फेमस 'सोयाबीन चिली'



"स्वयंसिद्धा"

 एकीचं बळ मोठं असतं असं म्हणतात त्याप्रमाणेच बचत गटाची चळवळ सुरू झाली .बघता बघता या रोपट्याच वटवृक्षात रूपांतर झालं ,गावोगावी बचतगटाचा जाळं पसरलं .महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची ही नांदी ठरली. अनेक महिला उद्योजिका बनल्या . 'एकमेका सहाय्य् करू अवघें धरू 

सुपंथ' या म्हणी प्रमाणे महिलाच आता एकमेकींच्या मदतीला धावून जातांना दिसतात . कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड देतात ,तेही सक्षमपणे. या  त्यांच्या वाटचालीचा  धांडोळा आपण दर सोमवारच्या 'स्वयंसिद्धा 'या बचतगटातील भगिनींच्या यशोगाथांच्या लेखमालिकेतून घेणार आहोत.   

फेमस 'सोयाबीन चिली' 

गुलमोहर रस्त्यावरच्या पोलिस ठाण्याजवळचा परिसर तेथे दोन महिला ॲप्रोन  घालून, केसांवर घट्ट टोपी घालून मोठ्या आत्मविश्वासाने सोयाबीन चिली तयार करून देत होत्या, कुतूहल म्हणून त्यांच्या जवळ जाऊन विचारलं तसं त्याही अभिमानाने सांगू लागल्या चार वर्षापासून आम्ही  हा व्यवसाय करतो मग मनात कुतूहल आणखीनच वाढलं  तसं या व्यवसायाबद्दल आणखीन बोलतं केलं ,आणि विचारलं या व्यवसायाला सुरुवात कशी केली.  त्यावर त्या म्हणाल्या साईज्योती यात्रेतून  प्रेरणा मिळाली . त्यातूनच उलगडली प्रयागा लोंढे आणि आशा आढाव यांच्या सोयाबीन चिली ची गोष्ट .  

 सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता, तरीही त्याला न जुमानता थालीपीठ करून विकली , आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला.  जसा पैसा हातात खेळायला लागला तसा घरच्यांचा  विरोधही मावळायला लागला.  साईज्योती यात्रा संपत आली तसं जाणवायला लागलं सगळ्यांचीच आमटी भाकरी ,सगळ्यांची थालीपीठ आपण वेगळं काहीतरी करावं आणि एकदम हा पदार्थ आठवला हे करून पाहावं आणि आम्ही मनावर घेतलं कुणाचं  मार्गदर्शन नाही त्यामुळं  चाचपडत चाचपडत सुरुवात केली. 

ग्राहकांच्या पसंतीनुसार पदार्थ करून द्यायला लागलो सुरुवातीला जास्त गिरेवितले   मंचुरियन देताना ग्राहक ड्राय मंचुरियनची मागणी करू लागले.  ग्राहकांना जे हवं ते आपण द्यावं या न्यायाने  व्यवसाय सुरू केला.  सुरुवातीपासूनच  पौष्टिक पदार्थ द्यायचा हे मनाशी पक्क केलं होतं.  

अगदी सुरुवातीला पाव किलो वजनाच्या सोयाबीन मंचूरियन करून विकले बस, त्यादिवशी तेवढाच आमचा व्यवसाय झाला .  मात्र आम्ही हतबल झालो नाही व्यवसायात  चिकाटी  ठेवली हळूहळू तोंडी प्रसिद्धी होत गेली ,आणि आता व्यवसायात चांगला जम बसला आहे. प्रयागाताई अगदी मनलावून त्यांची खरी गोष्ट सांगू लागल्या.  

 अगदी सुरुवातीच्या काळात एकवीरा चौकातल्या भाजी मार्केट जवळच्या जागेत आम्ही हा व्यवसाय सुरू केला.  एक दिवस महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आलं आणि त्यांनी आम्हाला तिथून हाकलून लावले, मग आम्ही येथे येऊन व्यवसाय करू लागलो बचत गटातील मी आणि आशा आढाव  दोघींनी हा व्यवसाय सुरू केला .  इतर महिलांनी आपापले व्यवसाय थाटले ,वाढवले कोणी स्टेशनरी व्यवसायाला ज्वेलरी व्यवसायाची जोड दिली तर कोणी कपड्याच्या व्यवसायाला चपलांच्या व्यवसायाची जोड दिली.  तर आम्ही देखील मंचूरियनच्या व्यवसायाला 'टेम्पो मॉडीफाय' करून आणखीन एक मंचुरियन ची गाडी वांबोरी फाटया  जवळ सुरू केली . मात्र हे सगळं घडलं ते 'प्रांजल बचत गटा 'च्या माध्यमातूनच बचत गटात सहभागी झाल्यापासून आमच्या हाती पैसा येऊ लागला.  त्यातूनच मुलीचे लग्न ,घर बांधणं ,मुलाचं शिक्षण सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडल्या, तर शासनाने ही आमच्यातील ही जिद्द चिकाटी जोखून आम्हाला हिरकणी पुरस्काराने सन्मानित केलं.  ५० हजार रुपयांचा पुरस्कार आमच्या व्यवसायाला बराच हातभार लावून गेला.  पाव किलो सोयाबीन पासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दर दिवसा पाच किलो सोयाबीन पर्यंत गेला . संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत १०० पेक्षा जास्त प्लेट मंचूरियन विकल्या जातात.  तीन ते चार हजाराचा रोजचा व्यवसाय होतो असं प्रयागा  लोंढे मोठ्या अभिमानाने सांगतात.  बचत गटांमध्य प्रयागा लोंढे मेघना भंडारे, राजश्री गुंजाळ ,आशा आढाव, मंदा राऊत, हिराबाई साठे, रुकसाना शेख, प्रियंका दाणी, पुनम शिंदे आधी सहकाऱ्यांच्या सहाय्याने आम्ही काम केले त्यातून  एवढे मोठे यश साध्य झालं बचत गटाशिवाय एव्हढं मोठं यश मिळालेच नसते  असं  प्रयागा लोंढे आणि आशा आढाव आवर्जून सांगतात. 



Post a Comment

0 Comments