कोरोना संकट काळात धनदांडगे झाले आणखीन गब्बर

 कोरोना संकट काळात धनदांडगे झाले आणखीन गब्बर

वेब टीम मुंबई : कोरोनाने सर्वसामान्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम केला. तर  देशातील धनदांडगे आणखीनच गब्बर झाल्याची आकडेवारीतून स्पष्ट झाल्याचे चिंता समोर आले आहे. एका अहवालानुसार गेल्या वर्षभरात देशातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढझाली  आहे. याच कोरोना  संकटकाळात देशातील अब्जाधीशांच्या यादीत आणखी ४० नव्या अब्जाधीशांचा समावेश झाला आहे.

देशातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून मुकेश अंबानी यांचे अव्वल स्थान कायम आहे. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता ८३ अब्ज डाॅलर्स आहे. मागील वर्षभरात अंबानी यांच्या संपत्तीत २४ टक्के वाढ झाली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये अंबानी हे जगभरातील श्रीमंतांमध्ये आठव्या स्थानी आहेत.

अंबानी यांच्यापाठोपाठ भारतातील दुसरे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी देखील करोना संकटात मोठी कमाई केली आहे. अदानी यांची मालमत्ता दुप्पट वाढली असल्याचे हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये म्हटलं आहे. अदानी यांनी तब्बल २० स्थानांची झेप घेत ४८ वे स्थान पटकावले आहे. अदानी यांची मालमत्ता ३२ अब्ज डॉलर्स आहे. गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्या मालमत्तेत १२८ टक्के वाढ झाली आहे. विनोद अदानी यांची एकूण मालमत्ता ९.८ अब्ज डॉलर्स आहे.

करोना संकटामुळे आर्थिक विकास दर उणे ७ टक्के झाला होता. केंद्र सरकारने करोना रोखण्यासाठी कठोर टाळेबंदी लागू केली होती. ज्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर झाला असल्याचे 'हुरुन इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रहमान यांनी सांगितले. भारतात सायक्लिकल इंडस्ट्रीच्या जोरावर उद्योजकांची मालमत्ता वाढली आहे. याउलट अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमधून संपत्ती निर्माण केली जाते, असे त्यांनी सांगितले.

महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेत १०० टक्के वाढ झाली आहे. आनंद महिंद्रा यांची एकूण संपत्ती २.४ अब्ज डॉलर्स आहे. त्याशिवाय सॉफ्टवेअर कंपनीचे प्रमुख जय चौधरी यांच्या मालमत्तेत मागील वर्षभरात २७४ टक्के वाढ झाली असून त्यांची मालमत्ता १३ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.

Post a Comment

0 Comments