नगर बुलेटीन : ०१-०३-२०२१

 नगर बुलेटीन : ०१-०३-२०२१

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काँग्रेसमध्ये इन्कमिंग... भाजपला गळती....

संजय भिंगारदिवेंचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

वेब टीम नगर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या संजय भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिंगारदिवे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. 

यावेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनंतराव गारदे, खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ,  सहसचिव गणेश आपरे, प्रमोद डांगे, अरुण भिंगारदिवे यांची उपस्थिती होती. 

भिंगारदिवे हे माजी खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. केडगाव सारख्या महत्त्वाच्या मंडलाचे ते अध्यक्ष होते. सन २०१३ च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडूक देखील लढविली होती. 

माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे संस्थापक असणाऱ्या भीमशक्ती संघटनेचे त्यांनी शहर अध्यक्ष म्हणून देखील अनेक वर्ष काम पाहिले आहे. शाहू, फुले, आंबेडकर चळवळीमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरामध्ये कार्यरत आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय विकास संस्थेचे ते २००८ पासून अध्यक्ष आहे. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या युवा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. 

पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय भिंगारदिवे म्हणाले की, किरणभाऊ काळे हे विकासाची दृष्टी असणारे दूरदर्शी आणि निर्भीड नेतृत्व आहे. नगर शहराचा अनेक दशकांपासून प्रलंबित असणारा विकास करण्याची धमक ही त्यांच्यामध्ये आहे. माझ्यासारख्या शाहू, फुले,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना किरणभाऊंच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेल याची खात्री पटल्यामुळेच मी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मला अभिमान आहे. 

आगामी काळामध्ये शहरातील दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या प्रवाहा मध्ये सामील करून घेण्यासाठी आणि काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी मी मनापासून काम करणार असल्याचे प्रतिपादन, यावेळी बोलताना भिंगारदिवे यांनी केले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा शल्यचिकित्सक ,शासकीय रुग्णालय गरिबांचे प्राणदाता : पद्मश्री पोपटराव पवार

वेब टीम नगर :  "करोनाशी लढतानामागील वर्षभरात अहमदनगर चे   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयाने हजारो गरीब रुग्णांचे प्राण वाचवले. यामागे जिल्हा शासकीय आणि ग्रामीण रुग्णालय टीम , डॉ. पोखरणा यांचे असामान्य धैर्य ,निर्णय आणि संघटन कौशल्य होते ", असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी आज येथे केले. स्नेहांकुर उपक्रमाच्या   केडगाव येथील रूपाली मुनोत बालकल्याण संकुलात आज ३ बालकांचे एकत्रित दत्तक विधान करण्यात आले. यानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील कोवीड योद्ध्यांचा सेनापती, म्हणून अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉ. पोखरणा यांचा  सर्व सामाजिक संस्था, संघटनांतर्फे पद्मश्री पवार यांच्या हस्ते नागरी गौरव करण्यात आला. डॉ. सौ. माधवी अजित लोकरे या अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.   कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत  त्वचारोग  आणि आधुनिक लेझर सौंदर्यसाधना केंद्र डॉ. सौ.लोकरे चालवतात.केवळ श्रीमंतांचा शौक असलेली सौंदर्यसाधना त्यांनी मागील दीड दशकांच्या समर्पित साधनेतून सर्वसामान्यांसाठी  उपलब्ध करून दिली.हजारोंना जगण्याचा नवा आत्मविश्वास देणाऱ्या डॉ. सौ. लोकरे यांचाही यावेळी नगरकरांतर्फे  गौरव करण्यात आला. दत्तक  दिलेल्यातील एक बालक जन्मतः एचआयव्हीबाधित होते.  दुसरे  अत्यल्प वजनाचे आणि काही जन्मजात आजार असलेले होते. तर तिसऱ्या बालकास केवळ एकच कान आहे.यांना दत्तक  अमेरिकेतील २ आणि  एका  भारतीय पालकाने दत्तक घेतले. यातील एक अमेरिकन दाम्पत्य कॅन्सर तज्ञ डॉक्टर असून दुसरे संगणक क्षेत्रात कार्यरत आहे.

        भारतीय दांपत्य उद्योग आणि सामाजिक कार्यात सहभागी आहे.करोना च्या पुन्हा वाढत असलेल्या संसर्गाचे पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील लोकांनी सर्व खबरदारी बाळगण्याची विनंती डॉ. पोखरणा यांनी यावेळी केली.यापूर्वी दत्तकविधान केंद्रातील अनेक मुलांच्या शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञ म्हणून डॉ. पोखरणा यांनी केल्या होत्या. त्या आठवणी त्यांनी विशद केल्या. डॉ. पोखरणा यांनी ज्यांच्या शस्त्रक्रिया केल्या , ती मुले दत्तक दिलेल्या कुटुंबात आनंदाने कशी राहतात ,याची चित्रफित यावेळी सर्वांनी पाहिली. सध्या आपण करवीरनगरीत सेवारत असलो , तरी अहमदनगरने दिलेले संस्कार आणि प्रेरणा हीच आपली शिदोरी असल्याचे डॉ. माधवी  लोकरे यांनी नमूद केले. यावेळी समाज कल्याण विभागाचे मराठवाडा विभागाचे उपायुक्त पांडुरंग वाबळे , महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे सचिव किसनराव शिंदे, पुणे येथील प्रख्यात विकासक राहुल शिंदे, अमोल जाधव, प्रदीप काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.       

        या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब वारुळे, संतोष धर्माधिकारी, अजय वाबळे, डॉक्टर प्रीती भोम्बे, भरत  कुलकर्णी, अहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य , बाल संरक्षण अधिकारी यांनी मिळून केले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लोकशाहीची मत गंगोत्री प्रदूषित होण्यापासून वाचली 

अ‍ॅड. कारभारी गवळी : मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याचे पीपल्स हेल्पलाईनकडून स्वागत

वेब टीम नगर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वादात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या निर्णयाचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत करुन, लोकशाहीची मत गंगोत्री प्रदूषित होण्यापासून वाचली असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर मंत्री राठोड यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. नुकतेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी येथे महंतांसह मोठा जमाव एकत्र करुन स्वत: निर्दोष असल्याचा बनाव केला. त्यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा व धार्मिक स्थळांचा दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याचा भंग केला होता. मंत्री राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारवर दबाव येत असताना आखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. या निर्णयाने स्त्री दास्य निब्बाणची प्रचिती आली असून, स्त्री लंपट व महिलांवार अत्याचार करणार्‍या व्यक्तींना पाठीशी घालणे योग्य नव्हते. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतला नसता, तर कौरभ सभेपेक्षा वाईट अवस्था राज्य सरकारची झाली असती असे, अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा काळावधीत विविध उपाययोजना करण्याची मागणी 

बाबासाहेब बोडखे : शिक्षक परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्रीसह संबंधित अधिकार्‍यांना निवेदन

वेब टीम नगर : एप्रिल व मे मध्ये होणार्‍या शिक्षण मंडळाच्या लेखी परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार तथा कार्याध्यक्ष नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाच्या संबंधीत अधिकार्‍यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षण विभागाने घोषित केलेल्या लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा शुक्रवार दि. २३ एप्रिल ते शुक्रवार दि. २१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दि. २९एप्रिल ते गुरुवार दि. २०मे २०२१ या कालावधीत होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, त्याचे संक्रमण वाढत आहे. या परीक्षा कालावधीत कोरोनाच्या संक्रमणापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र (होमसेंटर) घोषित करण्यात यावे, कोरोना संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या भौतिक सोयी, सवलती उपलब्ध करून द्याव्या, प्रत्येक परीक्षा केंद्रात फिजिकल डिस्टन्सचे बंधन काटेकोरपणे पाळले जाईल याची दक्षता घेण्यात यावी, विद्यापीठाच्या नियोजनाप्रमाणे ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना विकल्प निवडण्याची संधी देण्यात यावी, प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 25 टक्के गुण बंधनकारक करावे, उत्तरपत्रिका तपासणीचे काम तालुकास्तरावर केंद्रीय पद्धतीने करावे, तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने उपरोक्त नियोजन व्यवस्था करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी १३ मार्च रेल्वे रोकोच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकास निवेदन देऊन पाठिंबा द्यावा

वेब टीम नगर :  अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी मागील एक दशकापासून अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी महत्त्वाची बनलेली ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी खासदार दिलीप गांधी प्रयत्नशील असून, त्यांचे देखील प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारसह रेल्वे विभागाचे लक्ष वेधून ही रेल्वे सेवा तातडीने सुरु होण्यासाठी संघटनेच्या वतीने शनिवार दि.१३ मार्च रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून, यामध्ये अनेक स्वयंसेवी संघटना सहभागी होत आहे. या जन आंदोलनात शहरातील विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविण्यासाठी अहमदनगर रेल्वे स्थानक येथे स्टेशन मॅनेजर यांना अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मागणीचे व रेल्वे रोकोला पाठिंबा दर्शविणारे निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रेल्वे सेवा नगरकरांच्या जनरेट्यामुळे सुरु होणार असल्याचा विश्‍वास संघटनेच्या वतीने हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केला आहे.  

अहमदनगर-पुणे रस्त्यावर सातत्याने वाढत असलेल्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे-नगर प्रवासाचा वेळ वाढून तो चार तासांहून अधिक झाला आहे. सध्या हा मार्ग चौपदरी आहे, मात्र तो कमी पडत आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच अहमदनगर-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू केल्यास इंधनाची बचत तर होणार आहेच, पण विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदार वर्गाला यामुळे सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांचा नगर-पुणे प्रवास सुरु आहे. ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास दोन्ही शहराच्या दृष्टीने सोयीचे होऊन रेल्वे विभागाला देखील आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.    

 मागील ११ वर्षांपासून तत्कालीन रेल मंत्री मा. सुरेश प्रभू, मागील टर्म मध्ये मा.ना. पियुष गोयल, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, सोलापूर विभागाचे रेल्वे मॅनेजर अशा अनेक लोकांनी आश्‍वासन दिले, त्यात विद्युतीकरण संपल्यावर, ततपश्‍चात कॉडलाईनचे काम झाल्यावर आणि मागील वर्षी दौंड येथे बाय पास येथे रेल्वे स्थानक झाल्यावर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याचे अश्‍वशान देण्यात आले होते. मात्र हे आश्‍वासन पाळले गेले नसल्याने जन आंदोलनाच्या माध्यमातून अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवेचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने पुढाकार घेतलेला असून, रेल्वे रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरा देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हर दिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाउंडेशन, फिनिक्स फाउंडेशन उतरले आहेत. शहरातील इतर सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष व नगरकरांना या जन आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठिंब्याचे पत्र रेल्वे स्थानकावर देण्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनासाठी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, विपुल शहा, संजय सपकाळ, अशोक कानडे, अजय दिघे, धनेश कोठारी, संजय वाळूंज आदी प्रवासी संघटनेचे सदस्य प्रयत्नशील आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आई हेच माझे विद्यापीठ होते. : ॲड.डॉ. अरुण जाधव

वेब टीम जामखेड : आईने काबाड कष्ट करून आम्हाला घडविले,  गोर गरीब शोषित पीडितांना मदत करण्याची शिकवण दिली. आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळेच आज आम्हाला समाजात स्वाभिमानाने जगता आले. आई हेच माझे विद्यापीठ होते. असे प्रतिपादन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी केले.

ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक तथा वंचित बहुजन आघाडीचे भटके विमुक्तांचे नेते ॲड.अरुण जाधव यांच्या मातोश्री दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. ह.भ.प. विश्वनाथ महाराज नन्नावरे, ह. भ. प. कांताबाई सोनटक्के, ह. भ. प.सारिका ताई देवकाते, प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, गुलचंद अंधारे, विद्या ताई वाव्हळ, राजेश वाव्हळ, मोहन गायकवाड, नेरले ग्रामपंचायत सदस्य शरद काळे, सर्जेराव काळे, गोविंद सातपुते, उद्योजक अनुप काळे, अरुण डोळस, ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापु ओहोळ, अलका ताई जाधव, उमाताई जाधव, उषाताई जाधव, नीरज जाधव, गौतमी जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ॲड. अरुण जाधव पुढे म्हणाले की, आम्ही गाव कुसाबाहेर राहणारी माणसं मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आम्हाला मान सन्मान मिळाला. आईच्या प्रेरणेमुळे संघर्ष करण्याची ताकद मिळाली. लढण्याचे बळ मिळाले. त्यामुळेच आज समाजात ताठ मानेने जगू शकतो. प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अढळ असते. त्यामुळे सर्वांनी आईची सेवा करावी. व आईचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे.

ह. भ.प. कांताबाई सोनटक्के म्हणाल्या की, सर्व तीर्थांचे माहेरघर म्हणजे आई असते. आईला आपण कुठली उपमा देऊ शकणार आईने आपल्यावर केलेले उपकार आपण जन्मभर फेडू शकणार नाही मात्र आपल्या आईने आपल्याला दिलेले संस्कार व शिकवणुकीनुसार आपण जीवनची वाटचाल केली पाहिजे. ह.भ.प.विश्वनाथ महाराज  नन्नावरे म्हणाले की, आई आपल्याला सोडून गेल्या नंतर प्रत्येकाला आपल्या आईची कमतरता भासत असते. मात्र आई वडील हयात असतांनाच त्यांची सेवा करणे म्हणजेच चारधाम ची यात्रा करणे होय. ह. भ.प. सारिका देवकाते यांनी आईचे वर्णन करणारे गीत सादर करून आईची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात, बापू ओहोळ, अरुण डोळस यांनी प्रतिनिधीक स्वरूपात श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या मातोश्री दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ ह. भ.प. कांताबाई सोनटक्के व ह.भ.प. विश्वनाथ महाराज नन्नावरे यांच्या आश्रमास ३१०० रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच ल.ना. होशिंग विद्यालय व नागेश विद्यालयातील १० वी १२ वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना हिराबाई जाधव स्मृती पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी यावेळी केली.

दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या प्रबोधनपर कार्यक्रमास प्रारंभ झाला. भगवान राऊत यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले. उमाताई जाधव यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक सागर भांगरे, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, तरडगावच्या सरपंच संगीता ताई केसकर, संतोष चव्हाण, संतोष भोसले, दिसेना पवार, विशाल पवार, अतिष पारवे, मनीषा काळे, लता सावंत, उज्वल मदने, छाया भोसले, दिपक माळी, विशाल पवार, मच्छीन्द्र जाधव, मोहन जाधव, तानाजी जाधव, विशाल जाधव, जित जाधव, गौतमी जाधव, आदींनी परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्नशील

 प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस : राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाचे यश

     वेब टीम नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालय बंद असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन, झुम अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. विद्यार्थीही ऑनलाईन अभ्यासातून आपली प्रगती साधत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमही सुरु आहेत. यामध्येही विद्यार्थी यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी केले.

     महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे द्वारा आयोजित एकांकिका, निबंध तसेच समुह गीत स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पारितोषिके मिळविल्याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ.ऋचा शर्मा, प्रा.अशोक घोरपडे, प्रा.फरहान शेख आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी ऋचा शर्मा म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी विविध स्पर्धा सहभागी होऊन आपल्यातील कला गुण विकसित करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. राष्ट्रभाषा पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद अशी आहे. असे सांगून स्पर्धेविषयी माहिती दिली. प्रा.अशोक घोरपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जागतिक मराठी भाषादिन उत्साहात साजरा

सारडा महाविद्यालयात रंगल्या मराठी शब्दांच्या गमती जमती

वेब टीम  नगर : पेमराज सारडा महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पुण्याच्या मराठीच्या अभ्यासिका माजी मुख्याध्यापिका संजवणी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘शब्दरत्ने’ या मराठी भाषेचे विविध पैलू उलगडणाऱ्या कार्यक्रमात मराठी कवी, साहित्यिकांच्या गाजलेल्या कविता व  लेखन सादर केल्यावर मराठी शब्दांच्या गमती जमतीही सादर केल्याने हा कार्यक्रम रंगला. सारडा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात बीए व एमए चे विद्यार्थी घरूनच सहभागी झाल्याने व्यासपिठा समोर कोणीही नव्हते तरीही या कार्यक्रमाचा रंग वाढतच गेला.

          महान कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन संजवणी कुलकर्णी व सारडा महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ.मिलिंद देशपांडे यांनी केले. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रतिक्षा गायकवाड, मराठी संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. महेश्वरी गावित, प्रा.डॉ.संगीता शेळके, प्रा.दया देठे, प्रा.डॉ.प्रकाश जाधव आदि यावेळी उपस्थित होते.

          यावेळी संजवणी कुलकर्णी यांनी आपल्या शब्दरत्ने या कार्यक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळातील वी.दा. सावरकर यांनी देशपभक्तीचे स्फुर्लिंग पेटवलेल्या कविता, वी.वा.शीरवाडकर, गदिमा, मंगेश पाडगावकर यांच्या सह अलीकडच्या काळातील विविध कवींच्या गाजलेल्या कविता तसेच साहित्यिकांचे गाजलेले  आपल्या अनोख्या शैलीत सादर केले. त्यास उपस्थित सर्वांनी दाद दिली.

          यावेळी उपप्राचार्य डॉ.मिलिंद देशपांडे म्हणाले, सारडा महाविद्यालातील मराठी विभाग हा महाविद्यालयाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.कायम विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व कार्याक्रमचे आयोजन करून साहित्तिक मेजवानी विद्यार्थ्यांना देत आहे. त्यामुळे महाविद्यालयातील पीएचडी धारक विद्यार्थाची संख्या वाढतच आहे.

          प्रास्ताविकात डॉ. प्रतिक्षा गायकवाड म्हणाल्या, शहरात पुन्हा करोना वाढत आहे. महाविद्यालय सुरु झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणा साठी हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला आहे. गाजलेल्या साहित्यिकांनी आयुष्यभर मराठीची सेवा केल्याचं आजही त्यांचे साहित्य शाश्वत आहे. महाविद्यालय जागतिक मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आज अनोख्या मेजवानीचे आयोजन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिद्द व चिकाटीमुळे पुर्वजाला यश प्राप्त करता आले : आ. संग्राम जगताप

वेब टीम नगर : गंभीर दुखापत झालेली असतांना केवळ इच्छाशक्ती व मेहनत यामुळें यशापर्यंत जाता येते. पूर्वजाला मिळालेले यश यामुळेच निश्चितच कौतुकास्पद असून अहमदनगर शहरच नव्हे तर जिल्हासाठी भूषणावह आहे. या पुढे तिने कथक मध्ये जास्तीत श्रम घेऊन शहरातील व जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील विदयार्थ्यांना घडवावे.नगर शहर सांस्कृतिक क्षेत्रात आपला लौकिक सर्वदूर नेत असुन. पूर्वजाने केलेली कामगिरी नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन आ संग्राम जगताप यांनी केले

     कथक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळाल्या बद्दल कु पूर्वजा हिचा आ जगताप यांनी सत्कार केला.  यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी रसिक ग्रुप चे अध्यक्ष जयंत येलूलकर, नगर टाईम्स चे संपादक संदीप रोडे, प्रा. सीताराम काकडे, सुरेश बोज्जा, शशिकला बोज्जा, संतोष ढाकणे, मा. नगरसेविका वीणा बोज्जा, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------Post a Comment

0 Comments