर्स संघात झाला. अत्यंत अटातटीच्या झालेल्या सामन्यात वासनजीत वॉरियर्स संघाने दणदणीत विजय मिळवला.

 विजयी संघास कमल कोहली, राजू धुप्पड, विजय बक्षी, राकेश गुप्ता, जनक आहुजा, काकासेठ नय्यर, इंदरजीत नय्यर, प्रदीप पंजाबी, अहमदनगर क्लबचे सचिव राजाभाऊ अमरापूरकर, दामुसेठ बठेजा, आगेश धुप्पड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. विजेत्या संघाचे कर्णधार अंकित दुग्गल यांनी खेळाडूंसह चषक स्विकारले. यावेळी स्पर्धेचे आयोजक सागर बक्षी, मोहित पंजाबी, हरजितसिंह वधवा, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, मनयोग माखिजा, प्रेटी ओबेरॉय, बलजीत बिलरा, सावन छाब्रा, अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर, हर्ष बत्रा, नुपिंदरसिंह धुप्पड, चेतन आहुजा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सागर बक्षी यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रमुख प्रायोजक राजकमल ज्वेलर्स, सह प्रायोजक युनिक डिटेलिंग मल्टी कार सर्व्हिस, साई सुर्य ट्रेडर्स यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार हितेश ओबेरॉय यांनी मानले. विजेता संघ वासनजीत वॉरियर्सचे मालक अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर तर उपविजेता संघाचे मालक जस्मितसिंह वधवा, डॉ.अभिषेकी वाही, सनी वधवा हे देखील यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय पंजाबी, राजा सबलोक, देवेंद्रसिंह माखीजा, बिट्टू मनोचा, रितेश नय्यर, पुनित भूटानी, नकुल जग्गी, यश धुप्पड, पुनीत बत्रा, पुरव ओबेरॉय, ऋतिक जग्गी, कुणाल चोपडा, सुरेश वधवा, रोहित सरणा, राजवीर सिंह शाही, तेजस जग्गी, नितेश जग्गी, जी.एन.डी. ग्रुपने परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघा येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शुभांगी धामणे व मंदा साळवे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, कला शिक्षक उत्तम कांडेकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज आहे. स्त्री शिक्षणाने आज समाजात क्रांती झाली आहे. स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तुत्ववानस्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापक किसन वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलींना शिक्षण देऊन सावित्रीबाईंचा वारसा पुढे सुरु ठेवावा

प्राचार्य सुनिल पंडित : प्रगत विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

    वेब टीम  नगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींना शिक्षण बंदी होती, अशा परिस्थितीत स्वत: शिक्षण घेऊन मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे मुली शिक्षित होऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने आपले नाव चमकवित आहेत. महात्मा ज्योतिबा फुले व सवित्रीबाई फुले यांनी वंचितांना शिक्षण देण्याचा जो वसा उचचला आहे, तोच वसा मुलींना शिक्षण देऊन आपण पुढे सुरु ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य सुनिल पंडित यांनी केेले.

     प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य सुनिल पंडित, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, सुनिल कुलकर्णी आदि उपस्थित होते. याप्रसंगी महिला दिनानिमित्त प्राचार्य सुनिल पंडित यांच्या हस्ते महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

     याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा काढून शिक्षणाची ज्ञानगंगा गोर-गरीबांपर्यंत पोहचवली. त्यांचे हे कार्याने ज्ञानोदयाचा सूर्य प्रकाशमान झाला. मुलींना शिक्षण मिळाल्याने त्या सक्षम झाल्या. त्यांचे कार्य अतुलनिय असेच आहे, असे सांगून नगरशी सावित्रीबाईंचे असलेले जिव्हाळ्याचे नाते याविषयी माहिती दिली.

     प्रास्तविक आशा मगर यांनी केले तर आभार विजय गरड यांनी मानले. कार्यक्रमास सुषमा नगरकर, सुनिल गाडगे, दिलीप रोकडे, अनिता सरोदे, हर्षाली देशमुख, कल्पना खांदाट, लुहाण लक्ष्मण, चंद्रशेखर चवंडके, राऊत, केळगंद्रे व विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले समतेचा पुरस्कार करणार्‍या थोर समाजसेविका होत्या :  बाळासाहेब भुजबळ

     वेब टीम नगर : आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या समतेच्या चळवळीत केवळ पत्नी म्हणून नव्हे तर समतेचा पुरस्कार करणार्‍या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले होत्या. फुले दांम्पत्यांचे जीवन चरित्र समतेचा खरा अर्थ प्राप्त करुन देते. पण, आज संकुचित वृत्तीने विशिष्ट जातीला लक्ष करुन कोणाला पुरोगामी होता येणार नाही, असे मत ओबीसी, व्हीजे,एनटी जनमोर्चाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केले.

     संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन माळीवाडा येथील महात्मा फुले विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नगरसेवक बाळासाहेब बोराटे होते. प्रारंभी सुषमाताई पडोळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले.

     याप्रसंगी अध्यक्ष बोराटे,  माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक अशोक दहिफळे आदिंची समयोचित भाषणे झाली. श्रीकांत मांढरे यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली.  सर्वश्री काका शेळके, रमेश सानप, डॉ.सुदर्शन गोरे,  सुनिल भिंगारे, सुनिल जाधव, फिरोज शफी खान, राजेंद्र पडोळे, परेश लोखंडे, रवी चवंडके, कैलास गर्जे, सचिन म्हस्के, अभिजित कांबळे, श्रीमती रजनी ताठे आदि उपस्थित होते. शेवटी शाम औटी यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार : जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहेर

वेब टीम नगर: पतसंस्थांची थकबाकी वसुलीची समस्या सुटसुटीत होवून १०१ चे दाखले त्वरित मिळणे गरजेचे आहे. मात्र अनेक कारणांनी दाखले मिळण्यास विलंब होत असतो. ही समस्या सोडवण्यासाठी  अत्याधुनिक, डिजिटल, पेपरलेस, फेसलेस व ऑनलाइन पद्धतीने होण्यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांनी नवे सॉफ्टवेअर स्वीकारणे गरजेचे आहे. राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनी यांनी संयुक्तपणे १०१ च्या दाखल्यांचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कमी वेळात बिनचूक पद्धतीने सहकार खात्याकडे सादर होण्यासाठी तयार केलेले ‘१०१ कारवाई ’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर कामाचा वेग वाढवणारे आहे. त्यामुळे सर्व तालुका उपनिबंधकांनी त्याच बरोबर जास्तीतजास्त पतसंस्थांनी हे सॉफ्टवेअर घेवून उपयोग सुरु करावा. सर्व तालुका उपनिबंधकांना काय अपेक्षित आहे, यात अजून काय सुधारणा कराव्यात आय बाबत सूचना कराव्यात. ‘१०१ कारवाई ’ या सॉफ्टवेअर मुळे राज्यातील पतसंस्थांची वसुली १ मे पासून फेसलेस होणार आहे, अशी माहिती जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

          जिल्हा उपनिबंधक कार्यालय व राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित बैठकीत सहकरी पतसंस्थांची १०१ चे दाखले वेगाने सादर होण्यासाठी मिडियाकॉन इंडिया या कंपनीने तयार केलेले ‘१०१ कारवाई ’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देण्यासाठी सर्व तालुका उपनिबाधकांच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन नगरमध्ये करण्यात आले होते. या बैठकीत ‘१०१ कारवाई ’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची डिजिटल स्क्रीनवर सविस्तर माहिती देण्यात आली. उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सुरेखा लवांडे, सॉफ्टवेअरचे निर्माते विनीत डावरे आदींसह सर्व तालुक्यांचे उपनिबंधक उपस्थित होते.

यावेळी काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांची कर्ज थकबाकी वेगाने व्हावी यासाठी १०१ चे दाखले त्वरित मिळावेत ही मागणी राज्य पतसंस्था फेडरेशन कित्तेक वर्षांपासून सहकार विभागाकडे करत आहे. आता डिजिटल व ऑनलइन तंत्रज्ञानाचा काळ आला आहे. म्हणूनच राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनी यांनी संयुक्तपणे तयार केलेले ‘१०१ कारवाई ’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर मुळे १०१ ची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने गतिमान होणार आहे. या डिजिटल सॉफ्टवेअरचे आत्तापर्यंत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह सहकर विभागाचे सचिव व आयुक्त यांच्यापुढे सादरीकरण झाले आहे. सर्वांनी या सॉफ्टवेअरला ग्रीन सिग्नल दिला आहे. तालुका उपनिबंधक स्वतः हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष वापरणार असल्याने यात काय काय सुधारणा होणे आवश्यक आहे याबाबतच्या महत्वपूर्ण सूचना सर्वांनी कराव्यात. त्याच बरोबर जिल्ह्यातील जास्तीतजास्त पतसंस्थांनीही या सॉफ्टवेअरचा वापर सरू करावा. नगर जिल्ह्यात या सॉफ्टवेअरचा उपयोग पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु होणार असून १ मे महाराष्ट्र दिनापासून पूर्ण राज्यात या सॉफ्टवेअरचा उपयोग सुरु होणार आहे. यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांनी आपापल्या तालुक्यातील पतसंस्थांना १०१ च्या दाखल्याच्या या अत्याधुनिक व सुटसुटीत सॉफ्टवेअर बद्दल जास्तीतजास्त माहिती देवून वापर सुरु करावा, असे आवाहन केले.

          बैठकीचे प्रास्ताविक पतसंस्था फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी केले. आभार मानताना वसंत लोढा म्हणाले, नगर जिल्हा हा सहकार चळवळीला चालणा देणारा आहे. पतसंस्थांच्या वसुलीचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी १०१ कारवाई हे अत्याधुनिक नवे सॉफ्टवेअर फार उपयोगी ठरणार आहे. स्थैर्यनिधी सहकारी संघा प्रमाणे या सॉफ्टवेअरचा प्रयोगही पायलट प्रोजेक्ट म्हणून नगर जिल्ह्यात होणार आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राजस्थान उर्दू अकादमी जयपुर तर्फे जागतिक महिला दिनी डॉ. कमर सुरूर यांचा सन्मान

वेब टीम नगर : जागतिक महिला दिवसा निमित राजस्थान उर्दु अकादमी, जयपुर तर्फे खुशबुओं की शाम महिलाओं के नाम या महिलांच्या आखिल भारतीय मुशायरा चे आयोजन करुन भारताच्या नावाजलेल्या कवियंत्रीच्या मुशायरा मध्ये सन्मान करण्यात आला. ज्या मध्ये महाराष्ट्रतुन अहमदनगर येथील कवियत्री व अहमदनगर जिल्हा उर्दु साहित्य परिषदेच्या सहसचिव डाँ. कमर सुरुर यांचा राजस्थान मानवी हक्क  कमिशन चे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डाँ. कमर सुरूर यांनी या मुशायर्यात बेटी यावर आपली कविता सादर करताना म्हणाले की

मै हूं औरत वो है मेरी बेटी

देखे दुनिया ये हक है उसको भी

ही कवितेत त्यांनी मुलींना जन्माआधीच पोटातच मारल्या जात आहे यावर प्रकाश टाकून रसिकांची भरपूर वावा मिळविली. तर समाजाला उद्देशून सांगितले की

क्या तुम्हारे लिये मुसीबतों हुँ

जुर्म मेरा यही के औरत हुँ

 अशा कवितेतून त्यांनी आपल्या भावना मांडल्या व रसिकांना मंत्रमुग्ध केले. राजस्थान उर्दु अकादमी चे सचिव मोअज्जम अली यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेखा सादर करून मुशायर्यात आलेल्या जयपूर,आग्रा,दिल्ली,लखनऊ अहमदनगर,उज्जैन, गोवा, गोलियर, बांसवाडा व इतर ठिकाणच्या सर्व कवयित्रींचे आभार व्यक्त केले.

मुशायराच्या अध्यक्षस्थान राजस्थान मानवी हक्क कमिशन चे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांनी भूषविले. उद्घाटन डिविजनल कमिशनर व एडमिनिस्ट्रेटिव राजस्थान उर्दू अकॅडमी चे डॉ. सुमित शर्मा यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थान वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष मोहम्मद युसुफ,आमदार जिविकार रफिक खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोईन शादाब यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भविष्यात मनसेची घौडदौड अशीच सुरु राहील 

सुमित वर्मा : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘धर्मजागृती अभियान’चा शुभारंभ

   वेब टीम नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कासाठीच झाली असून, मराठी माणसाला त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मनसे लढा देत आहेत. आज युवकांचे, महिलांचे अनेक प्रश्‍न आहेत, यासाठी कार्यकर्ते काम करत असून, जेथे-जेथे अन्याय होतो, तेथे-तेथे मनसेने लक्ष घालून आपल्या वेगळ्या स्टाईलने प्रश्‍न सोडविले आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्यावतीने सुरु असलेल्या कार्याने प्रभावित होऊन अनेक युवक मनसेमध्ये दाखल होत आहेत. राज ठाकरे यांच्या धडाकेबाज नेतृत्वामुळे मनसे पक्ष सर्वसामान्यांना भावत आहेत. भविष्यात पक्षाची घौडदौड अशीच सुरु राहील, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष  सुमित वर्मा यांनी केेले.

     मनसेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी सेनेच्यावतीने धर्मजागृती अभियान वर्गाच्या पोस्टर्सचे अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. नगरमध्ये वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, संकेत जरे, आदेश गायकवाड, ओंकार काळे, प्रणव सोनवणे, प्रशांत गारुडकर, चेतन आमले, स्वप्नील वाघ, योगेश गुंड आदि उपस्थित होते.

     पुढे बोलतांना सुमित वर्मा म्हणाले, मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त धर्मजागृती वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत पश्‍चिमात्य संस्कृतीचे होणारे अतिक्रमण थोपविण्यात यावे, युवा पिढी यापासून दूर रहावेत. लहान मुलांसाठी श्रीमद् भगवत गीता, श्‍लोक शिकविण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांना भारतीय संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न या निमित्त केले जाणार आहेत. यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यरत  राहणार असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी प्रकाश गायकवाड यांनी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments