नगरटुडे बुलेटिन 09-03-2021

 नगरटुडे बुलेटिन  09-03-2021           

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

समाज कंटकांविरोधात लढा उभारणार

प्रभुणे :  सूर्यनगर येथील पीडित महिलांची पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी घेतली भेट   

वेब टीम नगर :  नगर शहरातील सुर्यनगर येथे राहणाऱ्या महिलांना मंदिरात केल्या जाणाऱ्या आरतीसंबंधीत वादातून नोव्हेंबर महिन्यात समाज कंटकांकडून अमानुष भटके-विमुक्त समाजातील महिलांना समाजकंटकांकडुन मारहाण करण्यात आली.या पीडित महिलांची भटके-विमुक्त समाजाचे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी भेट घेतली.हि घटना निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या घटनेने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या समाज कंटकांना कठोर शासन मिळावे.यासाठी लढा उभारणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरिश प्रभुणे यांनी सांगितले.                                                                                                             

सूर्यनगर येथील पीडित महिलांची भटके-विमुक्त समाजाचे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी भेट घेतली .याप्रसंगी विवेक विचार मंचाचे चंद्रकांत जाधव,नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते.महिलांना मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.पीडित महिलांची तक्रार घेत असताना पोलिसांनी सहकार्य केले नाही.असा आरोप पिडीतांनी केला आहे.तसेच पोलिस प्रशासनाने अत्यंत अवमानकारक शब्द वापरले.अर्वाच्च भाषेत पोलिसांनी दमदाटी केली,तडीपार करण्याच्या धमक्या दिल्या,असे सांगून पीडित महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कमलाताई आपटे यांना ‘ ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान ' पुरस्कार प्रदान

अहमदनगर रोटरी क्लब व मानकन्हैैय्या ट्रस्टचा उपक्रम

वेब टीम नगर : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या, अंध सेवा मंडळाच्या संस्थापिका श्रीमती कमलाताई आपटे या लवकरच ९७ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्त रोटरी क्लब अहमदनगर व मानकन्हैैय्या ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना ‘ ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान ’ पुरस्कार  देवून सन्मानित करण्यात आले. अंध बंधुंसाठी कमलाताई आपटे यांच्या संकल्पनेतून डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या प्रयत्नातून रोटरीने एमआयडीसी येथे उभारलेल्य रोटरी निवारा या घरकुल वसाहतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, रोटरी क्लबचे सचिव पुरुषोत्तम जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र आपटे, डॉ. दादासाहेब करंजुले, निलेश वैकर, प्रशांत बोगावत, माधव देशमुख, कौशिक कोठारी, महावीर मेहेर आदी रोटरी क्लबचे सदस्य, आपटे परीवार व अंध सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

          यावेळी कमलाताई आपटे यांनी सत्कारास उत्तर देतांना भावनाविश होत जुन्या घटना व आठवणींना थोडक्यात उजाळा दिला. त्या म्हणाला, नगरमध्ये कोणीही अंध बांधवांसाठी काम करत नव्हते. त्यावेळी डॉ. प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया यांच्या मुळेच मी अंध बंधूभगिनींसाठीचे सेवाकार्य सुरु करू शकले. त्यातूनच हा अंध बंधावांसाठी रोटरी निवारा प्रकल्प उभा राहिला आहे. हे कार्य आजही चालू आहे. उत्तरोत्तर या कार्याची अजून प्रगती होवो व या ठिकाणी दुमजली इमारत उभी राहो या सदिच्छा देते. देवाने मला भरपूर शक्ती दिली आहे. त्यामुळे रोटरीच्या या कार्याला माझी जी मदत लागेल ते पूर्ण सहकार्य देण्यास मी तयार आहे. या कार्याला माझे भरपूर आशीर्वाद आहेत. जीवनात मी जे काही सामाजिक काम केले आहे ते सर्वांनी केलेल्या मदती मुळेच. आजच्या कार्यक्रमच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मनात आहे. आज हा माझा अलभ्य लाभ आहे. माझा एवढा मोठा अद्वितीय असा सन्मान होईल अशी मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. याचा मला सर्वात जास्त आनंद झाला आहे.

          पुरुषोत्तम जाधव म्हणाले, कमलाताई आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २० वर्षापूर्वी उभा केलेला हा रोटरी निवारा आजही भक्कम स्थितीत उभा आहे. रोटरीच्या इतिहासात एक नवा आदर्श या प्रकल्पाने निर्माण केला आहे. याठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून नवनवीन सुविधा देत आहे.

          डॉ. दादासाहेब करंजुले म्हणाले, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या बरोबर काम केलेल्या कमलाताईंचे कार्य महान आहे. त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा रोटरी निवारा प्रकल्पासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

          प्रास्ताविकात डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, आज ९७ वर्षाच्या झालेल्या कामलाताई आपटे यांनी देशाच्या स्वात्यंत्र्यासाठी व अंध बंधुंसाठी केलेल्या महान कार्याचा सन्मान होण्यासाठी अहमदनगर रोटरी क्लब व मानकन्हैैय्या ट्रस्टच्या वतीने या ह्रुदयस्पर्शी कार्याक्रमचे आयोजन  केले आहे. रोटरी निवारा निर्माण होण्यात कालामाताईंचे फार मोठे योगदान आहे.

          यावेळी सविता काळे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या नगर शाखेचे अध्यक्ष संभाजी भोर आदींचे भाषणे झाली. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी कमलाताई आपटेंच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले. यावेळी प्रकाश भंडारे, रोटरी निवारा वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सभापती अविनाश घुले शहराच्या विकासात मोलाची भर घालतील : ईश्वर बोरा

वेब टीम नगर : नगर शहराचा विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. शहराचा चांगला विकास व्हावा यासाठी विकासात्मक दृष्टीकोन असलेले पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मनपा स्थायी समितीचे नूतन सभापती पदावर  अविनाश घुले हे अनुभवी व्यक्तीमत्व विराजमान झाले आहेत. ते शहराच्या विकासात नक्कीच मोलाची भर घालतील. वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानचे अविनाश घुले हे मार्गदर्शक आहेत. सभापतीपदी त्यांची झालेली निवड आम्हा सर्वांना अभिमानस्पद आहे, असे प्रतिपादन वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानचे ईश्वर बोरा यांनी केले.

            वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपाचे नूतन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचे ईश्वर बोरा  व अध्यक्ष प्रतिक बोगावत यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी चिंटू खंडेलवाल, मनीष सोनग्रा, संदीप बायड, गणेश गोयल, आदित्य गांधी, संभव काथेड, संतोष ठाकूर, हेमंत रासने, संजय कांगला, प्यारेलाल खंडेलवाल, रवी किथानी, अजय ढोणे, भैय्या भांडेकर आदी उपस्थित होते.

            यावेळी सभापती अविनाश घुले म्हणाले, आ. संग्राम जगताप व राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारींनी माझ्यावर विश्वास व्यक्त करत सभापती पदाची जवाबदारी दिली आहे. सर्व नागरिकांच्या सहकार्याने या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात योगदान देणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्यक्त होणार्‍या साहित्यिका निर्माण व्हाव्यात

कवी चंद्रक़ांत पालवे : जिल्हा वाचनालय महिला कर्मचार्‍यांच्यावतीने वाचनालयास महिला दिनी ‘ग्रंथांची’ अनोखी भेट

     वेब टीम नगर : सुसंवाद, व्यक्त होणे, आपले मत निर्भिडपणे मांडणे ही आज काळाची गरज आहे. साहित्य क्षेत्रात मोजक्या स्त्रीयांनी आपल्या क्षेत्रात लोकाभिमुख साहित्य लिहिले आहे. स्त्रीचे कर्तुत्व, तिचे मत, प्रश्‍न, भाव-भावना या साहित्यातून समाजापुढे व्यक्त होऊन प्रकट करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत साहित्यिक कवी चंद्रकांत पालवे यांनी व्यक्त केले.

     अहमदनगर जिल्हा वाचनालयात महिला दिनानिमित्त महिला कर्मचार्‍यांनी वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथांची भेट वाचनालयास दिली. याप्रसंगी उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, उद्योजक सतीश झिकरे, संचालक दिलीप पांढरे, गणेश अष्टेकर, सन्मानार्थी कर्मचारी कु.पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, उमा देशपांडे, पुनम गायकवाड, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होेते.

     सतीश झिकरे यांनी मनोगततात ‘स्त्री-पुरुष कुटूंबाच्या रथाची दोन चाके आहेत. एकमेकांच्या मतांचा आदर करुन प्रगती केली तर समाज व देशाची प्रगती होत असल्याने सुसंवाद आवश्यक असल्याचे सांगितले.

     प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी ‘देशाच्या, समाजाच्या व कुटूंबांच्या प्रगतीत स्त्रीचा वाटा अमुल्य असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे.’ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही एकमेकांच्या मतांचा आदर केला तर भविष्य उज्वल असल्याचे सांगितले.

     उपस्थित महिला संचालिका व सन्मानार्थी महिला कर्मचार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्तविक गणेश अष्टेकर यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पांढरे यांनी तर आभार अमोल इथापे यांनी मानले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा

नगरसेविका ज्योतीताई गाडे : महिला शिक्षकांचा रोपे देऊन महिला दिन साजरा

    वेब टीम नगर : स्त्रीयांना समान हक्क मिळून कायदे झाले. शिक्षणाच्या संधी मिळाल्याने स्वावलंबी झाल्या, अनेक बाबतीत प्रगती केली, त्यामुळे त्यांना स्वत:ची कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळाली. रोजगार, आरोग्य सेवा, सामाजिक समस्यांचा पाठपुरावा करताना पर्यावरणाला महत्व देऊन पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगरसेविका ज्योतीताई गाडे यांनी केले.

     फकिरवाडा येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात महिला शिक्षकांना रोपे देऊन महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सौ.गाडे बोलत होत्या. याप्रसंगी अर्बन बँकेचे निवृत्त शाखाधिकारी हेमंत बल्लाळ, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, लक्षवेधी नागरिक सेवा संघटनेचे कुतुबुद्दीन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गाडे पुढे म्हणाल्या, स्त्रीयांनी अध्यात्मापासून ते रणभुमीपर्यंत वेळोवेळी कर्तुत्व गाजवलेले आहे. तरीही स्त्रीयांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे कोणी दाखल घेत नाही, ही परिस्थिती बदलण्याची गरज गरज आहे. पर्यावरणाचा समतोल ठेवायचा तर वृक्षारोपण होणे हाच पर्याय आहे.

     यावेळी हेमंत बल्लाळ म्हणाले, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी रशिदाबी सेवा प्रतिष्ठानतर्फे रोपवाटिका कार्यक्रम करुन महिलांना जी रोपे वाटप केली त्यांचे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन संगोपन होणे गरजेचे आहे.

     प्रतिष्ठानचे कुतुबुद्दीन शेख म्हणाले, आपण जसे घरातील मुला-बाळांना जपतो, तसे वृक्षांना जपा. त्यांची जोपासना करा, प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा म्हणजे पर्यावरणाचा र्‍हास थांबेल.

     प्रारंभी मुख्याध्यापिका एच.सी.बनकर यांनी महिला दिनाचे महत्व विषद केले. श्रीमती एन.पी.गोरे यांनी कर्तुत्ववान महिलांचा इतिहास सांगितला. शेवटी गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा बँकेकडून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार

 शिवाजी कर्डिले : परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांचे  निवेदन

वेब टीम नगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांची कर्ज मर्यादा वाढविण्याकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांच्या वतीने जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.आ. शिवाजी कर्डिले यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद भाऊसाहेब जिवडे, बबन शिंदे, भाऊसाहेब रोहकले, ज्ञानदेव बेरड, ज्ञानेश्‍वर शिंदे, भाऊसाहेब शिंदे, अभय जावळे आदी उपस्थित होते.

सध्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अडीचशे कोटीचे कॅश क्रेडीट मंजूर आहे. कॅश क्रेडीटचे व्याजदर ११. ५० टक्के असल्याने त्याची तेवढी उचल होत नाही. सभासदांची जामीनकीची कर्ज मर्यादा कमी असून, ती फक्त चौदा लाखाची आहे. कॅश क्रेडीटची उचल होण्यासाठी जिल्हा बँकेने व्याजदर कमी केल्यास सोसायटीला कर्ज मर्यादा वाढवता येणार आहे. यामुळे कॅश क्रेडिटची उचल होणार आहे. इतर बँकाप्रमाणे सभासदांना मोठे कर्ज देता येऊ शकणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांना सध्या ८. ५० टक्क्यांनी कर्ज दिले जाते. जिल्हा बँकेने व्याजदर कमी केल्यास सोसायटीच्या सभासदांना आनखी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करता येईल व कर्ज मर्यादा वाढवता येणार असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

या मागणीची दखल घेत जिल्हा बँकेने कॅश क्रेडिटचे व्याजदर ११. ५० टक्के असताना ते व्याजदर ८. ५० एवढा करण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांनी केली आहे. मा.आ. कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकित सदर विषय घेऊन सर्व संचालक मंडळाच्या परवानगीने कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments