नगर बुलेटीन -०२-०३-२०२१

 नगर बुलेटीन -०२-०३-२०२१

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'तुझ माझं जमतंय' या मालिकेतील कलाकारांचा मराठी राजभाषा दिनी  मनसे कडून सत्कार 

वेब टीम नगर : मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अहमदनगरच्यावतीने शहरातील सुरू असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका "तुझ माझ जमतंय " यातील कलावंतांचा सिने अभिनेते प्रकाश धोत्रे यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला. शहराच नावलौकिक करणाऱ्यांचा हा आदर यावेळी व्यक्त करण्याची संधी मिळाली. 

 यावेळी मोहनीराज गटणे बोलतांना म्हणाले की मराठी राजभाषा वर खुप प्रेम करा मराठी भाषा वाढवा तिचा संपुर्ण जगात जागर करा असा संदेश देऊन त्यांनी अहमदनगर वासियांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

 यावेळी मनसेच नितीन भुतारे म्हणाले की मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला हे आमचे भाग्य असून कलाकारांमुळे दररोज मराठीचा दर्जा वाढवला जातो.  उंच शिखरापर्यंत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मराठीला मिळुन देण्याचे काम मराठी कलाकारांनी केले असून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळविण्या करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रात्रंदिवस काम करीत राहणार असे भुतारे यांनी सांगितले. 

 यावेळी ,राहूल सुराणा,अमित रेखी, मालिकेचे दिग्दर्शक कुलकर्णी , विराज मुनोत,अंकुश काळे, यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मालिकेमधील कलाकार तंञज्ञ सहकार्य करणारे उपस्थित होते. यावेळी शहरातील कलावंताचा सत्कार करताना नक्कीच आनंद मिळतो पण आपल्यासारखे प्रसिद्ध आणि नामवंत कलावंत आमच्या शहरात येतात कार्य करतात याचाही आम्हाला जास्त आनंद होतो सर्वांना आपल्या अदांनी घायाळ करणारी पप्मी  तसेच झी मराठी देवमाणूस मालिका फेमम्हणजेच प्रतिक्षा जाधव यांचा यावेळी स्वागत आणि सन्मान करण्यात आला.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा महिलाध्यक्षा ॲड.अनिता दिघे, गणेश शिंदे, संकेत होशिंग, समर्थ उकांडे  आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत वचन आपणास जीवनात मार्गदर्शक

दिलीप सातपुते : संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने पूजन

    वेब टीम  नगर : संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील थोर संत होते,  शिव आणि विठ्ठल एकच आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन टाकला. संतांनी दिलेले विचार हे आपल्या आयुष्याला सत्मार्ग दाखविणारे आहेत. त्यांनी मनुष्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीतून भगवंतांचा सेवा मार्ग दाखलविला आहे.   संतांचे थोर वचन आपणास जीवनात मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे संतांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.

     संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोर्ट गल्ली येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात त्यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनप्पा, विशाल वालकर, परेश लोखंडे, आनंद लहामगे, काका शेळके, बाळासाहेब भुजबळ, प्रकाश लोळगे, सागर शहाणे, संजय देवळालीकर आदि उपस्थित होते.

     यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, संत सेना महाराजांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी-परंपरांना छेद देऊन चांगल्या समाज निर्मितीसाठी अभंगाच्या माध्यमातून समाजात जागृती घडवून आणली. आपणही समाजात काम करतांना समाजातील वंचित घटकांसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन केले.

     संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश देवळालीकर, मुकुंद निफाडकर, शरद कुलथे, विजय हिंगणगांवकर, कैलास मुंडलिक आदिंसह ट्रस्टचे पदाधिकारी व सोनार समाज बांधव उपस्थित होते.

     प्रास्तविकात ट्रस्टचे संजय देवळालीकर यांनी मंदिराच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेवटी विशाल वालकर यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांवरील अन्यायाला वाचा फोडणार

आ.सुरेश धस : महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीला आश्‍वासन

    वेब टीम  नगर :  राज्यातील 75 हजार होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस कृती आराखडा नाही. होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांचे अधिकार दिल्यास राज्यातील लाखो  रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे.  सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांचे पाच वर्षांपासून प्रलंबित असलेले रजिस्टेशन देणे गरजेचे होते. मात्र त्यासाठी सुद्धा  शासन गंभीर नाही. ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. यासंदर्भात राज्यातील  होमिओपॅथी डॉक्टरांना मी सक्रीय मदत करणार आहे.  असे प्रतिपादन  माजी मंत्री आ. सुरेश धस यांनी  कृती समिती शिष्टमंडळास दिले.

     महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीच्यावतीने होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत आ.सुरेश धस यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी शासनस्तरावरील आवश्यक असलेली उपाय योजनांबाबत मत मांडले. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांची पार्श्‍वभुमी कृती समितीचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत शिंदे यांनी विषद केली.

     यावेळी आ. सुरेश धस यांनी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांबाबत  आश्‍वासक आणि आग्रही भुमिका मांडली. यासाठी सक्रीय मदत करण्याची ग्वाही तर दिलीच सोबत या प्रलंबित प्रश्‍नांबाबत शासन स्तरावरील होणार्‍या दिरंगाई बाबतही परखड मत व्यक्त केले.

      यावेळी अहमदनगर कृती समितीचे जिल्हा संघटक डॉ. रणजीत सत्रे, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय गरूड, डॉ. संजीव गडगे, शहर अध्यक्ष डॉ. किरण कर्डीले, शहर सचिव डॉ. दिपक कारखेले,  जामखेड तालुकाध्यक्ष डॉ. भरत देवकर, आष्टीचे डॉ. दिपक भवर, डॉ. सुरेश हंबर्डे, डॉ.पी.डी. शिंदे, डॉ.अनिल जाचक, पाटोदा तालुका अध्यक्ष डॉ. रविंद्र राजपुरे, आष्टी तालुका संघटक डॉ. प्रविण धस, सचिव डॉ. गणेश पिसाळ,  डॉ. सत्यवान सुरवसे , डॉ.अमिन शेख आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

     प्रस्तावना कृती समितीचे आष्टी तालुकाध्यक्ष डॉ. नदिम शेख यांनी केले. आभार राज्य सचिव डॉ. अशोक भोजने यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले : डॉ. सर्जेराव निमसे

वेब टीम नगर : माणसाने आयुष्यात जगताना दूरदृष्टी व सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे प्रा.रंगनाथ भापकर यांचे समृद्ध आयुष्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या आयुष्याचा समग्र जीवनपट त्यांच्या पत्नी  तारका भापकर यांनी रंगतारा या ग्रंथातून मांडला असल्याचे प्रतिपादन लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले.

गणराज प्रकाशन अहमदनगर यांनी मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले. या अंतर्गत नुकताच प्रा. रंगनाथ भापकर तथा तात्यासाहेब यांच्या संघर्षमय हृदयस्पर्शी जीवन कार्यावर आधारित व सौ.तारका भापकर लिखित रंगतारा चरित्र ग्रंथ व इंजी.मंगेश भापकर संपादित तात्यासाहेब ग्रंथ प्रकाशन सोहळा कोहिनूर मंगल कार्यालयात प्रा. रंगनाथ भापकर यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभ कार्यक्रमात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लेखिका सौ.तारका भापकर यांनी केले. माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सिने गीतकार बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, साहित्य परिषदेचे चंद्रकांत पालवे, प्राचार्य अशोक दोडके, जिल्हा मराठा संस्थेचे संस्था अधीक्षक मोडवे भाऊसाहेब, दत्तापाटील नारळे, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नारायणगाव येथील मानसोपचार तज्ञ डॉ. घाडगे पाटील, सत्कारमूर्ती रंगनाथ भापकर, तारका भापकर, मंगेश भापकर, प्रकाशक ग.ल. भगत आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी कुलगुरू  निमसे म्हणाले की, माणसानं कष्टाळू सेवाभावी व संवेदनशील असले पाहिजे. तात्यासाहेबांच जीवन पुढील पिढ्यांना निश्‍चित दीपस्तंभासारखे आहे .त्यांच्या जीवन कार्या वरील हे दोन्ही ग्रंथ निश्‍चित चरित्र साहित्य प्रकारात भर घालणारे आहेत.गणराज प्रकाशनाचे काम साहित्य क्षेत्रात प्रभावी पणे चालू असून अनेक साहित्यिकांना उभं करण्याचं काम प्रकाशनाने केले. मराठी भाषा दिन व विज्ञान दिन यांचा समन्वय घडला की निश्‍चित भविष्यात चांगल्या साहित्यकृती घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सेवानिवृत्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने रंगनाथ भापकर यांचा गौरव समितीच्या वतीने व रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रंगतारा व तात्यासाहेब या पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी इंजिनीयर मंगेश भापकर, सत्कारमूर्ती तात्यासाहेब  भापकर, डॉ. स्नेहल घाडगे, दत्तापाटील नारळे, चंद्रकांत पालवे, प्राचार्य अशोक दोडके आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब सौदागर म्हणाले की, मराठी भाषा संवर्धनासाठी गणराज प्रकाशन अविरतपणे कार्यरत आहे नवोदितांना लिहित करणेसाठी साहित्यकृती निर्माण करणं तरल व भावस्पर्शी ग्रंथ आज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.तात्यासाहेब यांच समृद्ध आयुष्य ते जगले त्यांचा तो जीवनपट सर्वांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले की, माणसानं संवेदनशील मनांना आयुष्य जगले की त्याची प्रचिती येते. तात्यासाहेब हे खरे अभिनय संपन्न जीवन जगले. सर्व क्षेत्रात उत्तुंग काम करणारा नेतृत्व संपन्न कर्तृत्व म्हणजे तात्यासाहेब आहेत. हा सर्व त्यांच्या हृदयस्पर्शी रोमहर्षक जीवनपट त्यांच्या ग्रंथातून उलगडला आहे. तात्यासाहेब आयुष्याच्या रंगमंचावर यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले. आभार प्रकाशक ग.ल. भगत यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियम अटी शर्तीचे काटेकोर पालन करत सदर कार्यक्रम पार पडला.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घरकुल महसूल लोकअदालत भरवावी

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाची मागणी : ग्रामीण भागातील घरकुल वंचितांना दिलासा मिळण्यासाठी

वेब टीम नगर: मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने गावोगावी घरकुल महसूल लोकअदालत भरवून, ग्रामीण भागातील घरकुल वंचितांना दिलासा देण्याची मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

गावालगत असलेल्या नापीक व माळरानावरील जमीनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत अनुदानातून पाचशे चौरस फुटा पर्यंत जमीन घरकुल वंचितांना द्यावी, तर घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन दिल्यास ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटणार आहे. सरकारकडे जागा नसल्याने पंतप्रधान आवास योजना बारगळली आहे. या योजनेला गती देण्यासाठी घरकुल महसूल लोकअदालत प्रभावी ठरणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व डीआरडीएच्या अधिकार्‍यांपुढे घरकुल महसूल लोकअदालतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यांच्याकडून या प्रस्तावाला सकारात्मक उत्तर मिळाले आहे. सरकारकडून घरकुल वंचितांना गायरान व वन जमीनी मिळणे अशक्य आहे. तर पर्यायी जागा देखील उपलब्ध नसल्याने खाजगी नापिक जमीनी ताब्यात घेऊन सरकारने घरकुल महसूल लोकअदालतच्या माध्यमातून रस्ते, वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटून दिलासा मिळणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. घरकुल महसूल लोकअदालतसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागूल, फरिदा शेख, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या जंबो कार्यकारणीची घोषणा

पदाधिकाऱ्यात जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ

वेब टीम नगर : भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली वल्लाकटी यांनी महिला आघाडीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. नूतन कार्यकारणीत अंजली वल्लाकटी यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे. नव्या कार्यकारणीत एक अध्यक्षा, ९ उपाध्यक्षा, ३ सरचिटणीस, ७सचिव, १२ कार्यकारणी सदस्या व १४ विशेष निमंत्रित अशी जंबो कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.

          यावेळी बोलतांना अध्यक्षा अंजली वल्लाकटी म्हणाल्या, राज्यात भाजपाची सत्ता असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सक्षमपणे पायावर उभे करण्यासाठी विविध लाभदायी योजना सुरु करुन राबवल्या आहेत. आता भारतीय जनता पार्टी आज राज्यात सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी जनांदोलन करत आहे. भाजपाची महिला आघाडी यात मागे नाहीये. महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या आघाडी सरकार मधील्या मंत्र्यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात व शहरात आंदोलन करून मंत्र्यास राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली आता शहर महिला आघाडीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा करून शहरात महिलांची भक्कम फळी उभारली आहे. नव्या पादाधीकारींमध्ये नव्या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे.

          अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांनी घोषित केलेली नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्षा - अमृता फुटणे, शुभांगी साठे, ज्योती दांडगे, सुजाता औटी, सविता कोटा, स्मिता शेलार, लीला अग्रवाल, ज्योती सैदाणे व सुनीता आडेप. संघटन सरचिटणीस - प्रिया जानवे. सरचिटणीस - सविता तागडे. सचिव – सुनीता सामल, सुरेखा खैरे, मीरा महाजनी, रुपाली मुथा, ज्योत्स्ना कुलकर्णी, सुजाता पाटील, हेमलता कांबळे.  कार्यकारणी सदस्या – विद्या दगडे, सुप्रिया देपोलकर, सुनंदा नागूल, स्वाती पवळे, शैलजा लड्डा, कावेरी वाघ, रत्नमाला कुलकर्णी, पूनम तरवडे, संगीता मुळे, अशा सातपुते, गंधाली पटवर्धन, आश्वनी साबळे, शीतल जाधव. विशेष निमंत्रित – प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, वंदना पंडित, माजी उपमहापौर गीतांजली काळे, संगीता खरमाळे, कालिंदी केसकर, उपमहापौर मालन ढोणे, दीप्ती गांधी, सभापती लता शेळके, पल्लवी जाधव, सोनाली चितळे, अशा कराळे, सोनाबाई शिंदे व छाया राजपूत.

          नूतन कार्यकारणीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, खासदार सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे आदींनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तालुका दूध संघाकडे वर्ग झालेल्या ७० संस्था सभासदांना सभासदत्व द्या 

वांढेकर यांचे नाशिक विभागीय दुग्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालया समोर उपोषण

वेब टीम नगर : जिल्हा दूध संघाने तालुका दूध संघाकडे वर्ग केलेल्या ७०संस्था सभासदांना सभासदत्व द्यावे अन्यथा तालुका दुध संघाची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथील सिद्धार्थ सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष  जे.बी. वांढेकर यांनी नाशिक येथील विभागीय दुग्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालया समोर उपोषण केले.

अहमदनगर जिल्हा दूध संघाचे विभाजन होऊन दि.२५नोव्हेंबर २००० पासून दूध संकलन वृद्धेश्‍वर सहकारी दूध संघाने (ता. पाथर्डी) सुरू केले आहे. त्यापासून १४१ दूध संस्था तालुका दूध संघाकडे जिल्हा दूध संघाने वर्ग केल्या आहेत. १४१ पैकी ७१ संस्था सभासदत्व देण्यात आले. मात्र ७० संस्था सभासदांना आज पर्यंत सभासद करण्यात आलेले नाही. उर्वरीत संस्था सभासदांना सभासदत्व देऊन त्यांचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकवेळा आंदोलन, उपोषण करुन पाठपुरावा करण्यात आला. सदर प्रश्‍नी जिल्हा दूध संघाचे सभासद संस्था यांना दि.२९ जानेवारी २००५ च्या आदेशानुसार तालुका दुध संघाच्या सभासद असल्याचे लेखी देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत सत्तर सभासदांना सभासदत्व नाकारण्यात आलेले आहे. नुकतीच तालुका दुध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. तरी ७०संस्था सभासदांना सभासद करुन घेऊन निवडणुक प्रक्रिया राबवावी अन्यथा निवडणुक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी जे.बी. वांढेकर यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

युवकांनी स्वत:चा व्यवसाय उभारुन इतरांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन द्याव्या

पै.नाना डोंगरे : निमगाव वाघात एस.आर. फर्निचर दालनाचा शुभारंभ

वेब टीम नगर :  निमगाव वाघा (ता. नगर) येथे एस.आर. फर्निचर या भव्य दालनाचा शुभारंभ आदर्श माता ताराभाभी शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाबी शेख, पै. नाना डोंगरे, किरण जाधव,  उद्योजक चाँदभाई शेख, दिलावर शेख, नासीर शेख, अन्सार शेख, मोहसीन शेख, प्रियंका डोंगरे, गोकुळ जाधव, गुड्डू शेख, डॉ. विजय जाधव, भरत फलके, अनिल डोंगरे, पै.वली शेख, अली शेख, रफिक शेख, युनूस शेख, रामदास डोंगरे, रंगनाथ शिंदे, सुनिल जाधव आदी उपस्थित होते.

अन्सार शेख यांनी निमगाव वाघात एस.आर. फर्निचर या भव्य दालन सुरु केले आहे. उत्कृष्ट कारागिरांच्या माध्यमातून विविध प्रकारचे दर्जेदार व आकर्षक फर्निचर तयार करण्याचे काम सुरु असून, या निमित्ताने अनेक ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य डॉ. विजय जाधव यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, सध्या बेरोजगारीचे प्रमाण पाहता गावातील युवकांनी नोकरीच्या मागे न पळता स्वत:चा व्यवसाय उभारुन इतर युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे. शेख यांनी गावातच उभे केलेले फर्निचरचे दालन गावाच्या वैभवात भर पाडणारे असून, गावाच्या ठिकाणी उत्तम प्रकारचे फर्निचरचे साहित्य मिळत असल्याने ग्रामस्थांची देखील सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments