नगरटुडे बुलेटीन -२८-०२-२०२१

 नगरटुडे बुलेटीन -२८-०२-२०२१

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिकित्सकदृष्टी ठेवून सर्व क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे

 प्राचार्या कांचन गावडे : श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये मराठी भाषा, विज्ञान दिन व वसुंधरा सप्ताह साजरा

    वेब टीम  नगर : पर्यावरणाचा होत चालेला र्‍हास ही सर्वांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. या पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सरकार, सामाजिक संस्था यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करुन आपणही त्यात सहभागी होऊन हातभार लावला पाहिजे. विज्ञानाने मनुष्याची प्रगती झाली आहे, आज आकाश, पाताळ, मेडिकल आदिंसह विविध क्षेत्रात होत असलेले क्रांतीकरक बदल हे विज्ञानाची देण आहे. मोबाईल हा त्याचाच एक भाग आहे, परंतु त्याचा वापर कामापुरताचा झाला पाहिजे. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात भाषाची होत असलेली तोडफोड चिंताजक असून, आप आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषेला मोठी संत, कवी, साहित्यीकांची परंपरा असून, ती समृद्ध करण्यासाठी अनेकांचे योगदान लाभले आहे. आपणही मराठीचा सन्मान केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमीच चिकित्सक दृष्टी ठेवून अभ्यास करुन सर्वक्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलच्या प्राचार्या कांचन गावडे यांनी केले.

     मराठी राजभाषा दिन व माझी वसुंधरा अभियानानिमित्त श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात  विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या कांचन गावडे, ज.ग.उंडे, पांडूरंग मिसाळ, सु.ब.भापकर, वि.च.सावळे, उज्वला सूर्यवंशी, सु.स.पवार, प्र.रं.सुरसे, आशा वरखडे, दत्तात्रय कसबे आदि उपस्थित होते.

     यावेळी माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ तसेच मराठी राजभाषा दिन व जागतिक विज्ञान दिन असा त्रिवेणी संगम कार्यक्रम एकत्रित घेण्यात आला. यावेळी वि.वा.शिरवाडकर तथा कुसूमाग्रज व क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. यावेळी शास्त्राज्ञ व त्यांनी लावलेले शोध या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

     या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजयकुमार मुनोत आदिंसह सर्व विश्‍वस्तांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सु.ब.भापकर यांनी केले तर सूत्रसंचालन आशा वरखडे यांनी केले. शेवटी आभार दत्तात्रय कसबे यांनी मानले.  यावेळी ब.भा.माताडे, क्षी.मा. कानडे, चां.रा.कोर्‍हाळे. वि.सा.खोसे, दि.स.रोंगे आदिंसह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवृंद  उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला असुरक्षित

 अंजली वल्लाकटी : मंत्री संजय राठोड विरोधात भाजपा महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

वेब टीम नगर : राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ लागली आहे. नव्यानेच उघड झालेले मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. युवतीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अद्याप राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. अत्याचारित कुटुंबावर मंत्री राठोड दादागिरी करीत दबाव टाकत आहेत. त्यामुळे कुटुंबही घाबरलेले आहे. आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित आहेत, असे प्रतिपादन शहर जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांनी केले.

     भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीने येथील दिल्लीगेट चौकात मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात  दिल्लीगेट वेस  बंद करत

रास्ता रोको व त्यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी  महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली वल्लाकटी,  प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, प्रिया जानवे, कॅन्टोन्मेंट सदस्या शुभांगी साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्‍विनी करांडे आदी महिला उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत हे आंदोलन पार पडले.

      यावेळी सुरेखा विद्ये म्हणाल्या की, तिघाडीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात दबलेले असल्याने ते सक्षम निर्णय घेताना दिसत नाहीत. अत्याचार करणार्‍या मंत्र्यांना ते पाठीशी घालत आहेत. त्यांनी ताबडतोब मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजपा महिला आघाडी शांत न बसता अधिक तीव्र आंदोलन करतील, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विठूराया यंदा तरी पंढरीची वारी घडू दे 

 ज्योती गाडे : अर्बन बँक कॉलनीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरा २४ वा वर्धापन दिन साजरा

   वेब टीम नगर : पंढरपुरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत पांडूरंग, माऊली, विठोबा, विठू अशी अनंत नावे धारण करणारा सर्व वारकर्‍यांचा लाडका विठूराया यंदा तरी आम्हा सर्व भक्तांना पंढरीची वारी घडू दे अशी भावनिक आर्तहाक नगरसेविका ज्योती गाडे यांनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दिली.

     नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीत प्रति पंढरपुर असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा २४ वा वर्धापन दिन कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणाने मोजक्या भक्तगणांत साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका ज्योती गाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी अमोल गाडे, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि.मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, अ‍ॅड.साहेबराव दरवडे, एन.डी.कुलकर्णी, आशिष ब्रह्मे, संदिप यादव, राजेश अध्यापक, मकरंद जामदार, अक्षय सोनवणे आदि उपस्थित होते.

गाडे पुढे म्हणाल्या  पंढरपुर येथील मूर्तीप्रमाणेच या मंदिरातील मुर्ती येथे असल्याने जणू काही पंढरपूरात दर्शन धेतले असे वाटते. प्रेम, भक्ती, ज्ञान आणि मानवता या चार स्तंभावर पंढरपुरातील आध्यात्म सुखात नांदत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे दिंड्या रद्द झाल्या. विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकर्‍यांसह सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाचा नायनाट करावा. म्हणजे यंदा दिंडी होऊन पंढरीची वारी घडेल असा विश्‍वास व्यक्त केला.

     प्रास्तविकात मंदिराचे संचालक आदिनाथ जोशी म्हणाले, अर्बन बँक कर्मचार्‍यांची ही खूप जुनी व सर्वात प्रथम असलेली वसाहत आहे. रहिवाशांना आध्यात्मिक समाधान मिळावे, म्हणून येथे मंदिर बांधले. त्यानिमित्ताने कॉलनीतील सर्व भाविक एकत्र येतात, भक्तीमय वातावरण तयार होते. मंदिरामुळे पंढरपुरकडे जाणार्‍या दिंडी येथे थांबतात यांचे समाधान वाटते.

     कोरोनावर मात करुन २५ वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा आमचा मानस पांडूरंगाने पूर्ण करावा, असे अभिजित जोशी यांनी मनोगतात सांगितले. भार्गव जोशी, अश्‍विनी अध्यापक यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले. शेवटी प्रज्ञा जोशी यांनी आभार मानले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उगवत्या पिढीने वाचन संस्कृती अंगिकारावी 

 विक्रम राठोड : अ.नगर जिल्हा वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा

     वेब टीम नगर : मानवी जीवनात वाचनाचे, ग्रंथाचे व लेखकांचे योगदान अमुल्य आहे. सुशिक्षित माणसाला सुसंस्कृत बनविण्याचे त्याची मानसिक जडण-घडण करण्याचे काम ग्रंथ करतात. सामान्य माणसाला असामान्य करण्याचे सामर्थ्य वाचनात असल्याने उगवत्या पिढीने वाचन संस्कृती अंगिकारावी, असे आवाहन अ.नगर जिल्हा वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.

     कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर जिल्हा वाचनालयात आयोजित या कार्यक्रमात राठोड यांच्या हस्ते सरस्वती पुजन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ग्रंथपुजन करण्यात आले.

     याप्रसंगी  उपाध्यक्ष अजित रेखी, संचालक राहुल तांबोळी, ज्योती कुलकर्णी, दिलीप पांढरे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, वाचक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.ज्योती कुलकर्णी तर आभार अजित रेखी यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नियम हे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आहेत हे जाणले पाहिजे

ए.वाय. बळीद : नगर महाविद्यालयाच्या एनएसएसच्यावतीने  कोरोना व वाहतुक नियम जागृती

     वेब टीम नगर : महाविद्यालयीन जीवनात एन.एस.एस. मधील योगदानामुळे सामाजिक भान येते. याबरोबर नेतृत्व विकसित होते. इतरांसाठी जगण्याची भावना तयार होते. युवा वर्गाला आपल्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळत असते. या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात, त्यामुळे विद्यार्थी समाजाभिमुख होतो. आज प्रत्येक नागरिकाने कोरोना व वाहतुक नियमावलीनुसार वर्तन करणे समाजहितासाठी आवश्यक आहे. हे नियम आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आहेत हे प्रत्येकाने जाणले पाहिजे, असे प्रतिपादन रजिस्ट्रार ए.वाय. बळीद  यांनी केले.

     अहमदनगर महाविद्यालयील राष्ट्रीय सेवा योजना आयोजित कोरोना व वाहतुक नियम जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात  बळीद बोलत होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले.

     या कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी अहमदनगर महाविद्यालय, पत्रकार चौक, झोपडी कॅन्टीन या ठिकणी मास्क वितरित केले. तसेच मास्क व हेल्मेट घातलेल्यांचे शहर वाहतुक शाखेचे पो.उपनिरिक्षक विकास देवरे यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प देवून स्वागत केले. यावेळी अहमदनगर उपकेंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संचालक डॉ.एन.आर.सोमवंशी, उपप्राचार्य प्रो. डॉ.बी. एम. गायकर, उपप्राचार्य प्रो.डॉ. ए.व्ही. नागवडे, ईटीआय संचालक डॉ.शरद बोरुडे उपस्थित होते.

     यावेळी पोलिस प्रशासनातील पी.एन.दत्ता मोरे, ए.एस.आय.सय्यद, एच.पी.गवळी, टी.सी.ससे, एच.सी.पालवे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे व कार्यक्रम अधिकारी डॉ.मालती येवला यांनी केले.  प्रा.फरहान शेख यांनी हकार्य केले. या उपक्रमात एनएसएस स्वयंसेवक गणेश टोगे, निलेश फसले, प्रज्वल वहाडणे, विशाखा पोखरकर, फिरदोस सय्यद, हर्षल कासार, स्नेहल बागडी, शीतल दहिफळे, वैभव अनारसे, अंकित भाटिया यांनी सहभाग घेतला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रशांत गायकवाड यांची पुढील कारकिर्दही उज्वल राहील 

भगवान फुलसौंदर : मोरया पतसंस्थेच्यावतीने सत्कार

    वेब टीम  नगर : पारनेर तालुका बाजार समितीच्या माध्यमातून प्रशांत गायकवाड यांनी आपल्या कामाने बाजार समितीचा लौकिक वाढविला आहे.  शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी यांच्या प्रश्‍नांसाठी पुढाकार घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची धडाडी पाहूनच त्यांना जिल्हा बँकेचे उमेदवारी देण्यात आली. अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय संपादन केला, ही त्यांच्या चांगल्या कार्याची पावतीच म्हणावे लागेल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एक हक्काचे पद त्यांना मिळाल्याने पुढील कारकिर्दही उज्वल राहील, असा विश्‍वास माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

     जिल्हा बँकेच्या संचालकपदी प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल मोरया पतसंस्थेच्यावतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सीए किरण भंडारी, विनायक काळे, प्रदीप बोरुडे, महादेव कराळे, सुनिल राऊत, अंबादास चौधरी, गुलाब कराळे आदि उपस्थित होते.

     सत्कारास उत्तर देतांना प्रशांत गायकवाड म्हणाले, सामाजिक कार्याचा वारसा घरातूनच मिळाल्याने आपण लोकांच्या कामांना प्राधान्य देत गेला. त्या माध्यमातून विविध पदे मिळत गेली. सर्वांच्या सहकार्याने आपण प्रत्येक क्षेत्रात काम करतो.  जिल्हा बँकेचा संचालक म्हणून शेतकरी, सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य देऊन चांगले काम करु. केलेल्या सत्कारातमुळे आपणास पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगारमधील बिकट बनलेला पाणी प्रश्‍न सोडवावा

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

वेब टीम नगर : भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणी प्रश्‍न तात्काळ सोडविण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा सचिव राहुल लखन, भिंगार शहराध्यक्ष साहिल कुडिया, सुरज गोहेर आदी उपस्थित होते.

भिंगारमध्ये मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरापेक्षा अधिक दराने पाणीपट्टी भरुन देखील येथील नागरिकांना पाणी मिळत नाही. पिण्यासाठी व दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. भिंगारला पंधरा ते वीस दिवसाआड पाणी मिळत आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. भिंगारमध्ये मोजक्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने सदर टँकरचे पाणी एका भागापुरते देखील पुरत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. छावणी परिषदेने तात्काळ पाणी प्रश्‍नाची दखल घेऊन नागरिकांना वेळेवर पुरेश्या प्रमाणात पाणी मिळण्याची व्यवस्था करावी, तो पर्यंत भिंगारच्या प्रत्येक भागाकरिता टँकरने पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जांब कौडगावला रंगले कुस्तीचे मैदान

रंगतदार कुस्त्यांचा थरार

वेब टीम नगर : जांब कौडगाव (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. कोरोनाच्या बर्‍यात काळावधी नंतर रंगतदार कुस्त्यांचा थरार ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला. उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा खर्से, सरपंच धनंजय खर्से, उद्योजक रवी बारस्कर, मनिष ठूबे, राजू शिंदे, पै.दादा पांडूळे, अतुल कावळे, सोमनाथ राऊत, निलेश मदने, राहुल गाडवे, अजय अजबे, बंडू शेळके, काका शेळके, सागर बारस्कर, संदीप कावरे आदी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले म्हणाले की, कोरोना महामारीची वर्षपूर्ती होत असताना नागरिकांना तब्बल एक वर्ष या संकटाशी झुंज द्यावी लागली आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृती निर्माण झाली. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अनेकांनी व्यायामाचा मार्ग निवडला असून, निरोगी आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले. टाळेबंदीत प्रशिक्षण व तालिम बंद असल्याने मल्लांच्या सरावामध्ये मोठा खंड पडला असून, मल्लांनी पुन्हा जोमाने सरावाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मल्लांच्या सुमारे 1 लाखा पर्यंत बक्षिसांच्या कुस्त्या लागल्या होत्या. चितपट कुस्त्यांनी कुस्ती रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विजयी मल्लांसह उपविजयी मल्लांना देखील रोख स्वरुपातील बक्षिस देण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुष्यात एकदा तरी रविदास धामांची यात्रा आवश्य करावी

राजेंद्र बुंदेले : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती साजरी

वेब टीम नगर : जिथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे जन्म झाले ते सीरगोवर्धनपूर (काशी), सचखंड बल्ला डेरा (पंजाब) येथील द्वितीय धाम आणि कोथरूड (पुणे) येथील तृतिय धामांची आयुष्यात एकदा आवश्य यात्रा करावी. ज्यामुळे रविदास महाराजांचे विचार व कार्य समाजाला कळेल. कोणताही जातीभेद न पाळता, सर्वांना समानता, बंधुत्वाची शिकवण देणारे ते महान संत होते. समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांनी दिले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हा संपर्क कार्यालयात संत रविदास महाराजांची ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचे प्रादुर्भाव लक्षात घेऊन साध्या पध्दतीने नियमांचे पालन करुन ही जयंती साजरी झाली. प्रारंभी रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महासंघाचे जिल्हा सचिव बापूसाहेब देवरे, खजिनदार संभाजी आहेर, जिल्हा सदस्य प्रकाश सोनवणे, विठ्ठलजी जयकर आदी उपस्थित होते.

युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे यांनी रविदास महाराजांच्या कार्याचे वर्णन केले. जिल्हा प्रवक्ते विशाल बेलपवार यांनी प्रास्ताविक केले. आभार शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले यांनी मानले. याप्रसंगी बापूसाहेब देवरे, संभाजी आहेर, प्रकाश सोनवणे, विठ्ठल जयकर, बाळासाहेब केदारे, विशाल बेलपवार, संतोष उदमले, विकी गारदे, महेश आहेर, अभिनव सूर्यवंशी, चिनूलाल बुंदेले, दुर्वश शेलार, आनंद बुंदेले, खेमराज बुंदेले आदी पदाधिकारी आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत रविदासांनी मानवतेची शिकवण दिली 

जालिंदर बोरुडे  : फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम संत रविदास महाराज जयंती रुग्णसेवेने साजरी

 वेब टीम नगर : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात १४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ३८ रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या नेत्रदानाच्या आवहानाला प्रतिसाद देत २१ नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, आर्यन कराळे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे आदी उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे म्हणाले की, संत हा एक जातीचा असू शकत नाही. संपुर्ण मानवजातीसाठी त्यांचे विचार व कार्य असतात. चौदाव्या शतकात संत रविदास महाराजांनी मानवतेची शिकवण दिली. या महापुरुषांच्या विचाराने समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात गरज ओळखून ही आरोग्यसेवा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील संत सावता महाराज मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन सदर शिबीर पार पडले. गरजूंना अल्पदरात नंबरचे चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांमध्ये अवयवदानाप्रती जनजागृती करण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविदास महाराजांचे मंदिर भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरणार 


प्रकाश पोटे : निंबोडीला संत रविदास महाराज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन

वेब टीम नगर : संत रविदास महाराज यांच्या ६४४ व्या जयंती निमित्त निंबोडी (ता. नगर) येथे चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. देवराम पोटे यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन पार पडले. यावेळी हभप अभंग महाराज सोमवंशी यांनी आपल्या प्रवचनातून संत रविदास यांचे कार्य व विचार ग्रामस्थांपुढे मांडले.

जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी संत रविदास महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे आहे. त्यांनी समाज जागृतीचे कार्य करुन समाजात समता प्रस्थापित करण्याचे कार्य केले. त्यांचे मंदिर भावी पिढीला प्रेरणा देणार असल्याचे सांगितले. यावेळी निंबोडी गावचे सरपंच शंकर बेरड, चर्मकार संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष उदमले, जय मल्हार कुस्ती संकुलाचे वस्ताद भाऊसाहेब धावडे, बाळासाहेब केदारे, कैलास सरपसरीवश, देवराम पोटे, भगवान बेरड, मधुकर शेटे, रामदास दळवी, सुरेश पोटे, प्रकाश आघावणे, शंकर पोटे, आकाश पोटे, संदीप पोटे, सचिन पोटे, किसन पोटे, गणेश पोटे, विकास पोटे, श्रीपत पोटे, गोवर्धन काळे, सुनील पोटे, पांडुरंग शेंडगे, प्रदीप पोटे, शिवाजी गाडे, तुकाराम गाडे, निलेश पोटे, पोपट पोटे, शंकर दळवी, भाऊसाहेब गाडे, संतोष पोटे, महादेव पोटे आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिंगवे नाईकला संत रविदास महाराजांची जयंती साजरी

वेब टीम नगर : नगर तालुक्यातील शिंगवे नाईक ग्रामपंचायत येथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई काळे व उपसरपंच सुनील जाधव यांच्या हस्ते रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक इंदुबाई डोळस, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळपकर, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप डोळस, राजेंद्र डोळस, जावेद सय्यद, फारुख सय्यद, सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके, हरिदास जाधव, अयाज सय्यद, ज्ञानेश्‍वर डोळस, विकास काळे, प्रवीण जाधव, स्वप्निल धामणे, बाबासाहेब काळे, आयाज सय्यद, ग्रामविकास अधिकारी, मंगेश पुंड, विलास तुपे, अनिकेत डोळस आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments